
मुंबई (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कांदिवली विधानसभा सचिव व सामाजिक कार्यकर्ते सुशील यादव यांनी केलेल्या मदतीमुळे तीन वर्षांच्या मुलीवर ८ लाखांच्या ४ मोठ्या शस्त्रक्रिया जसलोक रुग्णालयात मोफत करण्यात आल्या. मुलीला तिच्या जन्मानंतर नीट चालता येत नव्हते. मात्र या ४ मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ती मुलगी चालू आणि धावू शकते. अशा कठीण काळात मदत केल्याबद्दल या मुलीच्या संपूर्ण कुटुंबाने आमदार नितेश राणे आणि सुशील यादव यांचे आभार मानले.
सुशील यादव म्हणाले की, शस्त्रक्रियेकरिताच्या मदतीसाठी मुलीचे आई-वडील आले होते. त्यानंतर जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमसोबत पाठपुरावा केल्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकली.
सुशील यादव हे केवळ वैद्यकीय उपचाराकरिताच मदत करत नाहीत, तर कठीण काळात गरिबांना रक्ताची मदत, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश आणि इतर सामाजिक कार्यातही ते नेहमीच उभे राहतात. आर्थिक समस्येमुळे किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे आरोग्याच्या मोठ्या समस्यांना तोंड देणारी अनेक मुले व त्यांचे पालक सुशील यादव यांना सामाजिक कार्यकर्ता आणि निस्वार्थी राजकारणी म्हणून ओळखतात. मला नेहमी गरजूंना मदत करणे आवडते आणि माझ्यासाठी राष्ट्र आणि मानवता प्रथम आहे, असे यावेळी सुशील यादव म्हणाले.