Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरबोईसरच्या मेट्रो फिनिक्स रुग्णालयाची इमारत वादाच्या भोवऱ्यात

बोईसरच्या मेट्रो फिनिक्स रुग्णालयाची इमारत वादाच्या भोवऱ्यात

खैरापाडा ग्रामपंचायतीच्या तक्रारीकडे जि. प. आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष मेट्रो फिनिक्स रुग्णालय हे बोईसर-पालघर मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीत सुरू करण्यात आले असून, येथे पार्किंगची सुविधा नाही. इमारत अनधिकृत असतानाही अग्निसुरक्षा परवाना कसा देण्यात आला?, रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्यास त्याला जबाबदार कोण?, असा सवाल विचारला जात आहे.

बोईसर (वार्ताहर) : बोईसर-नवापूर नाका येथे थाटात उभी राहिलेली मेट्रो फिनिक्स या रुग्णालयाची इमारत अनधिकृत असल्याचे समोर आल्याने बहुचर्चित असलेल्या या रुग्णालयाची इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या आक्षेपानंतर अनधिकृत इमारतीमध्ये सुरू असलेल्या या रुग्णालयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. घरदुरुस्तीच्या नावाखाली मालकाने आवश्यक बांधकाम परवानगी न घेताच चक्क तीन मजली इमारत उभी करून रुग्णालयासाठी भाडेतत्त्वावर दिली आहे, त्यामुळे बोईसरमधील अवैध बांधकामे पुन्हा एकदा रडारवर येऊन बोईसरमधील बांधकामांचा विषय ऐरणीवर आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

बोईसरच्या नवापूर नाका येथील सर्व्हे क्र. ५९/ब/१ या जागेवर मालक विकास जैन आणि संदीप जैन यांनी खैरापाडा ग्रामपंचतीकडून घर दुरुस्तीसाठी घेतलेल्या ना हरकत दाखल्याच्या आधारे थेट तीन मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, जि. प. बांधकाम प्राधिकरण आणि नगररचना विभाग सारख्या सक्षम कार्यालयामार्फत कोणतीही आवश्यक बांधकाम परवानगी घेतलेली नसल्याचे समजते. इमारत अनधिकृत असताना देखील पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मेट्रो फिनिक्स रुग्णालयाला या इमारतीत नोंदणी परवानगी दिली आहे.

 

या रुग्णालयाने स्थानिक खैरापाडा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देखील घेतला नसून, ग्रामपंचायत खैरापाडा मासिक सभा दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ ठराव क्र. ५१२ अन्वये जि. प. पालघर आरोग्य विभाग यांच्याकडून देण्यात आलेला नोंदणी परवाना रद्द करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या अनधिकृत इमारतीला वीज, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा न पुरविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

“मेट्रो फिनिक्स या रुग्णालयाविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेतल्याने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणीचे पत्र प्राप्त झाले आहे. यासंदर्भात रुग्णालयाकडून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. गैर आढळल्यास कारवाई करण्यात येईल.” – डॉ. दयानंद सूर्यवंशी
(जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पालघर)

“आम्ही संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सदर बाबतीत शहानिशा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करावी असे माझे मत आहे.” – डॉ. अनंत नागरगोजे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -