मुंबई (प्रतिनिधी) :
गेल्या वर्षी एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने पालिकेतील विद्यार्थी संख्या सध्या चार लाखांवर पोहोचली आहे. विद्यार्थीसंख्येत वाढ झाली असली तरी आसनव्यवस्था मात्र जुनीच आहे. एका बेंचवर तीन विद्यार्थी बसत असल्याने उठता-बसता विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता पालिकेने नवीन बेंच व खुर्च्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नवीन बेंच व खुर्च्या मिळणार आहेत. १९ हजार बेंच व खुर्च्यांच्या खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे एका बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थांची गैरसोय होणार नाही आणि नवीन बेंच व खुर्च्यांमुळे वर्गात आरामदायक वाटेल.
मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. तसेच मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात येते. गेल्या वर्षी एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने पालिकेतील विद्यार्थी संख्या सध्या चार लाखांवर पोहोचली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक इंग्रजी शाळांमध्ये आसन व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी आरामदायक असते. आता त्याच धर्तीवर मुंबई महापालिका शाळांमध्ये आसन व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी नवीन बेंच उपलब्ध करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खुर्ची असणार आहे.
लाकडी बाकडी होणार हद्दपार…
महापालिका शाळांमध्ये वर्षानुवर्षे वापरात असलेली लाकडी बाकडी आता हद्दपार होणार आहेत. सध्या सर्व इयत्तांसाठी एकसमान लाकडाची बाकडी असून, त्यावर सर्वच वयोगटांतील विद्यार्थ्यांना बसणे गैरसोयीचे होत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे एका बेंचवर अनेक विद्यार्थी बसल्याने होणारी गैरसोय यापुढे होणार नाही आणि नवीन बेंच व खुर्च्यांमुळे वर्गात आरामदायक वातावरण असेल. वयोमान व इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना सोयीची होईल, अशी आसनव्यवस्था असणे आवश्यक असताना पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आसनव्यवस्थेकडे पालिकेचे अनेक वर्षे दुर्लक्ष होत होते. पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकसमान आसनव्यवस्था आहे. त्यामुळे शाळेत मोठ्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अत्यंत गैरसोयीचे ठरते. पालिकेच्या शाळा दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्यात येतात. त्या विद्यार्थ्यांनाही शाळेतील आसनव्यवस्थेचा त्रास होतो. त्यामुळे पालिका व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्तानिहाय सुसज्ज अशी स्वतंत्र आसनव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना पुढे आली होती. या सूचनेवर पालिका प्रशासनाने लेखी उत्तर दिले असून, त्यात शाळांमध्ये लहान-मोठ्या अशा चार वेगवेगळ्या आसनव्यवस्था विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.