मुरूड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांना शेतक-याकडून गांडूळ खतासाठी शेड च्या परवानगी घेण्यासाठी पन्नास हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत शेतीसाठी तक्रारदार शेतकरी याला गांडूळ खतासाठी शेड तयार करायची होती. त्यासाठी त्याने उसरोली ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. सदर परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग रायगडने रंगेहाथ पकडले आहे. यासाठी पंचाहत्तर हजाराची मागणी करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ठाणे परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे,पोहवा विनोद जाधव, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागळे, पोना जितेंद्र पाटील यांनी सापळा रचून कारवाई यशस्वी केली.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली तर तात्काळ दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२३३१ / टोल फ्री क्र. १०६४ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टीकरप्शन ब्युरो, रायगड तर्फे करण्यात आले आहे.