Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘बार्बी’ने आयुष्यच बदललं

‘बार्बी’ने आयुष्यच बदललं

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

‘अशीच आहे चित्ता जोशी’ हे धार्मिक विचारांचं मार्मिक नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकाची लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका, प्रमुख भूमिका, शीर्षक गीतकार या पंचरंगी भूमिकेत आपण अभिनेत्री मैथिली जावकरला पाहत आहोत. समाजवादी, नास्तिक विचारांची नायिकेची भूमिका मैथिलीने साकारली आहे. नायिकेचे नाव चित्ता जोशी आहे, तर चैतन्य नावाच्या नायकेच्या भूमिकेत अभिनेता रणजित जोग आहे. तो आस्तिक सनातनी विचाराचा आहे. त्या दोघांच्या वैचारिक मतभेदांची खडांजंगी यात पाहायला मिळत आहे. एकीकडे दोघांचे प्रेम फुलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे दोघांमधील वैचारिक मतभेदांमधील दरी वाढताना दिसत आहे. ‘धाकड महिला मुक्ती संघटना’ या सेवाभावी संस्थेचे काम ती पाहते. समाजातील वेगवेगळी प्रकरणे तिच्याकडे येतात. त्यामध्ये ‘तिहेरी तलाक, लव्ह जिहाद, हिंदू विवाह कायदा’ या प्रकरणांचा समावेश असतो.

मैथिली जावकरने चौथीत असताना ‘कलंदर बिलंदर’ या सुधा करमरकरांच्या बालनाट्यापासून अभिनयाचा श्री गणेशा गिरविला. त्यानंतर अनेक व्यावसायिक नाटकात तिने आपल्या अभिनयाची झलक दाखविली. ‘आई परत येतेय, डोळे मिटून उघड उघड, आम्ही अफलातून, दांडेकरांचा सल्ला’ या व्यावसायिक नाटकांमधून तिच्या अभिनयाची घौड दौड सुरूच होती.

टर्निंग पॉइंटविषयी तिला विचारले असता ती म्हणाली, एकदा मी शिवाजी मंदिरच्या बॅक स्टेजवरून विंगेतून अभिनेता प्रशांत दामलेंचं एक नाटक पाहत उभी होते. त्यावेळी माझ्या बाजूला अभिनेता पुष्कर श्रोत्री आला व मला म्हणाला सध्या काय करतेस? ‘काही नाही’ मी म्हणाले.

‘शोभायात्रा’ नावाच्या नाटकात एक बदलीची भूमिका आहे. बार्बी नावाच्या मॉडर्न मुलीची भूमिका आहे. उद्या दीनानाथ नाट्यगृहाला प्रयोग आहे, तू येऊन बघ, मी स्क्रिप्ट देतो. तेरवा (तिसऱ्या दिवशी) या नाटकात तुला भूमिका करायची आहे. काही वेळेला मूळ बार्बी नायिका देखील काम करेल म्हणजे डब्बल कास्टिंग असणार आहे. तू हे करशील असा मला विश्वास आहे. शफाअत खान या नाटकाचे लेखक होते, तर गणेश यादव हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. ही भूमिका मला खूप आवडली. या नाटकाचे जवळजवळ २०० ते २५० प्रयोग मी केले. या नाटकात ८० ते ९० टक्के प्रयोगात बार्बी मीच साकारली. ते नाटक सुपर हिट ठरले. अनेक निर्मात्यांनी ते नाटक पाहिले. त्यानंतर मला अनेक मालिका मिळाल्या. ‘मानसी’, ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘इन्स्पेक्टर’ या मालिकांचा यात समावेश आहे. त्यानंतर मी खूपच बिझी झाले. महिन्यातील जवळजवळ २७ दिवस मी काम करायचे, त्यासोबत ‘शोभायात्रा’ नाटकदेखील करायचे. खरोखर हे नाटक माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -