
- समर्थ कृपा : विलास खानोलकर स्वामींना अपेक्षित असलेली उपासना जाणत्याकडून माहीत करून घ्यावयास हवी. कालसुसंगत उपासना करणे, केव्हाही सोयीचे. अन्यथा जखम डोक्याला, बँडेज पायाला असे होते.
पुण्याचे आप्पासाहेब सबनीस ब्रह्मसमंधाच्या बाधेने त्रस्त होते. त्यावर उतारा म्हणून त्यांनी केलेल्या सुरुवातीच्या उपायांचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेरचा उपाय म्हणून गाणगापूरला जाऊन दत्तसेवा करावी, असे त्यांना वाटले. ते वाटणेही साहजिकच आहे. कारण त्यांचे मन रूढीप्रिय, देव-संकल्पनेने भारलेले होते. साधक-बाधक विवेकपूर्ण विचार करण्याच्या ते पलीकडचे होते. आपल्यातील काही लोक या सर्व भाकडकथा समजतात, काही शारीरिक आजार, असेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देतात, पण ती समाधानकारक व गुण आणणारी नसतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रसंगी म्हणजे भूतबाधा-पिशाच्च समंधाच्या वेळी व्यक्तिपरत्वे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अशा दोन्ही अंगांनी विचार व्हावयास हवा, असे केल्यास अनेक प्रश्न सद्यःस्थितीत सुटू शकतील.
दत्तसेवेसाठी गाणगापूरला जाण्याचा मनोदय व्यक्त करताच महाराज सबनीसास म्हणाले, जाऊ नका, आम्ही राखरांगोळी करून टाकू. यातून श्री स्वामींना हेही सांगावयाचे आहे की, दत्तप्रभू आणि आपण एकच आहोत. आम्ही राखरांगोळी करू, म्हणजे त्यांना असलेल्या पिशाच्चबाधेचा त्रास अक्कलकोटातच नष्ट करण्याचे एक प्रकारे अभिवचन श्री स्वामींनी सबनीसास दिले. लीलेत सांगितल्याप्रमाणे पाच वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर पिशाच्च सबनीसास सोडून गेले. खडतर एकनिष्ठेने सेवा केल्याचे फळ सबनीसांना मिळाले. म्हणून हातची स्वामी सेवा सोडून इतरांच्या मागे लागण्यात काय अर्थ? सबनीसांसंबंधीच्या लीला कथेतून काय घेता येईल? काय शिकता येईल? थोडीशीच नगण्य उपासना करून परमेश्वराकडून खूप अपेक्षा करणे चुकीचे आहे. श्री स्वामी समर्थांना अपेक्षित असलेली उपासना जाणत्याकडून माहीत करून घ्यावयास हवी. काल सुसंगत उपासना करणे, केव्हाही सोयीचे असते. नाही तर अनेकदा जखम डोक्याला, बँडेज पायाला असे होते. अशा उपासनेतून श्रम-वेळ-पैसा वाया जातो, हाताला फारसे काही लागत नाही. तेव्हा उपासनेतही सद्सदविवेक शुद्ध-निर्मळ आणि सरळ आचार-विचार आणि व्यवहार अपेक्षित आहे. उपासनेत सातत्य आणि वेळ याचा सुयोग्य मेळ असावा, श्रद्धा आणि सबुरी असावी, हाच इथला अर्थबोध आहे.
स्वामी वदे जन्म माझा वटवृक्षाखाली, ३०० वर्षे वाढल्या पारंब्या, साली ।। १।। अंगावरती वारूळ १००० वर्षे झाली, शंकर पार्वती दत्त प्रसन्न झाली ।। २।। नाही आदी, नाही अंत, लोक म्हणती हाच खरा संत ।। ३।। करती पूजा नाही भ्रांत, सारा भूमंडळ स्वामींचा प्रांत।। ४।। दया-क्षमा-शांती व्हा निवांत, सुखी व्हाल हा जन्म उपरांत ।। ५।। दूर करेन भूत बाधा, दत्त प्रसन्न बसले हृदयी बघा ।। ६।। मनी रहा दक्ष, पूजा वटवृक्ष, वाढवा झाडे हजारो वृक्ष ।। ७।। साऱ्या पशू-पक्ष्यांत आहे स्वप्न, ब्रह्मा विष्णू महेश माझेच स्थान।। ८।। आधुनिक वटपौर्णिमेच्या शुभ दिनी, पुसती आई ताई मावशी।। ९।। रहस्य काय बरे सुखी संसार, ज्याने होणार नाही तो असार ।। १०।। स्वामी वदती ऐका माझा आदेश, सांगतो सोपे सोपे संदेश ।। ११।। कलह नसावा घरामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये ।। १२।। तोंडात साखर, मनात साखर, हृदयात ठेवा अमृताची घागर ।। १३।। माणुसकीचा वाहवा झरा, हाच बोध मनामध्ये धरा ।। १४।। भांड्याला लागता भांडे, भांडण वाढता वाढता वाढे ।। १५।। सारे जग त्यातच बुडे, परग्रह त्यातच लुडबुडे ।। १६।। नका ठेवू फुका अहंकार, यमलोकी जाताच थांबेल फणकार ।।१७।। जे घरात तेच दारात, निघेल रस्त्यावरती वरात ।। १८।। छोट्या गोष्टीत नको राजकारण, संपेल घरातले भात-वरण ।। १९।। ज्याला लावला टिळा कपाळा, ज्याने दिला प्रगतीचा लळा।।२०।। ज्याने फुलविला सोन्याचा मळा, दाबू नका त्याचाच गळा ।।२१।। नको घरादाराला गर्व धनाचा, नको वृथा अभिमान पदाचा ।। २२।। ठेवा कुटुंब प्रमुखाचा मान, छोट्यांनाही सांभाळून वाढवा शान ।। २३।। एकमताने घ्या निर्णय, भाऊ-बहिणीत ठेवा प्रेम परीप्रय ।। २४।। करा प्रगती घरची, होईल साऱ्या भारताची ।। २५।। स्वामींचा हा संदेश, साऱ्या भक्तांना आदेश ।। २६।। स्वामी म्हणती ठेवा हिशोब, अर्थ याचा नाम हिशोब ।। २७।। नाही फक्त नामाचा हिशोब, आयुष्याच्या ताळतंत्राचा हिशोब ।। २८।। वेळ घटिका पळेचा हिशोब, देवकाऱ्यातील पै-पैचा हिशोब ।। २९।। व्यवहाराचा न ठेवता हिशोब, पावजी स्वामी होती क्रोध ।। ३०।। पण, भक्त प्रेमाचा नव्हता हिशोब, श्रीकृष्ण सुदामा नव्हता हिशोब ।। ३१।। मीरा-कृष्ण प्रेम नव्हता हिशोब, राधा-कृष्ण प्रेम नव्हता हिशोब ।। ३२।। माता-पुत्र प्रेम नाही हिशोब, आजोबा-नातू प्रेम नाही हिशोब ।। ३३।। गाय-बछडा प्रेम नाही हिशोब, चिमणी-पाखरा दाणा-पाणी नाही हिशोब ।।३४।। राम-हनुमान प्रेम नाही हिशोब, सीताराम-उमाशंकर नाही हिशोब ।।३५।। तुकाराम-विठ्ठल नाही हिशोब, पुंडलीक-पितृप्रेम नाही हिशोब ।।३६।। राम-लक्ष्मण होते बंधुप्रेम, वासुदेव-देवकी खरे प्रेम ।।३७।। कृष्ण-अर्जुन गुरुशिष्य प्रेम, लव-अंकुश-सीता-राम प्रेम ।।३८।। हिरकणीचे खरे पुत्र प्रेम, श्रीकृष्ण-बलराम बंधुप्रेम ।। ३९।। बाळप्पा-चोळप्पा स्वामी प्रेम, गुरुशिष्य अगणित प्रेम ।। ४०।। स्वामींचे साऱ्या विश्वावर प्रेम, दत्तगुरूंचे गाई-वासरे पुत्रप्रेम ।। ४१।। ज्ञानेश्वर-तुकोबा विठ्ठल प्रेम, जिजाई-शिवाई मातृप्रेम ।। ४२।। गणितात हिशोबात हवा हिशेब, प्रपंचात टाळावी चूक ठेवा खरा हिशोब।। ४३।। सार्वजनिक कार्यात चोख हिशोब, जनता खवळून होईल क्षोब ।। ४४।। स्वामी संदेश हृदयापासून स्वामीनाम, नेईल पैलतीरी संसार नाव ।। ४५।। न चुकता रोज घ्या बोध, स्वर्गात द्यावा लागणार नाही हिशोब ।। ४६।।
vilaskhanolkardo@gmail.com