मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई तसेच मुंबईच्या लगतच्या शहरातील वाढलेले तापमान, अवकाळी पाऊस, तर कधी दमट हवामान अशा स्वरूपातील विस्कळित ऋतुचक्र व तापमानात सातत्याने होणारे बदलामुळे विषाणू, जंतू, डास, माश्या या एकपेशी-बहुपेशी सजीवांसाठी जणू पूरक वातावरण निर्माण होत आहे. साधारणपणे हे जीवजंतू ओल्या जागी, जिथे अन्न मिळेल तिथे राहायचे, ते आता वाढलेल्या तापमानात, प्रतिकूल परिस्थितीतही टिकाव धरू लागले आहेत, असे निरीक्षण जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरिया या आजारांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरियामुळे आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो, तर दरवर्षी मलेरियाच्या २० कोटी प्रकरणांची नोंद होते. याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथील फिजिशियन डॉ. चिराग शहा सांगतात, “लोकसंख्येची झपाट्याने वाढ होणाऱ्या मुंबई शहरात २०२२ तीन हजारहून अधिक मलेरिया रुग्ण आढळले होते. तसेच ६४६ डेंग्यूच्या रुग्णांचासुद्धा समावेश होता. दहा वर्षांपूर्वीची मलेरिया रुग्णांची परिस्थिती पाहता खासगी व सरकारी पातळीवर “मलेरिया हटाव” मोहिमेला यश आले आहेत. मलेरिया ही केवळ झोपडपट्ट्यांमध्ये पसरणारी साथ नसून जेथे डासांची पैदास होते, त्या ठिकाणी मलेरियाची साथ पसरण्याचा धोका असतोच. अनोफिल्स डासांच्या मादीमुळे मलेरिया होतो. अनोफिल्स डासांच्या ४०० हून जास्त प्रजाती आहेत. यातल्या जवळपास ३० प्रजाती मलेरियाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरतात. हे डास सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येतात. त्यावेळी मलेरिया पसरवणारे हे मलेरिया व्हेटर चावण्याची शक्यता सर्वाधिक असते. अनोफिल्स डासांच्या मादी पाण्यात अंडी घालतात. त्यातून लारव्हा बाहेर येतो. पुढे त्यातून डास तयार होतात. या अंड्यांच्या भरणपोषणासाठी मादीला रक्ताची गरज असते. अवकाळी पाउस व तापमान बदलामुळे पूर्वी अंड्यातून डासांची वाढ होण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागत होता. आता मात्र तीन आठवड्यांतच अंड्यातून डास बाहेर पडत असल्याने डासांची पैदास वाढत आहे. ‘सध्या असलेली कीटकनाशके आणि औषधं अनोफिल्स डासांसाठी निष्प्रभ ठरत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे मलेरिया अधिक बळावतोय’ अशी चिंता डॉ. चिराग शहा यांनी व्यक्त
केली आहे.
जागतिक मलेरिया दिवसाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक अन्न व कृषी संघटना (एफएओ), युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन फंड (युनिसेफ), जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन चेंज (आयपीसीसी) यांच्या विविध अहवालांवरून असे अनुमान काढले गेले आहे की, शेती व अन्य क्षेत्रांवरील हवामान बदलाचे अथवा ऋतुचक्राचे दुष्परिणाम दूरगामी व संथ आहेत, तर आरोग्यावरील परिणाम मात्र तत्काळ होणार आहेत. त्यामुळे तब्बल २१० कोटी लोकांना पुढील दहा वर्षांत मलेरिया रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा परिस्थितीत २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलानाचे लक्ष्य जागतिक आरोग्य संघटनेला गाठायचे आहे.