Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाIPL 2024कोलकाताची बंगळूरुवर बाजी

कोलकाताची बंगळूरुवर बाजी

सांघिक कामगिरी फळली

बंगळूरु (वृत्तसंस्था) : फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर केलेल्या सांघिक कामगिरीमुळे कोलकाताने बंगळूरुवर २१ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीत जेसन रॉय, नितीश राणा यांनी चांगली खेळी खेळली. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुयश शर्मा यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहलीने एका बाजूने चांगली फलंदाजी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. फटकेबाजी करत असलेला फाफ डु प्लेसीस मोठे फटके मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. त्याने ७ चेंडूंत १७ धावा केल्या. त्यानंतर शाहबाज अहमद आणि ग्लेन मॅक्सवेल दुहेरी धावाही न जमवता माघारी परतले. ५८ धावांवर बंगळूरुचे ३ फलंदाज बाद झाले होते. कोहली आणि महिपल लोमरोर ही जोडी सेट झाली. त्यामुळे बंगळूरुने अपेक्षित धावगती राखण्यात यश मिळवले. ही जोडी बंगळूरुला विजय मिळवून देणार असे वाटत होते. येथे वरुण चक्रवर्ती कोलकाताच्या मदतीला आला. त्याने ३४ धावा करणाऱ्या लोमरोरला बाद करत कोलकाताला मोठे यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ विराटचाही संयम सुटला. कोहलीने संघातर्फे सर्वाधिक ५४ धावा केल्या. हे दोन्ही सेट झालेले फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यामुळे बंगळूरुचा संघ अडचणीत सापडला. अनुभवी दिनेश कार्तिकने २२ धावा करत थोडाफार प्रतिकार केला. परंतु त्यानंतर विजय मिळवणे संघासाठी अवघड झाले. बंगळूरुने निर्धारित षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १७९ धावांपर्यंतच मजल मारली. कोलकाताचे वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुयश शर्मा या गोलंदाजांच्या तिकडीने विजयात सिंहाचा वाटा उचलला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या जेसन रॉय आणि नारायण जगादेसन यांनी छान सुरुवात केली. नारायणने संथ फलंदाजी केली असली तरी त्याची भरपाई जेसन रॉयने भरून काढली. ४ चौकार ठोकूनही नारायणने २९ चेंडूंत २७ धावा केल्या. मात्र दुसरा सलामीवीर जेसन रॉयने २९ चेंडूंत ५६ धावा तडकावल्या. संघाची धावसंख्या ८३ असताना नारायणच्या रुपाने कोलकाताला पहिला धक्का बसला. विजयकुमार व्यशकने नारायणचा अडथळा दूर केला. त्याच षटकात व्यशकने जेसन रॉयलाही माघारी धाडले. जेसन रॉयच्या रुपाने कोलकाताची दुसरी विकेट पडली. रॉयने ५६ धावा फटकावल्या. मधल्या फळीत नितीश राणाने व्यंकटेश अय्यरच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. राणाने २१ चेंडूंत ४८ धावांची खेळी करताना ३ चौकार आणि ४ षटकार मारले. व्यंकटेश अय्यरने ३१ धावांची भर घातली. शेवटच्या षटकांत रिंकू सिंहने १० चेंडूंत नाबाद १८ धावांची भर घातली. तर डेविड वाईसने ३ चेंडूंत नाबाद १२ धावा चोपल्या. कोलकाताने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात २००
धावा जमवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -