- सेवाव्रती : शिबानी जोशी
‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असं म्हटलं जातं ते खरंच आहे. सगळीच मुलं ही फुलासारखी गोंडस असतात; परंतु काही फुलांना देव्हाऱ्यात स्थान मिळतं, काही फुलांना श्रीमंत घरात, काहींना गरीब घरात, काहींना रस्त्यावर, तर काहींना निर्माल्यामध्ये स्थान मिळते. तसंच आपल्या समाजात काही मुलांना सुरक्षित, चांगले घर, काहींना झोपडपट्टीचा निवारा, तर काही मुलांच्या नशिबात रेल्वे स्टेशनचा आसरा असतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात दर दिवसाला २०० मुलं घरातून काही ना काही कारणामुळे पळून रेल्वे स्टेशनवर वावरत असतात, असा एक अहवाल सांगतो. आपणही रेल्वे स्थानकावर भीक मागणारी, वडापाव खाणारी, भुरटी चोरी करणारी, फाटक्यातुटक्या कपड्यातील अनेक मुलं पाहतो; परंतु सामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी घृणा, कीव किंवा नकारात्मक भावनाच उमटते. ही मुलं नेमकी कुठून आली असतील? यांचा भूतकाळ काय? याविषयी विचार करायला सामान्यांना वेळ नसतो. मात्र विजय जाधव यांच्यासारख्या सामान्यातील असामान्यांनी असा विचार केला आणि त्यातूनच उभी राहिली “समतोल फाऊंडेशन” ही संस्था.
विजय जाधव हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे रहिवासी. त्यांच्या गावात कॉलेज नव्हतं, घरची गरिबी होती. तेव्हा ते अभ्यासाच्या आवडीपोटी नदी पोहून दुसऱ्या गावातील कॉलेजला जात असत. शालेय जीवनातही एक हुशार विद्यार्थी असलेले जाधव यांनी कॉलेज जीवनात अभाविपमध्ये काम केलं होतं. त्यांच्या कॉलेजमध्ये ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचे कार्यकर्ते येत असत. त्यांची भाषणं ऐकून ते भारावले आणि चळवळीत, सामाजिक कार्यात काम करणे त्यांना आवडू लागले होत. त्या चळवळीतही ते थोडा काळ सहभागी झाले होते. त्यानंतर संघ विचारसरणीच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एका प्रशिक्षणासाठी ते आले आणि संघाच्या संपर्कात आले. समाजकार्य करायचं होतंच आणि मला बचाव आंदोलनाच्या काळात नर्मदा खोऱ्यात फिरत असताना घरोघरी मुलांचे फोटो दिसत असत. पण ती मुलं घरात दिसत नसत. ही मुलं कुठे आहेत? विचारल्यावर गेली शहराकडे रोजीरोटी कमवायला, असं सांगितलं जात असे आणि ती आमच्या काहीही संपर्कात नाहीत, त्यांचा काहीही पत्ता नाही, असेही सांगितले जात असे. त्या काळात मोबाइल, व्हाॅट्सअॅप नव्हते. ही मुलं नेमके शहरात काय करत असतील? असा विचार जाधव यांच्या मनात नेहमीच येत असे. त्यानंतर मुंबईमध्ये वास्तव्य सुरू केल्यानंतर स्टेशनवरची मुलं त्यांना दिसू लागली आणि यांच्यासाठी काहीतरी करावं, असं त्यांच्या मनाने घेरलं. तिथून ‘समतोल फाऊंडेशन’चा प्रवास सुरू झाला.
ठाण्यामध्ये परममित्र प्रकाशनचे माधव जोशी आणि त्यावेळेस असलेले कोकण प्रांताचे प्रचारक जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या जाधव संपर्कात आले. सहस्रबुद्धे यांचं म्हणणं होतं, ही अशा भटकणाऱ्या मुलांसाठी, जे आपल्या राष्ट्राचे भवितव्य आहेत, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. तो विचार जाधव यांना पटला. सुरुवातीला एका मुलाला त्यांनी पाहिलं आणि त्याला विचारलं की, तू का पळून आला आहेस? तो खरं तर एका गावच्या सरपंचाचा मुलगा होता; परंतु सायकल खेळायला मिळाली नाही, इतक्या छोट्या कारणाने तो मुंबईत पळून आला होता. त्याला संस्थेमध्ये आणून त्याच्या वडिलांशी संपर्क साधून त्याला जाधव आणि त्यांचे दोन कार्यकर्ते नांदेडमधल्या त्याच्या गावी घेऊन गेले. सुरुवातीला त्यांना भीती वाटली की आपल्यावरच तर नाही ना हे संशय घेणार?; परंतु तसं झालं नाही. गावामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांची मिरवणूक काढण्यात आली. वडिलांनी त्याला शोधून देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे इनाम घोषित केले होते. त्यांनी डोनेशनही दिलं आणि हे काम असंच सुरू ठेवा, असं प्रोत्साहन दिलं. या घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झाले आणि त्या २००४ पासून २०२३ पर्यंत एकूण १८,००० मुलांना त्यांनी स्वगृही रवाना केलं आहे. या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असलेली स्टेशनवर फिरणारी मुलं त्यांना पाहायला मिळाली. ट्रॅफिकिंग, घरातून भांडून आलेली, गरिबी, मोठ्या शहरातील स्वप्न पाहून आलेली अशी अनेक मुलं आणि मुली त्यांना पाहायला मिळाल्या.
जाधव यांनी हे सांगताना एक मत नोंदवलं, ते खरेच विचार करण्यासारखे आहे. अशा मुलांत मुंबईत तरी पंजाब आणि केरळमधून आलेली मुलं फारच क्वचित सापडतात. केरळमध्ये एक तर शंभर टक्के साक्षरता आहे आणि पंजाबमध्येही सुबत्ता आहे. सर्वात जास्त मुली या पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम इथून आलेल्या, तर मुलांमध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार इथल्या मुलांची संख्या दिसून येते, असं जाधव यांनी सांगितलं. समतोल फाऊंडेशनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ रेल्वे स्टेशनवरील मुलांवरच फोकस ठेवला आहे. मुंबईसारख्या शहरात दरवर्षी एक लाख मुलं तरी आढळून येतात, असं सर्वेक्षणात दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. समतोलचं काम मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, जळगाव, भुसावळसारख्या मोठ्या स्थानकांवर पसरलेलं आहे. हे काम करण्यासाठी अर्थातच कार्यकर्त्यांची मोठी फळी असण्याची गरज आहे. आजमितीला संस्थेबरोबर जवळजवळ ५० ते ६० कार्यकर्ते काम करतात. त्यांना छोटसं मानधनही दिलं जातं.
रेल्वे स्टेशनला जाधव कुंभमेळा म्हणतात. इथे दररोज हर क्षणाला गर्दी, गोंगाट, ये-जा सुरू असते आणि त्यातून अशा मुलाला शोधणं, त्याचं मन वळवण, त्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणे त्यानंतर त्याला संस्थेच्या स्थानी आणून त्याचं मन वळवून त्याला पालकांकडे किंवा त्याच्या राज्याकडे सुपूर्द करणे, हे घरच्या कार्यापेक्षाही मोठं क्लिष्ट कार्य आहे.
खरं तर समतोल फाऊंडेशनच्या कामाचा फोकस अशा रस्ता चुकलेल्या मुलांचं पुनर्वसन करणे नसून त्यांना आपापल्या घरी पोहोचवणं हा आहे. त्यामुळे या मुलांना स्वतःच्या संस्थेत ठेवून त्यांना शिक्षण देणे, मोठं करणं ही परिकल्पना संस्थेच्या ध्येय उद्देशात नाही. अर्थात या मुलांचं मन परिवर्तन करण्यासाठी काही काळ जावा लागतो. त्यासाठी कल्याण-मुरबाडजवळ हिंदू सेवा संघाच्या जागेत मुलांसाठी स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र, अशी दोन मजली प्रशस्त इमारत असून त्या ठिकाणी एकावेळी पाचशे मुलांची सुद्धा व्यवस्था होऊ शकते आणि मुलींसाठी ठाण्याला दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे एक उपकेंद्र सुरू आहे. या ठिकाणी ही मुलं जास्तीत जास्त ४५ दिवस ठेवली जातात. एकावेळी साधारणतः ५० मुलं येथे वास्तव्याला असतात. पुन्हा नवी मुले येतात. विशेष करून नशा करणारी, ड्रग घेणारी मुलं या केंद्रात त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी ठेवली जातात. तात्पुरती एक-दोन दिवस राहणारी मुलं ही ठाण्याच्या निवारा केंद्रात ठेवली जातात. जाधव यांचा अनुभव पाहून महाराष्ट्र शासनाच्या बालहक्क आयोगावर सदस्य म्हणून ते काम करीत होते.
अनाथ हा शब्दच खरं तर जाधव यांना मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही मूल हे अनाथ असूच कसे शकेल? ते कोणत्यातरी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेले असते. त्यामुळे या मुलांना ते बेघर मुलं मानतात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे किंवा त्यांच्या गावी पाठवण्याची जबाबदारी ते उचलतात. गेली १९ वर्षे समतोल फाऊंडेशन रेल्वे स्थानकावर हे काम करीत आहे; परंतु शासनाकडून हे काम करण्यासाठीची परवानगी त्यांना पंधरा वर्षांनी मिळाली. त्यामुळे जाधव यांच्या मनात एक सल आहे की, चांगलं काम करणाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी विरोधच होतो की, आपल्या समाजातील दुर्दैवी बाब असल्याचं त्यांना वाटते. तरीही कुठेही खचून न जाता सलग पंधरा वर्षे निस्वार्थी बुद्धीने काम केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल आणि कामावर विश्वास ठेवून शासनाने त्यांना आत्ता आत्ता रेल्वे स्टेशनवर काम करण्याची परवानगी दिली आहे.
समतोल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे असलेले अनुभव ऐकले की अक्षरशः अंगावर काटा येतो. अक्षय जावळे नावाचा एक मुलगा २०१० साली त्यांना सापडला. तो धुळ्याहून आला होता. त्याला केंद्रात आणून ४५ दिवस त्याचं मन आणि मत परिवर्तन घडवलं आणि पुन्हा धुळ्याला नेऊन सोडलं. तिथे तो इंजिनीअर झाला आणि सुशिक्षित झाल्यावर त्याला आपल्यासारख्याच मुलांना पुन्हा पाठवण्याची ओढ लागली आणि म्हणून पुन्हा तो संस्थेतून आता कार्यकर्ता म्हणून त्याच्यासारख्या मुलांसाठी काम करीत आहे. असाच एक रोहित नावाचा मुलगा होता. त्याचं मन परिवर्तन झालं. तो शिकला आणि आता तो दुबईला नोकरी करीत आहे. तो दर महिन्याला २० हजार रुपये संस्थेला कृतज्ञतेच्या भावनेने पाठवत असतो. या कार्याची दखल घेऊन संस्थेला आजपर्यंत ७५० पुरस्कार मिळाले आहेत.