Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीमोलकरणीने पळवले तब्बल १ कोटी ९१ लाख रुपयांचे दागिने

मोलकरणीने पळवले तब्बल १ कोटी ९१ लाख रुपयांचे दागिने

१.७१ कोटी रुपयांचे दागिने परत मिळवण्यात गावदेवी पोलिसांना यश

मुंबई : मुंबईतील गावदेवी परिसरातील एका घरातून तब्बल १.९१ कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. घरात अनेक वर्षे काम करणार्‍या नोकरांचाच या चोरीमागे हात होता. अब्दुल मुनाफ तौफिक शेख, मिलेन सुरेन, हसमुख बागडा, नसरुद्दीन शेख आणि संगीता कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी अब्दुल आणि मिलेन हे घरातील नोकर असून इतर तीनजण हे दागिने दलाल आहेत, त्यांनी चोरीचे दागिने विकण्यास मदत केली. NTI लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शरद संघवी यांच्या घरी ही चोरी झाली. चोरी झालेल्या दागिन्यांपैकी १.७१ कोटी रुपयांचे दागिने परत मिळवण्यात गावदेवी पोलिसांना यश मिळाले आहे.

याप्रकरणी शरद संघवी यांनी १४ एप्रिल रोजी तक्रार केली होती. तक्रारीनुसार शरद यांची पत्नी निराली एका कार्यक्रमाला जात असताना कपाटातून दागिने गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले .नोकरांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीच माहित नसल्याचे सांगितले. निराली या आपल्या महागडे दागिने व हिरेजडीत वस्तू कपाटातील लाॅकरमध्ये ठेवून चावी कपाटातच ठेवत असत. घरात काम करणारे नोकर घरातच राहत होते. पतीपत्नीचा संशय घरातील नोकरांवरच असल्याने शरद यांनी पोलिसांना तसे कळवले.

तपासप्रक्रियेतून घरातील मोलकरीण मिलेन सुरेन हिने चोरी केल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान मिलेनने चोरीबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, काही वर्षांपूर्वी शरद यांनी ठेवलेल्या एका कार्यक्रमात मूळ बार टेन्डर असलेल्या अब्दुलशी मिलेनची ओळख झाली. याचे पुढे घट्ट मैत्रीत रुपांतर होऊन त्यांनी जानेवारी महिन्यात लग्न केले. आपल्या मालकिणीकडे असलेल्या सगळ्या ऐवजाची माहिती मिलेन अब्दुलला देत होती. यातूनच त्यांनी चोरीचा कट रचला. फेब्रुवारीपासून मिलेनने एकेक दागिना चोरत १.९१ कोटींचे दागिने लंपास केले. हे सर्व दागिने ती अब्दुलजवळ देत होती. या दोघांनी मिळून ते दागिने दलालांच्या माध्यमातून विकले.

यानंतर गावदेवी पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक शशिकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन अब्दुलचा शोध घेण्यात आला. अब्दुल परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला जोगेश्वरी इथून ताब्यात घेतले. चोरलेले दागिने मिलेन आणि अब्दुलने इतर तीन आरोपी हसमुख बगडा, नसरुद्दीन शेख आणि संगीता कांबळे यांच्यामार्फत विकल्याचे चौकशीतून उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना पकडून जवळपास १ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -