२६ एप्रिल, आरती प्रभू यांच्या स्मृती दिनानिमित्त
- दिलीप देशपांडे
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर / आरती प्रभू हे नाव मराठी साहित्यात आणि मराठी वाचकाला अनोळखी नाही.प्रतिभासंपन्न कवी, कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार म्हणून लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. खानोलकरांचा जन्म ८ मार्च १९३० आणि मृत्यू २६ एप्रिल १९७६ला झाला. उणे-पुरे ४६ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संघर्षमय जीवन वाट्याला आले. अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या खानोलकरांना अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. तरीही आपल्या अल्पायुष्यात अजगर, गणूराया आणि चानी, त्रिशंकू, कोंडुरा, पाषाणपालवी, पिशाच्च या कादंबऱ्या. जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे असे आशयघन काव्यसंग्रह त्यांच्या शब्दावरचं प्रभुत्व दाखवतात. राखी पाखरू, सनई हे कथासंग्रह. अजब न्याय वर्तळाचा, अवध्य, एक शून्य बाजीराव, कालाय तस्मै नमः, रखेली, श्रीमंत पतीची राणी, सगेसोयरे, हयवदन, अभोगी इ. नाटके. ज्यांचं नाट्यसृष्टीत वेगळंच स्थान होतं. चानी, कोंडुरावर चित्रपट निघालेत. खूप मोठ्या साहित्याची निर्मिती त्यांच्याकडून झाली. प्रतिभेचं खूप मोठं देणं त्यांना लाभलं होतं, हे मान्यच कराव लागेल. अस्सल कोकणी बाजाच्या कथा हे त्यांचं वैशिष्ट होतं. माणसाचं अस्तित्व, माणूस आणि निसर्ग, माणसातले विकार, वृत्ती यावर त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या कथा-कवितामधील प्रतिमा वाचकाला भूरळ पाडतात. ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अनेक नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेत.
गेले द्यायचे राहूनी तुझे नक्षत्रांचे देणे… ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना… नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत… कसे? कसे हासायचे… समईच्या शुभ्र कळ्या… अशी अजरामर भावगीते, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (सामना)… तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी (निवडुंग)… तो एक राजपुत्र… मी एक रानफूल (चानी)… लवलव करी पात(निवडुंग)… मीच मला पाहते… पाहते आजच का (यशोदा)… अशी प्रसिद्ध चित्रपटगीतं, त्यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून लिहिली गेली. आजही ती रसिकांच्या मनामनांत आहेत.
खानोलकर गेल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात पु. ल. देशपांडे, हृदयनाथ मंगेशकर, श्री. ना. पेंडसे, विद्याधर भागवत, जया दडकर, मधु मंगेश कर्णिक, यशवंत कानिटकर आदींचा समावेश होता. खानोलकरांच्याविषयी आपुलकी, प्रेम त्यातून दिसून येते.
खानोलकरांच्या साहित्य निर्मितीमागील पार्श्वभूमी अद्भुत आणि काहीशी अनाकलनीय होती. पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात… ‘असे वाटते की, खानोलकरवर काही लिहू नये, त्याच्या पुस्तकातून जो खानोलकर आता हाती उरला आहे, त्यालाच घेऊन एकटे बसावे. त्या पुस्तकातून त्यालाच घेऊन एकटे बसावे. त्या पुस्तकांतून त्यालाच बोलू द्यावे. त्याचेच ऐकत रहावे.’ त्याच्या त्या लोकविलक्षण अनुभवांची खोली गाठण्याची आपली ऐपत आहे का नाही? ते अजमावीत राहावे. श्वास कोंडायला लागला, तर स्वतःच्याच मनाशी पराजय मान्य करावा. चूप बसावे. हा एक नवलाचा पक्षी या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळले-कळलेसे वाटणारे, बोलला काय आणि कळण्या न कळण्याच्या सीमेवरचे काहीतरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरट्यातून आला होता, तिथे निघूनही गेला काय? त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अदभुत!
खानोलकरचा हात असंख्य वेळा हातात घ्यायला हवा होता. खानोलकरने “नक्षत्रांचे देणे” हा कविता संग्रह मला अर्पण केला होता. मला पत्ता नव्हता, एके दिवशी पोष्टाने प्रत आली. वर “सप्रेम भेट” असे लिहून खाली चि. त्र्यं. खानोलकर ही सही. २८ एप्रिल पंचाहत्तर तारीख. संग्रह उघडला, तर दुसऱ्या पानावर “पु. ल. देशपांडे यांना”- हा छापील मजकूर. मी थंडच झालो. खानोलकरला पत्र पाठवून विचारले की, “बाबा रे, माझा हा गौरव कशासाठी? २३ जून ७५ला खानोलकरचे उत्तर आले. त्यातली शेवटची वाक्ये होती… “अजून खूप लिहायचंय, खूप मोठा पल्ला गाठायचाय… आशीर्वाद घेत घेत चाललोय.” कुठला तरी भलताच पल्ला गाठायला खानोलकर निघून गेला. मनाला एकच रूखरूख वाटते की, त्याच्या असामान्य प्रतिभेच्या दर्शनाने थक्क होऊन मनात लिहून ठेवलेली शरणचिठ्ठी त्याच्या हातात वेळच्या वेळी पोहोचायला पाहिजे होती. छे! फारच उशीर झाला.
श्री. ना. पेंडसे म्हणतात “काव्य” ही खानोलकरांची सत्तेची दौलत. कथा, कादंबरी, नाटक हे नाही म्हटलं तरी अंकित प्रदेश. पण हे तिन्ही प्रकार त्यांनी अशा उंचीवर नेले की, दौलतीचा प्रदेश संपतो कुठे तेच कळेनासं होतं. खानोलकरांच्या लेखनाचा वेग लक्षात घेता ते इतके संपन्न लेखन करतात कसं याचं आश्चर्य वाटे. मी त्यांच्या लेखनापैकी मुक्त दाद दिली ती “अजगर” आणि “चानी” यांना. कोणत्याही भाषेला भूषण वाटाव्यात अशा या कथा आहेत. तर प्रभाकर पाध्ये म्हणतात… त्यांना दक्षिण कोकणातील जीवनाचे जे खोल दर्शन झाले होते, त्याच्या आदिम अंत:प्रकृतीचा जो साक्षात्कार त्यांना झाला होता, त्याची प्राकृतिक रंगरूपे त्यांनी सादर केली. तेथील जीवनाचा ठाव त्यांच्या प्रतिभेने घेतला. तेथील लोकांच्या रक्ताळलेल्या वासना जन्म, मृत्यू, निसर्ग, नियती यांच्या नानाविध विपरित दर्शनांनी त्यांची भणाणलेली मने यांचे रंगरूप, नाद, गंधात्मक चित्रण त्यांनी केले. त्यांच्या आदिम प्रकृतींनी प्रेरित झालेल्या जीवनाच्या प्रतिमा त्यांनी रेखाटल्या. त्यांच्या असामान्य यशाचे रहस्य यात आहे.
खानोलकरांविषयक आठवणी सांगताना मधु मंगेश कर्णिक सांगतात, रत्नागिरीत पंचवीस वर्षांपूर्वी (१९५० साली रत्नागिरीला) ओळख झालेला चिंतामणी त्र्यंबक खानोलकर त्यानंतरच्या काळात माझा एक निकटचा मित्र बनला. कुडाळला त्याची खानावळ होती. दोन वेळ जेवायला चमचमीत मिळत होते नि मनातली कवितेची वेल दिसामासांनी वाढत होती, फुलत होती, बहरत होती… त्याच काळातली आमची मैत्री. आजही आठवणी आल्या की मनाला अतृप्तीची हुरहूर लागते. ट्रंकेतळीच्या जुन्या पैठणीला यावा तसा आठवणींचा हुरहूर लावणारा सुवास मनात दाटून येतो. “सत्यकथा” मासिक हा आमचा आदर्श होता. १९५४च्या फेब्रुवारीत “आरती प्रभू” नावाने खानोलकरांची “शून्य शृंगारते” ही कविता छापून आली. त्या वेळच्या सत्यकथेचा एक एक अंक म्हणजे कथा-कवितांचा एकेक रसरशीत गुच्छच असे.
‘जोगवा’मधल्या कित्येक अप्रतिम कविता चिंतूने (खानोलकरांनी) कुडाळमधल्या ‘वीणा गेस्ट हाऊस’मधल्या माडीवर बसून लिहिल्या व आम्ही “जोगवा”मध्ये ठायीठायी प्रगट झालेल्या त्या निसर्गाच्या सहवासात त्यांचा आस्वाद घेतला. पंचवीस वर्षांचे ऋणानुबंध तोडून हा काव्यप्रदेशातील व्रतस्थ योगी, मराठी साहित्याच्या बगीच्यात आपल्या कवितेच्या हळुवार पाकळ्यांची अथांग पखरण करून… “आलो इथे रिकामा, बहरून जात आहे” असं म्हणत हलकेच निघून गेला… आमच्यासाठी आयुष्यभर पुरतील, अशा सुगंधी कवितांच्या तीन परड्या मागे ठेवून…
५९ साली खानोलकर कुडाळ सोडून मुंबईत आले मुंबईला कायम घर करण्यासाठी. कुडाळ सोडताना मनाने उद्ध्वस्त झाले होते. मुंबईला आल्यावर आकाशवाणीत नोकरी धरली. तिथेही त्यांच्याविषयी झालेल्या गैरसमजाने नोकरी सोडावी लागली. नंतर युनिव्हर्सिटीत कारकुनाची नोकरी धरली. तिथेही मन लागले नाही. १७ वर्षे खानोलकर मुंबईत राहिले. पण तिथे कधीही रमले नाहीत. त्यांची आठवण सांगताना जया दडकर सांगतात, खानोलकरांचा जीव गुंतला होता कोकणच्या निसर्गात. शहरी संस्कृतीचा मुखवटा त्यांनी कधी स्वतःच्या चेहऱ्यावर चढवला नाही. ते अखेरपर्यंत कोकणीच राहिले. कोकणच्या मातीतले सारे गुणदोष त्यांच्या स्वभावात प्रकर्षाने एकवटले होते. खानोलकरांचे प्रकाशित-अप्रकाशित असे समग्र साहित्य एकत्रित जमवून, वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी, एक स्मारक सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात वायंगणी गावाजवळ उभरण्याची कल्पना मध्यंतरी काही वर्षांपूर्वी पुढे आली होती. अतिशय चांगली कल्पना होती. पण पुढे त्याविषयी काय झाले समजले नाही व स्मारकाच्या कामाबद्दल वाचायला मिळाले नाही.
खरेच खानोलकरांचे असे समग्र साहित्य, दुर्मीळ छायाचित्रे, घेऊन स्मारक उभे राहिल्यास मराठी साहित्य क्षेत्रात भूषणावह गोष्ट ठरेल, यात शंका नाही.