मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात मुंबई आहे. आपण मुंबईचे मानकरी आहोत. राज्याबाहेरुन येणारे लोक मुंबईत यशस्वी उद्योजक होत आहेत. देशाच्या अर्थकारणात मुंबई ३४ टक्के योगदान देते. यामध्ये मराठयांचे योगदान हवे असून आपण अर्थव्यवस्थेचे मानकरी झाले पाहिजे, असे प्रतिपादन सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ प्रणित भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आणि ऑल इंडिया कन्झुमर फॉर्म यांच्यावतीने षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मी उद्योजक होणारच या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात संघटनांच्यावतीने देण्यात येणारा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार अॉड. शशिकांत पवार यांना देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुढे नारायण राणे म्हणाले की, आताच्या पिढीला महाराजांचा इतिहास सांगून उपयोग होणार नाही. तर तरुण पिढीला उद्योजक होण्याचा मार्ग दाखवला पाहिजे. त्यासाठी तरुणांना प्रेरणा दिली पाहिजे. माझा मराठा समाज सुखी, समाधानी आणि श्रीमंत व्हावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. केवळ पुरस्काराचे कार्यक्रम घेऊन उपयोग नाही. त्यासाठी तरुणांना तज्ञांकडून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार असल्याचे, ते म्हणाले.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जंगलाचा मी आता अभ्यास करण्यास सांगितले आहे. या जंगलामध्ये औषधी वनस्पती आढळल्या तरी त्यामधून उद्योग निर्माण करता येऊ शकतो. आपले तरुण शिकण्यास बाहेर जातात. तिथेच नोकरी पत्करतात. मात्र आपण तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांना कोणत्या उद्योगात फायदा आहे हे सांगितले पाहिजे, यासाठी दिल्लीत आमचा विभाग इन्स्टिट्यूट उभारत असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांनी आपल्या आवडत्या उद्योजकांचा फोटो घरात लावला पाहिजे. त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. तरुणांनी मुकेश अंबानी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
या कार्यक्रमात गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील, निर्माण ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, उद्योजक सुरेश हावरे, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी भूषण जाधव, नितीन कोलगे, अमित बागवे, प्रकाश बाविस्कर, नीलम जेठमलानी, उमेश चव्हाण, संजय यादवराव, नामदेव जाधव आदींचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
‘नोकऱ्या देणारे हात तयार झाले पाहिजेत’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या या अतिशय स्तुत्य उपक्रमाला चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. मराठा समाजातील उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असते. म्हणून मराठा समाजातील तरुण शेती नोकरी पुरते मर्यादित न राहता उद्योजक म्हणजे नोकऱ्या देणारे हात तयार झाले पाहिजेत, असे बाळासाहेब आम्हाला नेहमीच सांगत असत. खऱ्या अर्थाने आजचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ते मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी महत्वाचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले ही समाजाची आणि काळाची गरज आहे. मराठा समाज खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. तरुण स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्याची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे.