Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदास नवमीला आले स्वामी गजानन...

दास नवमीला आले स्वामी गजानन…

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

श्री गजानन भक्त भाविक वाचक जन हो, बाळापूर येथे एक बाळकृष्ण नामे रामदासी व त्याची पत्नी पुतळाबाई राहत असत. हे दोघेही रामदास स्वामींचे परम भक्त होते. हे दोघेही प्रतिवर्षी पायी सज्जन गडाची वारी करीत असत. पौष महिन्यात आवश्यक ते पूजेचे व नित्योपयोगी साहित्य एका घोड्यावर लादून वारीकरिता निघत असत. अशा ह्या साधू वृत्तीच्या बाळकृष्ण बुवास व पुतळाबाईस साधुत्वाचा कोणताच मद नव्हता. ह्या वारी दरम्यान बाळकृष्ण बुवा ग्रामातून भिक्षा मागून आणीत व रामाला नैवेद्य करीत. बाळकृष्ण बुवा राम नामाचा गजर करत चंदनाच्या चिपळ्या वाजवीत, तर पुतळाबाई साथीला झांज वाजवीत, श्री रामाचे नाम घेत मार्गक्रमण करीत. ह्या सर्व प्रवासाचे वर्णन खालीलप्रमाणे ओवीबद्ध आहे :
बाळकृष्णबुवा हाती ।
चंदनाच्या चिपळ्या असती ।
पुतळाबाई करी साथी ।
झांज हाती घेऊन ।।९५।।
रघुपतीचा नाम गजर ।
करी पंथाने निरंतर।
शेगाव, खामगाव, मेहेकर ।
देऊळगाव राजा पुढे ।
आनंदीस्वामींस जालनापुरी।
वंदूनिया जांब नगरी ।
जाय तेथें मात्र करी ।
तीन दिवस मुक्काम ।।९६।।
कां की ते ठिकाण।
समर्थांचे जन्मस्थान।
पुढे दिवऱ्यास येऊन।
वंदन करी गोदेला ।।९७।।
पुढे बीड अंबेजोगाईचे।
मोहिरी बेलेश्वर स्वामींचे ।
पट्टशिष्य समर्थांचे ।
डोमगावी कल्याण ।
नरसिंगपूर पंढरपूर ।
नातेपोते शिंगणापूर ।
वाई आणि सातारा ।
असे जे गडाच्या पायथ्याशी ।।९८।।
असा पायी प्रवास करून हे उभयतावद्य प्रतिपदेला सज्जन गडास नवमीच्या उत्सवाकरिता पोहोचत असतं. समर्थांच्या नावाने यथा शक्ती ब्राह्मण भोजन घालीत असत आणि माघ वद्य द्वादशी दिवशी बाळापुरास जाण्याकरिता निघत. ह्याप्रमाणे अनेक वर्षे त्या दोघांचा हा क्रम सुरू होता.

वद्य एकादशीला बाळकृष्ण बुवा समर्थसमाधी जवळ बसले. त्यांचे भाव उचंबळून आले. अश्रूपूर्ण नयनांनी ते रामदास स्वामींना म्हणाले, ‘‘हे रामदास स्वामी समर्था, माझे शरीर आता थकले आहे. येथून पुढे पायी वारी मजकडून होणार नाही. वाहनात बसून यावे, तर तेही शक्य वाटत नाही. आपण तर सर्वच जाणता. असे भावपूर्ण बोलणे करून बाळकृष्णबुवा शय्येस जाऊन निजले. पहाटेच्या वेळी स्वप्नात रामदास स्वामींनी त्यांना दर्शन दिले व सांगितले, ‘हताश होऊ नकोस. येथून पुढे सज्जन गडास येऊ नको. माझी तुझ्यावर कृपा आहेच. यापुढे दास नवमीचा उत्सव तू आपल्या घरीच बाळापुरास करीत जा. तुला दर्शन देण्याकरिता मी नवमीला येईन, हे माझे तुला प्रमाण वचन आहे. आपली शक्ती पाहून परमार्थाचे आचरण करावे,’’ असे स्वप्न पाहून बाळकृष्ण बुवांना आनंद झाला व ते पत्नीसह बाळापुरास परत आले. पुढील वर्षी माघ वद्य प्रतिपदेस बाळकृष्ण बुवांनी बाळापुरास आपल्या घरी समर्थांचा उत्सव सुरू केला. गावातील लोकांनी सुद्धा वर्गणी गोळा करून ह्या कार्यास हातभार लावला.

रोज दासबोधाचे वाचन, ब्राह्मण भोजन, सायंकाळी धूप-आरती व रात्रीस हरिकीर्तन असा कार्यक्रम सुरू झाला. हा उत्सवाचा थाट नऊ दिवस झाला. नवमीच्या दिवशी बाळकृष्ण बुवांच्या घरी रामाभिषेक सुरू होता. तेवढ्यात त्यांच्या द्वाराशी समर्थ श्री गजानन महाराज येऊन उभे राहिले. त्यांना पाहून लोक विस्मित झाले. बाळकृष्ण बुवांना सांगू लागले की, ‘तुमच्या घरी दास नवमीच्या दिवशी स्वामी गजानन आले आहेत.’ त्यावर बाळकृष्ण बुवा म्हणाले, ‘‘श्री गजानन महाराज आले, हे फार बरे झाले. पण, आज मी समर्थ रामदास स्वामींची आतुरतेने वाट बघत आहे. त्यांचा माझ्याशी करार आहे, त्याप्रमाणे मला भरावसा आहे की, रामदास स्वामी नक्की येतील.’’ इतक्यात गजानन महाराज द्वारावर उभे राहिले आणि त्यांनी श्लोक म्हटला.
अहिल्या शीळा राघवे मुक्त केली।
पदी लागता दिव्य होऊन गेली।
हा श्लोक ऐकून बाळकृष्ण बुवा उठून दाराशी आले, तो त्यांना गजानन महाराज दारात निजनंदात उभे असलेले दिसले. बाळकृष्ण बुवा त्यांना नमस्कार करू लागले. तेव्हा त्यांना महाराजांच्या जागी रामदास स्वामी दिसले. पुन्हा पाहिले, तर गजानन महाराज दिसले. रामदास स्वामी नाहीत, असे पाहून पुन्हा ते हताश झाले. पुन्हा पाहिले, तर रामदास स्वामी दिसले. बाळकृष्ण बुवांच्या मनात चाललेला हा गुंता सोडविण्याकरिता गजानन महाराज त्यांना म्हणाले, “तुझे मन गांगरू नको देऊ. आधी माझी वस्ती सज्जन गडावर होती. आता शेगावात मळ्यात येऊन राहिलो आहे. तुला मी सज्जनगडावर वचन दिले होते की, मी दास नवमीस बाळापुरास येईन, त्या वचनाची पूर्तता करण्याकरिता येथे आलो आहे. अवघी चिंता सोडून दे. अरे मीच रामदास आहे. मला पाटावर बसव आणि पूजा कर.’’ संपूर्ण दिवस बाळकृष्ण बुवा ह्याचा विचार करत राहिले. रात्री तिसऱ्या प्रहरी बाळकृष्ण बुवांना स्वप्न पडले. त्या स्वप्नात श्री रामदास स्वामींनी बुवांना सांगितले की, ‘‘गजानन ही माझीच मूर्ती आहे. आता वाऱ्हाड प्रांतात आहेत. ह्याबाबत मनात संशय बाळगू नकोस. मीच आहे असे समजून गजानन महाराजांचे पूजन कर.’’ असे स्वप्न पाहिल्यावर बाळकृष्ण बुवांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी श्री गजानन महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्यांची प्रार्थना केली. दासगणू महाराज ह्या प्रसंगाची ओविबद्ध रचना करतात :
रामदासी अवघ्या दिवसभर।
करीत राहिला विचार ।
शेवटी रात्र होता तीन प्रहर।
स्वप्न पडले बाळकृष्णा।।४५।।
अरे, गजानन
माझीच मूर्ती ।
हल्ली तुमच्या वऱ्हाड प्रंती ।
संशय मुळी ना धरी चित्ती ।
तो धरिता बुडशिल ।।४६।।
मी तोच समजून ।
करी गजाननाचे पूजन ।
गीतेचे हे आहे वचन ।
संशयात्मा विनष्यती ।
ऐसे स्वप्न पडल्यावरी ।
बाळकृष्ण तोषला भारी ।
मस्तक ठेविले अत्यादरी ।
गजाननाचे पायावर ।।४७।।
महाराज आपुली लीला ।।
मी ना समर्थ जाणण्याला ।
तो घोटाळा उकलिला ।
तुम्ही स्वप्न देऊन ।।४८।।
नवमी माझी सांग झाली ।
न्यूनता काही न उरली ।
अर्भकावरी कृपा केली ।
तेणे धन्य झालो मी ।।४९।।
हा प्रसंग झाल्यावर श्री गजानन महाराज भोजनोत्तर शेगाव येथे इतक्या जलद गतीने पोहोचले की, कोणालाही जाताना दिसले नाहीत.
(आता देखील बाळकृष्ण बुवांचे वंशज दासनवमीचा उत्सव प्रतिवर्षी बाळापूर येथे साजरा करतात.)
क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -