मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये अनेकदा निर्माण झालेली पाण्याची गळती किंवा दूषित पाण्याचा शिरकाव शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. हे काम वेळच्या वेळी व तातडीने व्हावे, यासाठी महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वतीने जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचा कॅमेरा महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडे होता, पण तो नादुरुस्त झाल्याने आता अत्याधुनिक पद्धतीचा क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येणार असून या खरेदीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
जलवाहिन्यांमधील दुरुस्तीच्या कामातील वेळेची बचत होण्याच्या अनुषंगाने क्राऊलर कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. क्राऊलर कॅमेऱ्याच्या वापरामुळे नागरिकांचा पाणी पुरवठा किमान वेळेत सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामात जलअभियंता विभागाचा वेळ वाचण्यासाठीही मदत होणार आहे.
अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे नेमके ठिकाण शोधणे ही अतिशय आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. मुंबईतील जलवाहिन्यांचे जाळे हे भूमिगत असून अतिशय क्लिष्ट अशा जलवाहिनीच्या वितरण जाळ्यामुळे पाण्याची गळती अथवा दूषित पाणीपुरवठ्याचे ठिकाण शोधणे हे आव्हान ठरत असते. त्यामुळे सीसीटीव्हीसारख्या पद्धती असणाऱ्या विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा क्राऊलर कॅमेरा वापरात येईल. क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हीडिओ मिळवणे, व्हीडिओ रेकॉर्ड करणे शक्य होते. कॅमेऱ्याच्या वापरामुळे कधीही हा डेटा उपलब्ध होणे शक्य आहे. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी क्राऊलर कॅमेरा जलअभियंता विभागाला गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत अतिशय उपयुक्त ठरला आहे.