शोधाशोध करणा-या वनाधिकाऱ्यांची दमछाक झाली पण कुठेच नाही सापडली!
भोपाळ : नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या या चित्त्यांना कदाचित मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आवडले नसावे. ‘ओबान’ उर्फ ‘पवन’ याने दोनदा कुनोच्या जंगलातून बाहेर धूम ठोकली होती. आता ‘आशा’ ही मादी चित्तादेखील उद्यानातून बाहेर पळाली आहे. त्यामुळे त्यांना शोधताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
‘पवन’ हा दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन पोहोचला. महत्प्रयासानंतर त्याला उद्यानात परत आणण्यात यश आले. आता मादी चित्ता ‘आशा’ कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे. शिवपूरी जिल्ह्यातील बैराड तहसीलच्या धोरिया गाझीगढच्या हिरवाईत तिचे शेवटचे ठिकाण होते. कुनो वनखात्याचे पथक आता त्याठिकाणी पोहोचले असून तिला लावलेल्या ‘रेडिओ कॉलर’च्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधला जात आहे.
घरातल्या पाळीव मांजराला घरापासून कितीही दूर अंतरावर अगदी मच्छीमार्केटमध्ये सोडले, तरी ते न चुकता रस्ता शोधत पुन्हा मालक गरीब असला तरी त्याच्या घरी येतेच. त्याचप्रमाणे वाघालाही हे नैसर्गिक वरदान मिळाले आहे. त्यामुळे त्याला एका जंगलातून उचलून दुसऱ्या जंगलात सोडले, तरी लांब पल्ला कापून तो पुन्हा मूळ अधिवासामध्ये परततोच. पण येथे तर सातासमुद्रापार आलेले हे वाघ कुठे जायचे अशा बुचकळ्यात पडलेले दिसून येतात.
विशेष म्हणजे, या चार दिवसात तिने एकदाही शिकार केलेली नाही, त्यामुळे वन खात्याचे अधिकारी चिंतेत आहेत. आधीच एका महिन्याच्या कालावधीत दोन चित्ते मृत्युमुखी पडले. २७ मार्चला नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता ‘साशा’ हिचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. तर २४ एप्रिलला ‘उदय’ या चित्त्याचा हृदय निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. काहीही खाल्ले नसल्याने ‘आशा’ची तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांमधील चिंता वाढली आहे.