Thursday, October 23, 2025
Happy Diwali

ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार?

ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार?

माजी खासदार निलेश राणे यांचा खडा सवाल

रत्नागिरी : राजापूर बारसू गावामध्ये जी रिफायनरी येऊ पाहते आहे त्याबद्दल अफवा आणि काही लोकं काड्या घालायचा प्रयत्न करतायेत त्याला यश येणार नाही. रिफायनरीविरोधात लोकांना भडकवण्याचा उद्धव ठाकरे, विनायक राऊत यांचा डाव आम्ही सफल होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी इशारा दिला आहे.

बारसू गावामध्ये प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षण सुरु आहे. मात्र या माती परीक्षणालाही काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या ग्रामस्थांना समजावण्याचे काम प्रशासन करत असतानाच आज अचानक खासदार विनायक राऊत यांनी आंदोलकांची भेट घेतली. मात्र त्यांच्या या भेटीची माजी खासदार निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.

गेली अनेक दिवस बारसू परिसरातील काही ग्रामस्थ विरोधाच्या भूमिकेत आहेत, मात्र तेव्हा त्यांना भेटण्याची इच्छा राऊत यांना झाली नाही. आता या परिसरात आजूबाजूला कॅमेरे लावले आहेत म्हणून केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी राऊत यांनी या आंदोलकांची भेट घेतली, अशा शब्दात निलेश राणे यांनी राऊत यांच्या या भेटीची खिल्ली उडवली आहे.

या भेटीदरम्यान राऊत यांनी आंदोलकांना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. यावरही निलेश राणे यांनी टीका केली आहे. माझी अख्खी शिवसेना तुमच्या पाठीशी उभी करतो सांगणाऱ्या ठाकरेंच्या पाठीशी नेमकी किती शिवसेना उरली आहे, असा सवाल करत ज्यांच्याकडे नाव नाही, चिन्ह नाही, पक्ष नाही ते आंदोलकांच्या पाठीशी नेमका कोणता पक्ष उभा करणार, असा सवाल राणे यांनी केला आहे.

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या माती परीक्षणाचे काम होत असताना प्रशासन आंदोलकांना समजावण्याचे काम करत आहे. त्यावेळी आग लावण्याचे, जनतेला भडकविण्याचे काम विनायक राऊत करत आहेत, असा थेट आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र पालकमंत्री, प्रशासन ग्रामस्थांना समजाविण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यातून हा प्रकल्प उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्याला लवकरात लवकर दिशा मिळेल, असेही निलेश राणे म्हणाले. विनायक राऊत यांचे कुटील डाव आम्ही उधळून लावू, त्यांच्या कोणत्याच प्रयत्नांना आम्ही यश येऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा