- फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
मी माणूस ओळखण्यात चुकलो, मला अजिबात माणसं ओळखू येत नाहीत, मला वाटलंच नव्हतं तो किंवा ती अशी बदलेल, मला कळलंच नाही असं कसं झालं, हे माझ्यासोबतच का होतं? लोकं माझाच गैरफायदा घेतात का? मलाच लोकं फसवतात, माझाच विश्वासघात का होतो? मला वापरून घेतात, नंतर विसरून जातात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अनेकांकडून यासारखे वक्तव्य ऐकत असतो. याही पलीकडे जावून पाहिलं तर प्रत्येकाला असंच वाटत असतं की, मी खूप सरळमार्गी आहे, मी कधी कोणाला फसवलं नाही, कोणाला दुखावलं नाही, मी कोणाचं वाईट केलं नाही. मी निस्वार्थीपणे सगळ्यांना मदत केली, सगळ्यांना समजावून घेतलं, होईल तेवढी मदत करत आलो मग मलाच अशी वागणूक का?
आपल्याला, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच समाजातून, कुटुंबातून, नातेवाइकांकडून, मित्र-मैत्रिणी इतर मंडळींकडून असे अनुभव येत असतात की, मी यांना ओळखू शकलो नाही, हे बदलले, हे आधी असे वागत नव्हते आता असे का वागत आहेत? आपल्याला वाटतं कोणी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला, कोणाला वाटतं आपल्याला लोकच धर्जिणे नाहीत, कोणाला वाटतं आपल्या भोळ्या, सरळ स्वभावाचा फायदा लोकांनी करून घेतला. आपल्या आयुष्यात असलेल्या, संपर्कात आलेल्या प्रत्येकाची जीवनशैली, मानसिकता, विचार, जगण्याची तसेच वागण्याची पद्धत, स्वअनुभव, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. तसेच त्यांना स्वतःला येणारे आणि आलेले अनुभव पण अनेक प्रकारचे असतात. म्हणूनच माणसं सतत बदलत असतात.
काल आपल्याशी एकदम नीट वागलेला माणूस आज नीट वागेल, याची शाश्वती नाही. दोन दिवसांपूर्वी दिलेला शब्द तो आज खरा करेल, याबाबत भरोसा नाही. काल त्याचा मूड जसा होता, तसा तो कायम असेल, हा पण भरवसा नाही. आपण मात्र विचार करत बसतो, याला काय झालं, माझं काही चुकलं का, मी कुठे कमी पडलो? तसं काहीही असो अथवा नसो. तरीही पूर्ण जग आणि त्यानुसार जीवन पण बदलत आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूची माणसं पण बदलत आहेत. हेच सत्य आपण स्वीकारत नाही म्हणून आपल्याला मानसिक यातना होतात. आपण आपल्यापेक्षा जास्त इतरांचा विचार करत राहतो, इतरांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादावर आपली मानसिकता अवलंबून ठेवतो म्हणून आपण दुःखी होतो. जग जितक्या जलद गतीने बदलते तितकेच ताबडतोब लोक बदलतात. कारण त्यांना या बदलत्या जीवनाशी जुळवून घ्यायचं असते. लोकांना मागे पडायचं नसतं, मागे राहायचं नसते. काल काय घडलं, काल काय बोललो, काल काय ठरवलं हे ते आज विसरतात, कारण त्यांना आजमध्ये जगायचं असतं आणि उद्याची तयारी करायची असते.
खूप कमी माणसं अशी असतात, जी इतरांशी नसतील पण स्वतःशी प्रामाणिक असतात. त्यांच्या आयुष्यात काही तत्त्व, मूल्य त्यांनी जोपसलेली असतात आणि ती अमलात आणणे ते स्वतःचं कर्तव्य समजतात. समाजात बहुतांश लोकं असेच असतात ज्यांच्यासाठी आपण फक्त एक पर्याय असतो. जमलं तर ठीक, नाही जमलं तरी ठीक. संबंध राहिले काय, तुटले काय. आपल्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली गेली की नाराज झाली, याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते. त्यांना भूतकाळात राहायचं नसते. जेवढा जितका संबंध आला, काम झालं, तेवढ्यापुरत्या भेटीगाठी झाल्या की लगेच पुढील मार्ग धरायचा. झाली घटना, झाली गोष्ट तिथेच विसरायची, ती व्यक्ती पण विसरायची आणि पुढे जात राहायचं हा जीवनाचा नियम झाला आहे.
आपल्या स्वतःच्या वैयक्तिक मतांना, आपल्या जगण्याच्या आणि विचाराच्या पद्धतीला जो मॅच असेल तो टिकेल, आपल्याला जितकं आणि जे देणं शक्य आहे तितकं घेऊन जो गप्प बसेल तो राहील, जो नसेल तो आपोआप दूर होईल. त्यासाठी, त्याला टिकवण्यासाठी, ती ओळख, ते नातं समृद्ध करण्यासाठी कोणतेही कष्ट, त्रास घेणे अशा लोकांना गरजेचे वाटतं नाही. आपण इतकं प्रॅक्टिकल, प्रोफेशनल वागल्यावर आपल्याबद्दल कोण, काय विचार करेल, कोण काय बोलेल, कोणाला काय वाटेल याचा त्यांना काडी मात्रही फरक पडत नाही. जीवनाचे अतिशय सरळ, सोपं, साधं गणित मांडून लोकं जगत असतात. कोणासाठी थांबणं, कोणाला सांभाळणं, जपणं, वाट पाहणं, स्वतःला बदलणं, थोडं झुकणं, थोडं वाकणं, कोणाचा विचार करणं, कोणासाठी वेळ देणं याची लोकांना गरज वाटत नाही. कोणाला वेळ दिलाच तर तो फक्त कामापुरता, अगदीच वेळात वेळ काढून उपकार केल्यासारखं तोदेखील ठरावीक तेवढ्या विषयापुरताच ! ही सवय अनेकांना लागलेली आहे.
आपण कामात खूप व्यस्त आहोत, आपल्याला बोलायला, भेटायलादेखील वेळ नाही, कोणाची सुख-दुःखे, ख्याली-खुशाली विचारायची गरज नाही, अशी वृत्ती अनेक लोकांमध्ये पाहायला मिळते. आपण किती बीझी असतो, आपल्यालाच कसे व्याप आणि जबाबदाऱ्या आहेत, रिकामा मोकळा वेळच मिळत नाही हे दाखवणे, तसं भासवणे आजकाल लोक काळाची गरज मानतात. प्रत्यक्ष भेटणे तर सोडाच पण कोणाच्याही फोनला, मेसेजला वेळेत रिप्लाय देणे, त्याची दखल घेणे हा शिष्टाचार पण अनेकांना जमत नाही. आपण कधीच फ्री नसतो, आपल्याला खूप कामं असतात, हे सांगण्यात, तसं दाखवण्यात लोकांना खूप मोठं कर्तृत्व वाटते पण ते त्यांचं वैचारिक दारिद्र्य असते.
आपलं जे चाललंय ते बरं आहे, आपल्यापुरत बघा, कोणाची काळजी करायची गरज नाही, कोणाची काळजी घेण्याची गरज नाही. कोण आपल्यासाठी रडतोय, कोण आपल्यासाठी झुरतोय, कोण कुढतोय, कोण आपल्यामुळे दुःखी होतोय, कोणाचा अपेक्षा भंग होतोय या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारण्यात लोकं आता पारंगत झालेले आहेत. कोणाच्याही फंदात पडायचं नाही, काहीही अंगाला लावून घ्यायचं नाही अशी मानसिकता आजमितीला समाजात बोकाळताना दिसते आहे.
मुळात लोकांना कोणाच्याही अपेक्षाचं ओझं वहायचं नसतं, अपेक्षा पूर्ण करणं तर दूर पण त्या समजावून घेण्याची पण तयारी आजमितीला राहिली नाही हे बदलत्या जीवन प्रणालीचं दुर्दैव आहे. कोणामध्ये अडकायचं नसतं, कोणासाठी बदलायचं नसतं आणि कोणासाठी काही करायचं पण नसतं म्हणून लोकं बोलताना काहीही बोलले तरी त्या बोलण्यात काहीही अर्थ आणि अधिष्ठान नसते. सगळं काही तात्पुरत, तेवढ्यापुरत, वेळ मारून नेण्यासाठी, स्वतःची त्या वेळेपूरती छाप पाडण्यासाठी, समोरच्याचा विश्वास संपादन करण्यासाठी अतिशय उथळ आणि वरवरचं असत. आपल्या वाक्याला, वागणुकीला, आपल्या शब्दाला काहीतरी महत्त्व आहे, किंमत आहे हेच त्यांना माहिती नसतं तर इतरांच्या शब्दाला ते काय महत्त्व देतील? ज्यांचे स्वतःचेच विचार उथळ असतील ते इतरांच्या विचारांची खोली कशी जाणून घेऊ शकतील? जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत ते इतरांशी कसे प्रामाणिक राहतील हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.
[email protected]