Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीवर्षभरात मलेरियाच्या १० हजार डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट

वर्षभरात मलेरियाच्या १० हजार डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट

पालिकेच्या कीटकनाशक विभागाची कामगिरी

मुंबई (प्रतिनिधी) : साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील असते. पालिकेच्या कीटक नाशक विभागातर्फे कीटकजन्य रोग नियंत्रणासाठी अव्याहतपणे वर्षभर काम सुरू असते. हिवतापविरोधी मोहिमेअंतर्गत हिवताप प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या ‘ॲनोफिलिस स्टिफेन्सी’ या प्रजातीच्या डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने हिवताप (मलेरिया) नियंत्रण मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीत मुंबई शहरातील तब्बल १० हजार ७८८ डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली आहेत.

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीदरम्यान महापालिकेच्या कीटकनाशक विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साधारणपणे ४९ हजार ४७६ गृहभेटी देण्यात आल्या. या भेटींमध्ये एकूण ४ लाख ४७ हजार १८८ पाण्याच्या टाक्या तपासण्यात आल्या. तर एकूण ४ लाख २८ हजार १९६ पाण्याच्या टाक्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एकूण १० हजार ७८८ इतक्या मोठ्या प्रमाणात ॲनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थाने आढळली. ही उत्पत्ती स्थाने महापालिकेच्या संबंधित चमूद्वारे तत्काळ नष्ट करण्यात आली. यामुळे डासांच्या भविष्यातील उपद्रवास प्रतिबंध करण्यास मोठी मदत झाली आहे. ॲनोफिलीस या डासांची वर्षभरात १० हजार ७८८ एवढी उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली. यापैकी सर्वाधिक म्हणजे २ हजार ४१८ एवढी उत्पत्तीस्थळे जुलै २०२२ मध्ये नष्ट करण्यात आली. त्या खालोखाल ऑगस्ट महिन्यात २ हजार १२८, जून महिन्यात १ हजार ४९६, सप्टेंबर महिन्यात १ हजार ३३७ इतकी उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली.

मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात ही तपासणी मोहीमस्वरूपात केली जाते.

या मोहिमेदरम्यान कीटकनाशक खात्यातील कामगार-कर्मचारी-अधिकारी हे मोहिमेत सहभागी होऊन तपासणी करतात. महापालिकेच्या कीटकनाशक खात्यातील सुमारे १ हजार ५०० कामगार-कर्मचारी -अधिकारी या मोहिमेत कार्यरत असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -