Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मुरूड परिसराला विषारी वायूचा विळखा!

मुरूड परिसराला विषारी वायूचा विळखा!

पहाटे धुक्याऐवजी विषारी धुराची चादर

  • संतोष रांजणकर

मुरूड : मुरूड-एकदरा परिसराला विषारी वायूने विळखा घातला आहे. या भागात पहाटेच्या वेळी धुक्याऐवजी प्लॅस्टिकच्या विषारी धुराची चादर पसरते. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना ऑक्सिजन ऐवजी प्रदुषित विषारी वायुचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेकदा तक्रारी करुनही कोणीच दखल घेत नसल्याने हे रोजचेच झाले, असा तीव्र संताप स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. "रोज मरे त्याला कोण रडे" अशी येथील दयनीय अवस्था झाली असूनही या भंगारवाल्यांवर संबंधित अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

या परिसरात भंगारवाले भंगारमध्ये मिळणाऱ्या केबल जमा करून यातील तांब्याच्या (कॉपर) तारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाळ करतात. यामुळे प्लॅस्टिक पासून निर्माण होणारा विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेमध्ये पसरुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या धुराचे प्रमाण इतके असते की संपुर्ण परिसरात धुक्याऐवजी काळ्याभोर विषारी धुराची चादर पसरलेली पहावयास मिळते.

पहाटे स्वच्छ हवेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेक ग्रामस्थ फिरायला येत असतात. या फिरणाऱ्यांना ऑक्सिजन ऐवजी प्रदुषित विषारी प्लॅस्टिक धुराचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या प्रदुषण करणाऱ्या भंगारवाल्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >