कथित धर्मोपदेशक आणि पंजाबात पुन्हा फुटीरतावादाची बीजे रोवणारा अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अखेर ३७ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अटक केली. त्याला आता आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात हलवण्यात आले आहे. अमृतपाल सिंग याला पोलिसांनी अटक केली, हे सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश आहे. पण पंजाब पोलीस हे खरोखरच अमृतपालला अटक करण्यासाठी प्रयत्न करत होते की, नुसतेच नाटक करत होते, हे समजायला मार्ग नाही. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी तंबी दिल्यावर पोलिसांनी अमृतपालला अखेर अटक केली. पण त्याला झालेली अटक ही पंजाबात पुन्हा दहशतवादाचा असूर जिवंत करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रयत्नांना एक सणसणीत चपराक आहे, असे मात्र म्हणावे लागेल.
अमृतपाल सिंग हा स्वतःला दुसरा भिंद्रनवाले यांचा अवतार समजत होता. त्याची शीख तरुणांना शिकवणही तशीच फुटीरतावादाची होती. भिंद्रनवालेचा भस्मासूर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच तयार केला आणि त्याची शिक्षा सर्व देशाला आणि खास करून पंजाबला भोगावी लागली. सत्तर-ऐंशीच्या दशकात तसेच नव्वदीच्या दशकाच्या मध्यापर्यंत पंजाब दहशतवादाने धुमसत होता. रोज निरपराध लोकांची आहुती त्यात पडत होती. खलिस्तानवादी भिंद्रनवालेचा भस्मासूर कायमचा गाडण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ केले आणि त्यानंतर खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही आहुती या दहशतवादाच्या धगधगत्या आगीत पडली. भारताचे एक लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. त्यांनाही दहशतवाद्यांनी ठार केले. पुन्हा खलिस्तानी तत्त्वांनी पंजाबात डोके वर काढले असून अमृतपाल सिंग हाच त्यांचा म्होरक्या होता. त्याने वेगवेगळ्या व्हीडिओंद्वारे पंजाबात फुटीरतावादाची बीजे पुन्हा पेरण्यास सुरुवात केली होती. पंजाबी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचा वारिस ‘पंजाब दे’ या संघटनेच्या ७८ कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आणि संघटनेचा म्होरक्या अमृतपाल मात्र मोकाट फिरत होता. खुद्द उच्च न्यायालयानेही याबद्दल पंजाब सरकारवर ताशेरे मारले होते. पण आता अमृतपालचा राक्षस बाटलीत बंद झाला आहे. पण यानिमित्ताने कित्येक प्रश्न उपस्थित होतात.
पंजाबात आम आदमी पार्टीचे भगवंतसिंग मान यांचे सरकार सत्तारूढ आहे. या सरकारचा दहशतवाद्यांबाबतचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्ण नसला तरीही फारसा शत्रुत्वाचाही नाही. पंजाब पोलिसांना मुद्दाम सॉफ्ट जायचे आदेश होते का? हा प्रश्न पडतो. कारण उच्च न्यायालयानेही अप्रत्यक्ष अर्थाने याकडेच रोख वळवला आहे. मान सरकार अमृतपालसिंगला झटक्यात पकडू का शकले नाही? हा एक सवाल आहे. अमृतपाल सिंगला पकडले, ही चांगली कामगिरी केली. पण आता त्याला गावगन्ना आसरा देणारी जी मंडळी आहेत, त्यांच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे. कारण त्याच लोकांमुळे फुटीरतावादी लोक मोकाट फिरतात, वाट्टेल ते अत्याचार करतात आणि पुन्हा साळसूदपणे आपापल्या अड्ड्यांवर परततात. जे पंजाबच्या दहशतवाद्यांबाबत खरे आहे, तेच काश्मिरी दहशतवाद्यांबाबतही खरे आहे. अमृतपाल सिंग याला खलिस्तानी चळवळीचे पुनरूत्थान करायचे आहे. त्याचा हा कुटील डाव उधळून लावण्यासाठी सरकारला सदैव सज्ज रहावे लागेल.
पंतप्रधान मोदी सरकारने जेव्हा तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणले, तेव्हा त्याविरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसने शेतकऱ्यांना चिथावले. पण त्यांच्यामागे खलिस्तानी तत्त्वेही होती, असे काही पोस्टर्सवरून दिसून आले. इतकेच नव्हे तर, काहीही कारण नसताना कॅनडाने भारतातील शेतकरी आंदोलनात नाक खुपसले आणि त्यांना समर्थन देणारे ट्वीट्स केले. खलिस्तानी चळवळ चालवणारेच यामागे होते आणि त्यांनी कसे पैसे देऊन परदेशी सेलेब्रिटीजना ट्वीट करायला लावले, याच्या कहाण्या आता प्रसिद्ध झाल्या आहेत. पण यातून एक सिद्ध झाले की, खलिस्तानी चळवळ ही पूर्णतः संपलेली नाही. बब्बर खालसा ही स्वतंत्र शीख राज्य मागणारी पहिली चळवळ होती आणि ती अद्यापही बंद पडलेली नाही. फक्त तिची व्याप्ती आणि जोर आता खूपच कमी झाला आहे. त्याच धर्तीवर अमृतपालसिंगने आपला वारिस पंजाब दे हा गट स्थापन केला होता. त्याने भरपूर व्हीडिओही अपलोड करून पंजाबी लोकांना भडकवण्याचे त्याचे काम सुरूच होते. त्याला अटक करण्यात आल्याने आता त्याच्या या फुटीरतावादी कार्यास चांगलाच आळा बसेल. दुसरा भिंद्रनवाले व्हायचे त्याचे स्वप्न आहे.
पंजाबमध्ये इतर राज्यांप्रमाणेच युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत. त्यामुळे ते अमली पदार्थ आणि दहशतवाद या दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कसे आणायचे? हा प्रश्न केंद्र सरकारसमोर आहे. पण मान सरकारनेही हा प्रश्न आपला मानून त्यासाठी काम केले पाहिजे. पंजाबचे मान सरकार अचानक सक्रिय होऊन त्यांनी अमृतपालला पकडले, यामागे कदाचित उत्तर प्रदेशातील योगी सरकारने गुंडाराज संपवण्याची जी प्रतिज्ञा केली आहे आणि त्यांनी अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोघा गँगस्टर राजकारण्यांना संपवले, हे असावे. कारण त्यामुळे मान सरकारवर प्रचंड दबाव आला. पोलिसांवरही दबाव आला आणि उत्तर प्रदेशात जर सरकार गुंडांचा खात्मा करू शकते, तर मग पंजाब सरकारला एका फुटीरतावाद्याला पकडणे का शक्य होत नाही? असा सवाल उघडपणे जनतेतून विचारला जात होता. त्याची परिणती म्हणजे अमृतपाल सिंग नावाच्या पंजाबी दहशतवादी भस्मासुराला बाटलीत बंद करण्यात आले, हीच आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…