- वसुंधरा देवधर : मुंबई ग्राहक पंचायत
घनदाट केशसंभार व्यक्तीचे सौंदर्य खुलवतो, याविषयी सहसा दुमत होणार नाही. केशरचना कशीही आणि जगभरात कुठेही केलेली असो, केसांची महिरप चेहेऱ्याला व्यक्तिमत्त्व देते, हे नक्की. त्यामुळेच केशकलापाची काळजी घेणे, हे दिनचर्येतील एक महत्त्वाचे काम असते. आजच नाही तर अगदी कित्येक शतकांपासून. त्यामुळे जगभरात केसांची काळजी घेण्याचे, केशरचनांचे आणि त्या रचना सजविण्याचे विविध प्रकार आढळून येतात. या सर्वांचा समुच्चय, म्हणजे केसांशी संबंधित प्रसाधन.
विविधोपयोगी प्रसाधन करण्याची अनेक उत्पादने आपल्या नित्य उपयोगात असतात. अगदी टूथ पेस्टपासून नखांच्या रंगापर्यंत अनेक प्रसाधने सहजपणे वापरली जातात. प्रसाधन याचा अर्थ काय आणि आजकालच्या काळात वापरण्यात येणाऱ्या ‘सौंदर्य प्रसाधन’, या शब्दात काय दडलंय, हे सुजाण ग्राहकांना नक्की माहीत हवे. ज्याला cosmetic असा इंग्रजी प्रतिशब्द आहे, त्याचा अर्थ ‘ज्यामुळे स्वरूप सुंदर झाल्यासारखे दिसते’ अशी काही उपाययोजना. सुंदर असणे, सुंदर होणे आणि अधिक सुंदर झाल्यासारखे दिसणे, या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. इंग्रजी शब्दकोशात सुद्धा (OED) – वरवरच्या दिसण्यावर परिणाम करते ते – असा कॉस्मेटिक या शब्दाचा अर्थ दिला आहे. म्हणजेच मुळात जे आहे त्यात सुधारणा/बदल होतो तो तात्पुरता. म्हणूनच प्रसाधने नित्यनेमाने वापरावी लागतात.
आपला देश ही सौंदर्य प्रसाधनाची भली मोठी बाजारपेठ आहे. २०२० मध्ये १३१९१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी उलाढाल असलेल्या या बाजारपेठेची वाढ अंदाजे १६ टक्के या दराने होते आहे. यामध्ये केसांसाठीच्या तेलाचा वाटा अंदाजे १५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका असल्याचे मानले जाते. तेलाशिवाय केशकलापाची काळजी घेणारे शाम्पू आणि तत्सम अगणित उत्पादने बाजारात आहेत.
स्थानिक ते बहुराष्ट्रीय अशा सर्व उत्पादनांना मागणी असते. त्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर सातत्याने केल्या जात असतात. अनेक प्रसाधने तुलनेने स्वीकार्य असे दावे करतात. जसे : आपली त्वचा दिसेल नितळ, (होईल नाही म्हणत), तुम्ही दिसाल तरुण, केस काळे दिसतील ३० दिवसांपर्यंत. या आणि अशा प्रकारच्या विधानातून हे बदल तात्पुरते आहेत, हे स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी सुधारणा / बदल प्रसाधानामुळे होईल, असे सांगितले जात नाहीये, हे ग्राहकांनीसुद्धा समजून घेतले पाहिजे. मात्र अशी सीमा उल्लंघून जाणारे दावे – क्लेम्स – करण्याची चलाखी जगभरातील विविध उत्पादक करताना दिसतात. त्यावेळी तेथील दक्ष आणि ग्राहक हितरक्षक संस्था जाब विचारल्याशिवाय राहत नाहीत.
अमेरिकेतील अशीच एक संस्था, जाहिरातीतील सत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असते. तिचे नावच आहे ‘ट्रुथ इन ॲडव्हर्टायजिंग’ (TinA.org). उत्पादनाचा खप वाढावा यासाठी वारेमाप, भुलविणारे आणि अविश्वसनीय दावे करणाऱ्या अनेक जाहिराती जगभर विविध भाषातून केल्या जात असतात. अमेरिका त्याला अपवाद कशी असेल? अशा जाहिरातीतील दाव्यांना प्रश्न विचारण्याचे काम TinA टीना करत असते.
अलीकडेच ‘केस वाढतील, केस गळणे कमी होईल अगर थांबेल’, असे दावे करणाऱ्या उत्पादनाबाबत टीनाने आवाज उठविला आहे. हा दावा करण्यास अमेरिकेतील अन्न-औषध प्रशासनाची मान्यता (US-FDA) आवश्यक आहे. कारण हा दावा ‘आरोग्य-विषयक उपचार’सदृश आहे (therapeutic). असा दावा करण्यासाठी उचित व्यापारविषयक नियमावली आहे (FTC). त्यानुसार शास्त्रीय चाचण्या, संशोधन, कसोट्या आणि अभ्यास करायला हवा, तो झालेला नाही. केसांची वाढ होईल/गळणे थांबेल, असे आरोग्य-विषयक दावे कशाच्या आधारावर केलेत, याचे नि:संदिग्ध उत्तर या कंपन्या देऊ शकत नाहीत. अशा दाव्यांसाठी आवश्यक तो सर्व अभ्यासपूर्ण पुरावा गोळा करण्याविषयी, एक-दोन बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या सजग व सक्षम असतील. मात्र, सर्वसामान्यपणे या भुलवणाऱ्या दाव्यांचे बुडबुडे ग्राहकांनीच फोडायला हवे आहेत.
हा मजकूर वाचताना चाणाक्ष ग्राहकांना ‘प्रसाधन’, या गटात मोडणाऱ्या अनेक उत्पादनांच्या आकर्षक जाहिरातीची आठवण नक्की येईल. त्या जाहिरातीमधील दावेही आठवतील. त्यातील काही उघड-उघड अतिशयोक्त असतात. ‘अतिशय उत्साह’, ‘वेडपट वागण्याचे कौतुक’, ‘जंतुनाशक प्रसाधने’ अशा प्रकारचे दावे सहसा भुलवीत नाहीत. पण, काही दावे असे असतात की, ते उत्पादन जणू काही सर्व शास्त्रीय कसोट्यांवर तपासून मगच बाजारात आलेय, अशी खात्री पटावी. दुखऱ्या दातांसाठी दंतवैद्याकडे जावे की, जाहिरातीतील पेस्ट वापरून पुरेल? दातातील कॅल्शियम बाहेरून आत शिरते, हे खरंय का? केस गळायचे थांबतील का? नवीन केस उगवून पाहिल्यासारखा घनदाट केशकलाप मिळेल का? असे प्रश्न पडण्याआधी, ते उत्पादन वापरून पाहण्याचा मोह होणे, स्वाभाविक आहे. मात्र केसातला कोंडा तात्पुरता नाहीसा करण्याइतपत आहे की एकूण होणाऱ्या त्रासासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे, याचा विवेक तर केलाच पाहिजे.
एक मात्र आपण सगळे ग्राहक नक्की करू शकतो, ते म्हणजे प्रसाधनाच्या कोणत्या जाहिराती त्याच्या उपयुक्ततेबद्दल ‘आरोग्यविषयक दावे’ करीत आहेत, त्याविषयी जागरूक होणे. याचबरोबर या दाव्यातील फोलपणा उघड करण्यासाठी जाहिरातींना प्रश्न विचारणे आणि अयोग्य दावे मागे घेण्यास उत्पादकांना भाग पाडणे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे हेही केले पाहिजे.