अलिबाग (प्रतिनिधी) :
निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर बनावट पत्रक व्हायरल केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करीत, चोवीस वर्षीय शुभम काळे याला पुणे येथून अटक केली आहे. सोमवारी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर बनावट पत्रक व्हायरल केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान अटक करण्यात आलेला हा आरोपी पुणे येथे एका सीए फर्ममध्ये असिस्टंट या पदावर नोकरी करीत आहे. अटक करण्यात आलेला हा पहिला आरोपी असून, या प्रकरणी लवकरच आणखी काही आरोपींना अटक होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
दरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा १६ एप्रिल रोजी खारघरमध्ये उत्साहात पार पडला. मात्र उष्माघातामुळे काहींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी १७ एप्रिल रोजी सद्भावना पत्रक प्रसिद्ध करून घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांमध्ये शासनाबाबत द्वेशाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. हे पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. दयानंद गावडे यांच्याकडे सोपाविण्यात आला होता. तपासाची सूत्रे वेगात फिरवून आरोपीचा शोध घेतला असता, शुभम काळे याला पुणे येथून संशयित म्हणून ताब्यात घेतले.