ठाणे (प्रतिनिधी) : यंदाच्या मे महिन्यात जिल्ह्यात विवाह सोहळ्यांची मोठी लगबग सुरू आहे. एकूण १४ मुहूर्त असल्याने हे विवाह सोहळे अटेंड करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींची धावपळ होणार आहे. लग्न सराईचा हा महिना असल्यामुळे वाजंत्री, कॅटरर्स, स्ययंपाकी मिळेणात अशी स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. सगळीकडेच विवाहाचे मुहूर्त सारखेच असताना आणि त्यात उष्णतेची आलेली लाट, अशा स्थितीत या विवाह सोहळ्यांना हजेरी लावताना घामटा निघणार आहे.
यंदा मे महिन्यात विवाह सोहळ्यांसाठी १४ मुहूर्त असणार आहेत. त्यात मुहूर्ताची तारीख ठरावीक असल्याने या एकाच मुहूर्तावर अनेक विवाह सोहळ्यांचे बार उडणार आहेत. मात्र यंदाचा उन्हाळा प्रखर असल्याने वऱ्हाडी मंडळींना लग्न समारंभाला जाणे म्हणजे प्रखर उष्म्याचा सामना करीत जावे लागणार आहे.
दरम्यान, यंदा मे महिन्यात काही ठरावीक मुहूर्त निश्चित असल्याने तसेच उशिरा विवाह ठरलेल्या वधू-वर पक्षाकडून याच ठरावीक मुहूर्तावर लग्नाचे सोहळे आयोजित केले आहेत. मात्र या महिन्यात विवाह सोहळ्यांची लगबग असल्याने मंडप, डेकोरेटर्स, कॅटरर्स, स्वयंपाकी, वाजंत्री मिळणे मुश्कील झाले आहे.
वाजंत्री, स्वयंपाकी बुक
आधीच तारखा निश्चित झाल्याने वरील सर्व विवाहा निमित्ताने उपयुक्त असलेल्या वाजंत्री, स्वयंपाकी या मंडळींच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे विवाह सोहळा जवळ आला असताना बहुतेक वधू-वर पक्षांकडील मंडळींना वाजंत्री, स्वयंपाकी, मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू आहे. सध्या उन्हाची दाहकता प्रखर असल्याने मंडप डेकोरेटर्स यांना महत्त्व आले आहे. एकाच महिन्यात जास्तीत जास्त सुपाऱ्या मिळत असल्याने सदर मंडळींच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत. अनेक नागरिकांना तर मनाजोगते मंडप, वाजंत्री, स्वयंपाकी मिळालेले नाही. बऱ्याचदा विवाह सोहळ्यात थाट मिरवण्याकडे वधू व वर पक्षांकडील मंडळींचा कल असतो. मात्र आताच्या उन्हाळ्यात तेही विवाह सोहळे ठराविक मुहूर्तावर असल्याने काही ठिकाणी एकच दिवशी ते तीन विवाह सोहळे असल्याने वऱ्हाडी मंडळींना मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच उष्णतेचाही त्रास त्यांना सहन करावा
लागणार आहे.
बँक्वेट हॉल, लॉन्सला पसंती
महागाईची मोठी झळ सध्या वधू-वर पालकांना सहन करावी लागत असली तरी वऱ्हाडींची उन्हाच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी साखरपुडा, हळदी समारंभ ते विवाहापर्यंत सर्वच विधींसाठी आता बँन्क्वेट हॉल व लॉन्सला पसंती दिली जात आहे. लॉन्समध्ये प्रशस्त मैदान, गार्डन, पाण्याचे तुषार हे सर्वच सुखद गारवा देत असतात. त्यामुळे अशा नैसर्गिक वातावरणात विवाह सोहळा आनंदाने पार पाडता येतो. बँक्वेट हॉलमध्ये एसीच्या आल्हाददायक वातावारणात आणि आकर्षक सजावटीमध्येही पाहुणचार करीत यजमान मंडळी सर्व हौस-मौज भागवतात. ठाणे जिल्ह्यात उन्हाळ्याच्या वॉटर रिसॉर्टही मंगल कार्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. ठाण्यात सुरज वॉटर पार्क, शांग्रीला रिसॉर्ट, कोकणकिंगसारखे रिसॉर्ट वऱ्हाडींना आकर्षित करीत आहेत.