हैदराबादवर ७ धावांनी मारली बाजी
हैदराबाद (वृत्तसंस्था) : अक्षर पटेलची अष्टपैलू खेळी आणि त्याला कुलदीप यादवसह गोलंदाजांची मिळालेली अप्रतिम साथ या जोरावर माफक लक्ष्य उभारूनही दिल्लीने हैदराबादला ७ धावांनी पराभूत केले. या विजयासह दिल्लीने हंगामातील दुसरा विजय मिळवला.
दिल्लीने दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणे हैदराबादला जमले नाही. सलामीवीर मयांक अगरवाल वगळता त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. मयांकने ४९ धावांची संघातर्फे सर्वाधिक धावांची खेळी खेळली. हेनरिच क्लासेन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सनरायजर्स हैदराबादचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यात ते अपयशी ठरले. क्लासेनने ३१ धावांचे योगदान दिले, तर सुंदरने नाबाद २४ धावा तडकावल्या. हैदराबादने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १३७ धावा केल्या. ७ धावांनी त्यांनी हा सामना गमावला. दिल्लीच्या जवळपास सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी विशेष कामगिरी केली. अक्षरने ४ षटकांत २१ धावा देत २ बळी मिळवले. कुलदीप यादवने ४ षटकांत २२ धावा देत १ विकेट मिळवली.
सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी निराश केले. दिल्ली संघाने निर्धारित २० षटकांत ९ विकेटच्या मोबदल्यात १४४ धावांपर्यंत मजल मारली. अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला ३० धावांचा पल्ला पार करता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फंलदाजंनी नांगी टाकली. वॉशिंग्टनने ३, तर भुवनेश्वरने २ फलंदाजांना बाद केले. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरसोबत नवीन फलंदाज फिल सॉल्टला सलामीवीर म्हणून संधी दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. फिल सॉल्ट खातेही न उघडता माघारी परतला. भुवनेश्वर कुमार याने सॉल्टला शून्यावर बाद केले. सॉल्ट बाद झाल्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नर आणि अष्टपैलू मिचेलम मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियन जोडी जमली असे वाटले तेव्हाच नटराजन याने मिचेल मार्श याला बाद केले. मार्श याने २५ धावांचे योगदान दिले. मार्श बाद झाल्यानंतर वॉर्नर याने सर्फराजच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वॉशिंगटन सुंदर याने एकाच षटकात दिल्लीला तीन धक्के दिले. डेविड वॉर्नर, सर्फराज आणि अमन खान यांना सूंदर याने तंबूत पाठवले.
अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी संयमी फलंदाजी करत दिल्लीची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भुवनेश्वर कुमार याने अक्षर पेटल याला बोल्ड करत हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. अक्षर पटेल याने ३४ धवांचे योगदान दिले. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर मनिष पांडेही लगेच धावबाद झाला. मनिष पांडे यानेही ३४ धावा केल्या.