रत्नागिरीसह कोल्हापूर, बेळगाव, सातारा, कराड, पुणे आणि मुंबई इत्यादी शहरांमधून आकर्षक सजविलेल्या रिक्षा सहभागी होणार
रत्नागिरी (प्रतिनिधी) : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून रत्नागिरी रिक्षा सुंदरी अशी अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा रविवारी दिनांक ३० एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. रिक्षा व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. काही चालक रिक्षाला खूप चांगल्या पद्धतीने जपतात. अशा रिक्षा चालक मालकांसाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार साळवी आणि सदस्य बाबय भाटकर यांनी सांगितले.
ही स्पर्धा रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कल येथील हॉटेल वायंगणकर शेजारी असलेला पार्किंगच्या जागेत आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये दोन गट निश्चित केले असून पहिला गट २०१९ ते २०२३ या कालावधीमधील रिक्षा आणि दुसऱ्या गटामध्ये २०१९ पूर्वीच्या सर्व रिक्षांना सहभागी होता येईल. या रिक्षा सौदर्य स्पर्धेतील विजेत्यांना २१,०००/-, ११,०००/, ८००१/- आणि ५००१/- रुपये रोख रक्कम, आकर्षक चषक आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरीसह कोल्हापूर, बेळगाव, सातारा, कराड, पुणे आणि मुंबई इत्यादी शहरांमधून आकर्षक सजविलेल्या रिक्षा सहभागी होणार आहेत. यावेळी दोन चाकांवर रिक्षा चालवणे, रिव्हर्स गिअरमध्ये रिक्षा चालवणे यासारखी चित्तथरारक प्रात्यक्षिकेही दाखवण्यात येणार आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते विजेत्या रिक्षाचालकांचा तसेच प्रामाणिक आणि ज्येष्ठ रिक्षाचालकांचा सत्कारही केला
जाणार आहे.