Monday, March 17, 2025
Homeक्रीडाIPL 2024गुजरातच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे लोटांगण

गुजरातच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे लोटांगण

टायटन्सच्या विजयात नूर अहमद, राशिद खान, मोहित शर्मा चमकले

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातच्या सांघिक फलंदाजीसमोर मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे टायटन्सने २०७ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर प्रतिकार करताना इंडियन्सच्या प्रमुख फलंदाजांची घसरगुंडी झाली आणि मुंबईने ५५ धावांनी मोठा पराभव स्विकारला. नूर अहमद, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी मुंबईच्या फलंदाजीचा कणा मोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गुजरातने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या प्रमुख फलंदाजांनी निराश केले. तेथेच मुंबईच्या पराभवाचा पाया रचला गेला. रोहित शर्मा अवघ्या २, तर इशान शर्मा १३ धावा करून तंबूत परतले. तिलक वर्मा २ धावा करून माघारी परतला. टीम डेव्हिडला तर भोपळाही फोडता आला नाही. कॅमेरॉन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी करून थोडाफार प्रतिकार केला. परंतु त्यांनाही फार काळ मैदानात तग धरता आला नाही. ग्रीनने ३३, तर सूर्याने २३ धावांचे योगदान दिले. अवघ्या ५९ धावांवर मुंबईचे ५ फलंदाज माघारी परतले होते. प्रमुख फलंदाज तंबूत परतल्याने मुंबईचा पराभव जवळपास निश्चितच होता. नेहल वधेराने पियुष चावलाच्या साथीने मुंबईच्या पराभवाची तीव्रता थोडीफार कमी केली. वधेराने २१ चेंडूंत ४० धावांचे योगदान दिले. त्याला पियुषने १८ धावांची साथ दिली. तळात अर्जुन तेंडुलकरच्या १३ धावांची भर पडली. मुंबईने निर्धारित षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातच्या नूर अहमद, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रभावी गोलंदाजी केली. नूरने ३, तर राशिद आणि मोहित यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

मोहम्मद शमीला विकेट मिळवता आली नसली तरी त्याने धावा मात्र चांगल्याच रोखून धरल्या. हाय स्कोअरिंक सामन्यात त्याने ४ षटके फेकत केवळ १८ धावा दिल्या. शुभमन गिल याचे दमदार अर्धशतक आणि डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांची वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित २० षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली. गिलने ५६ धावांची खेळी केली. डेविड मिलरने ४६, तर मनोहरने झटपट ४२ धावांची खेळी केली. अखेरीस राहुल तेवातिया याने तीन षटकार लगावत गुजरातची धावसंख्या २०० च्या पुढे पोहचली. सलामी फलंदाज शुभमन गिल याने दमदार फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना गिल याने दुसऱ्या बाजूने दमदार फलंदाजी केली. गिलने अवघ्या ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. मुंबईच्या पियुष चावलाने ४ षटकांत ३४ धावा देत २ विकेट मिळवल्या. अर्जुननेही चांगली गोलंदाजी केली. त्याने २ षटकांत ९ धावा देत १ बळी मिळवला. अर्जुनने आपल्या २ षटकांत ७ निर्धाव चेंडू टाकले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -