Friday, December 13, 2024
Homeकोकणरत्नागिरीपरशुराम घाट पावसाळ्याआधीच ‘सुसाट’

परशुराम घाट पावसाळ्याआधीच ‘सुसाट’

१० मे पर्यंत घाटातील वाहतूक बंद राहणार

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाट दिवसातील पाच तास बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसात घाटातील अतिशय धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करून तातडीने काँक्रिटीकरणाच्या कामालाही सुरवात केली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधीच घाटातील काम पूर्ण करून दोन्ही लेनवर वाहने सुसाट जाण्याची शक्यता आहे.

परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या ५०० मीटर अंतरातील डोंगर कटाई व संरक्षण भिंतीस भराव करण्यासाठी २५ एप्रिल ते १० मेदरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून घाट बंद ठेवून कल्याण टोलवेज कंपनीने अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी कामाला सुरवात केली आहे. त्यासाठी घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात घाट बंद ठेवून काम सुरू केले आहे.
घाटाच्या मध्यवर्ती भागात कडक कातळ लागल्याने तो तोडताना अनेक अडचणी येत आहेत. दोन ब्रेकर मशिनने हे कातळ तोडण्याचे काम सुरू केले आहे; परंतु तो खडक अतिशय कठीण असल्याने या कामात अडचणी येत आहेत. त्यासाठी बाजूचा नरम कातळ फोडून ताप्तुरत्या स्थितीत पर्यायी रस्ता काढला जात आहे. कातळ फोडण्यासाठी सुरुंग लावण्याची आवश्यकता आहे; परंतु घाट माथ्यावर वस्ती असल्याने त्याला अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ब्रेकरने कातळ फोडण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

चिरणी-आंबडस-चिपळूण मार्गे वाहतूक
परशुराम घाटातील वाहतूक पाच तास बंद असल्याने या मार्गावरील वाहने चिरणी-आंबडस-चिपळूण मार्गे वळविण्यात येत आहेत. त्यासाठी कळंबस्ते व परशुराम घाटात पोलीस छावणी उभारण्यात आली आहे.

आपत्कालीन सुचवलेल्या उपाययोजना नाहीत
परशुराम घाट बंदच्या पार्श्वभुमीवर दोन्ही बाजूला फलक उभारण्यात आले आहेत; परंतु त्या व्यतिरीक्त आपत्कालीन परिस्थितीत सुचवलेल्या उपाययोजना ठेकेदार कंपनीकडून केलेल्या दिसत नाहीत. दरडग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, अग्निशामक वाहन इ. सामग्री उपलब्ध करावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -