- रवींद्र तांबे
महाराष्ट्र राज्यात कोकण विभागात इतर विभागांच्या तुलनेने सर्वात जास्त पाऊस पडतो. कधीकधी इतका मुसळधार पाऊस पडतो, तर कित्येक घरे पाण्याखाली जातात. त्यामुळे लोकांना पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ येते. यासाठी शासनाने जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीनाल्याचे पाणी लोकवस्तीत शिरू नये म्हणून आतापासून नदीनाल्यांची साफसफाई करून घ्यावी. तसेच काही ठिकाणी कितीही उपाययोजना केली तरी जागा सपाट असल्याने पावसाळ्यात वस्तीत नदीनाल्याच्या पुराचे पाणी शिरते. तेव्हा काही वेळा त्या कालावधीसाठी काही ठिकाणी त्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित केले जाते. हे लोकांच्या सुरक्षिततेच्या कारणाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी, असे किती दिवस चालणार? त्यासाठी नदीनाल्याची साफसफाई वेळेवर करणे फायदेशीर ठरेल. म्हणजे त्या दृष्टीने निर्णय शासनाला घेता येईल. त्यासाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा होणे आवश्यक आहे. यामुळे लोकांचे होणारे नुकसान टाळता येईल. असे प्रकार कोकण विभागात जास्त प्रमाणात होताना दिसून येतात. तेव्हा त्या त्या तालुक्यातील पूरग्रस्त भाग असेल त्याचे त्या तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवून योग्य ती उपाय योजना सुचविणे आवश्यक आहे. त्यासाठी ही समिती कशा प्रकारे काम करीत आहे त्यावरी योग्य ते नियंत्रण जिल्हाधिकारी यांनी करावे.
मागील काही वर्षामध्ये पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आल्याने नदीनाल्याच्या आसपासमध्ये रहाणाऱ्या लोकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. नंतर कारण पुढे येते, नदीनाल्यातील गाळ काढला नसल्यामुळे पुराचे पाणी जवळच्या वस्तीत घुसून फार मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. नंतर ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर राजकीय तंटबाजीला सुरुवात होते. ते केवळ श्रेय घेण्यासाठी. त्यात अनेक आश्वासने दिली जातात. एकदा का पूरस्थिती नियंत्रणात आली की, सर्व काही शांत होते, तर म्हणे पंचनामे करण्याची कारवाई चालू आहे. असे असले तरी, ज्याचे नुकसान होते त्यालाच पाण्याची झळ काय असते हे समजते. तरी पण तो त्यातून कसा बसा सावरण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याच्या नजरेसमोर झालेले नुकसान तो आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण त्यासाठी त्याला खूप परिश्रम घ्यावे लागले होते.
तेव्हा ज्या-ज्या ठिकाणी पुराच्या पाण्याने नागरिकांचे नुकसान होत असेल, त्याची शासन पातळीवर दखल आजपासून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा पावसाळ्यापूर्वी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान मुसळधार पाऊस लागतो आणि तो नदीच्या काठावर ठेवलेला ओला गाळ पुन्हा नदीच्या पात्रातून वाहून जातो. तेव्हा अशी जी कामे आहेत ती पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असते. कारण त्या गाळाची सुद्धा योग्य ठिकाणी विलेवाट लावावी लागेल. सतत पडणाऱ्या पावसामुळे नसर्गिक आपत्ती केव्हा येईल हे जरी सांगता येत नसले तरी त्याची काळजी घेणे किंवा त्यावरती योग्य ती उपाययोजना सुचविणे आवश्यक आहे. तेव्हा नदीनाल्याच्या काठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नद्यानाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करणे गरजेचे आहे.
आता नदीनाल्यांच्या साफसफाईच्या कामात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता त्या भागाची पहाणी करावी, त्यानंतर त्यातील गाळ कसा काढता येईल. त्याठिकाणी नदीच्या पात्राचे रुंदीकरण किंवा खोदकाम करावे लागेल काय? त्या दृष्टीने काय करावे लागेल? त्याप्रकारे अहवाल तयार करावा. अहवाल मंजूर झाल्यावर त्याप्रमाणे कामाला सुरुवात करावा; परंतु काम करीत असताना आसपासच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच शेतजमिनीचे नुकसान होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यावी लागेल. त्याप्रमाणे ठेकेदाराला काम देऊन योग्य ती काळजी घ्यायला हवी. त्या कामकाजावर योग्य नियंत्रण शासनाचे असले पाहिजे. अहवालाप्रमाणे कामे होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी.
महत्त्वाची बाब म्हणजे, या वर्षी पुन्हा नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमून कशा प्रकारे पाण्याचा निचरा करता येईल. तसेच लोक वस्तीपासून जवळ असलेल्या नदीनाल्यांचे पाणी लोक वस्तीत येऊ नये त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील. याचा अहवाल तयार करून त्याप्रमाणे कारवाई करण्यात सुरुवात करावी. आता कमी दिवस असल्याने त्याची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तेसुद्धा पाऊस सुरू होण्याअगोदर सर्व काही ओक. म्हणजे लोक बिनधास्तपणे राहू शकतात. त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी योग्य काम झाले पाहिजे.
आता पुढील एक महिना केव्हा जाईल हे सांगताही येत नाही. तेव्हा हे काम नियोजनबद्ध करावे लागेल. कारण हे काम अत्यावश्यक असल्याने अगदी जलद गतीने काम करावे लागेल. केवळ त्या कालावधीत स्थलांतर जरी केले तरी शेवटी नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे.
काही ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जाते. त्यासाठी पण खोदकाम करावे लागते. उभारली जाणारी भिंत मजबूत असावी. भविष्यकाळाचा विचार करून ती बांधण्यात यावी. त्याचप्रमाणे पाण्याचा प्रवाह दुसऱ्या ठिकाणी वळवता येईल का? त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. ज्या ठिकाणी पावसाळ्यात पूर येतो त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जाणकार स्थानिक तरुणांची ‘पूर नियंत्रक’ म्हणून नियुक्ती करून तसे त्यांना प्रशिक्षण घ्यावे. म्हणजे ते पूर नियंत्रण परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळू शकतात. असे असले तरी नागरिकांचे जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी. त्यासाठी तातडीने नदीनाल्यांची साफसफाई करून घ्यावी ती सुद्धा पाऊस पडण्याच्या अगोदर.