Thursday, September 18, 2025

मुंबई शहरातील पर्यटन ठिकाणांचा होणार कायापालट

मुंबई शहरातील पर्यटन ठिकाणांचा होणार कायापालट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पर्यटकांचे आकर्षण असून हुतात्मा चौक मरिन लाइन्स परिसरात सायकल ट्रॅक, पर्यटकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांना केली होती. दरम्यान, शिंदे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या समृद्ध वारशाचा प्रसार करण्यासाठी आणि पर्यटकांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी फोर्ट विभाग आणि मरिन ड्राइव्हच्या सुधारणेबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्तांची भेट घेत काही सूचना केली होती.

अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे फोर्ट आणि मरिन ड्राइव्हच्या प्रस्तावित आराखड्यावर अधिकाऱ्यांनी यावेळी सविस्तर सादरीकरण केले. या प्रस्तावित योजनेत विविध वयोगटांसाठी मोकळ्या सार्वजनिक जागा सुधारण्यासाठी तसेच मरिन ड्राइव्हवर सायकल ट्रॅक, मुंबईतील नागरिकांसाठी शौचालयांची उपलब्धता, बसण्यासाठी बेंच आणि माहितीपूर्ण चिन्हांचे फलक लावावेत, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या.

यावेळी फोर्ट विभागाच्या पुनर्निर्मितीसाठी पार्किंग, फेरीवाला झोन, पुरातन वस्तू आणि ऐतिहासिक मॅपिंग या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय, स्ट्रीट मॅपिंगच्या योजना आणि रुंद फूटपाथ आणि पार्किंगच्या नियोजनांवरही चर्चा करण्यात आल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment