Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्व‘वॉरेन बफेट’ एक अदभुत रसायन...

‘वॉरेन बफेट’ एक अदभुत रसायन…

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सोमण

‘शेअर बाजार’ हा शब्द आला की सर्वसामान्य लोकांच्या मनात एक कुतूहल निर्माण होते. या कुतूहलासोबत शेअर बाजारबद्दल मनात निर्माण होणारे निरनिराळे प्रश्न समोर येतात. त्यामध्ये उत्सुकता असतेच पण सोबत भीती देखील असते. शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने गुंतवणुक केल्यास कधी कधी नुकसान देखील सोसावे लागू शकते त्याचीच ही भीती असते.

मी नेहमी म्हणतो ‘बिफोर द लार्ज गेन्स, देअर शुड बी सम पेन्स’ या शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना नुकसान नावाचा खडा आपल्या समोर आला नाही असे कधीच होत नाही. शेअर बाजारात सातत्याने अभ्यासपूर्वक लांब पल्ल्याची गुंतवणूक केल्यास नेहमीच चांगला फायदा होतो. या शेअर बाजारात अनेक वर्षे गुंतवणूक करून ज्यांनी प्रचंड पैसा मिळविला आणि शेअर्समधील गुंतवणूक म्हटल्यावर जे नाव सर्वप्रथम आपल्या समोर येते ते म्हणजे ‘वॉरेन बफेट’. सध्या ९२ वर्षांचे असलेल्या या जगावेगळ्या माणसासाठीच आजचा हा लेख.

‘वॉरेन एडवर्ड बफेट’ यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० ला झाला. बफेट हे एक अमेरिकन बिझिनेस मॅग्नेट, गुंतवणूकदार, स्पीकर आणि समाजसेवी आहेत. जे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांना जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ओळखले जाते. सध्याच्या अखेरच्या अहवालानुसार सध्या ते जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

बफेंचा जन्म ओमाहा, नेब्रास्का येथे झाला. वयाच्या १९ व्या वर्षी नेब्रास्का विद्यापीठातून हस्तांतरण व पदवीधर होण्यापूर्वी त्यांनी १९४७ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या वॅर्टन स्कूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कोलंबिया बिझिनेस स्कूलमधून पदवी मिळविली. बेंजामिन ग्राहम यांनी पुढाकार घेतलेल्या मूल्य गुंतवणुकीच्या संकल्पनेभोवती त्यांनी आपले गुंतवणूक तत्त्वज्ञान तयार केले. त्यांनी आपल्या अर्थशास्त्राच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स’मध्ये हजेरी लावली आणि लवकरच ग्राहमबरोबरच्या एका व्यवसायातील विविध भागीदारी सुरू केल्या. १९५६ मध्ये त्यांनी बफे पार्टनरशिप लिमिटेड तयार केली आणि अखेर त्यांच्या कंपनीने ‘बर्कशायर हॅथवे’ नावाची वस्त्रोद्योग कंपनी विकत घेतली. चार्ली मंगर हे बफेंसोबत कंपनीत रुजू झाले आणि ते कंपनीचे उपाध्यक्ष झाले.

बफे १९७० पासून बर्कशायर हॅथवेचे चेअरमन आणि सर्वात मोठे भागधारक आहेत. जागतिक मीडिया आउटलेट्सद्वारे त्यांना ओमाहाचा ओरॅकल म्हणून संबोधले गेले आहे. अफाट संपत्ती असूनही वैयक्तिक काटकसरीसाठी ते प्रख्यात आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात बफेंच्या गुंतवणुकीची पद्धत फाउंडर सेंटरिझममध्ये येते असे म्हणतात. बफे यांनी २००७ मध्येच आर्थिक क्षेत्रातील मंदीला सुरुवात असे म्हटले होते. त्यानंतर २००८ मध्ये मोठी मंदी आली. बफेच्या बर्कशायर हॅथवेला देखील या मंदीचा फटका बसला त्यांच्या २००८ च्या तिमाहीच्या कमाईत ७७% घट झाली होती आणि त्याच्या नंतरच्या अनेक सौद्यांमधून मार्क-टू-मार्केटचे मोठे नुकसान झाले. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी म्हणून काम करणारे वॉरेन बफेट आणि कंपनीचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर यांच्या नियंत्रणाखाली आणि नेतृत्वासाठी ही कंपनी ओळखली जाते. बर्कशायरमधील कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, बफेंनी सार्वजनिकपणे व्यापार करणार कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित केले, परंतु अलीकडेच त्याने संपूर्ण कंपन्या अधिक वेळा खरेदी केल्या आहेत.

बर्कशायरकडे आता किरकोळ, रेल्वेमार्ग, घरातील सामान, विश्वकोश, व्हॅक्यूम क्लीनरचे उत्पादक, दागदागिने विक्री, वृत्तपत्र प्रकाशन, उत्पादन आणि गणवेश वितरण आणि बऱ्याच प्रादेशिक इलेक्ट्रिक आणि गॅस य टिलिटीजसह विविध प्रकारच्या कंपन्याची मालकी आहे. त्यांच्या कंपनीने यूएस एअरलाइन्सच्या प्रमुख वाहकांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळविली आहे आणि सध्या युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअर लाइन्समधील सर्वात मोठा भागधारक आहेत आणि दक्षिण-पश्चिम विमान कंपन्या आणि अमेरिकन एअरलाइन्समधील पहिल्या तीन भागधारकांपैकी आहेत. बर्कशायर हॅथवेने त्याच्या भागधारकांच्या पुस्तक मूल्यात वार्षिक वाढ केली आहे. अमेरिकेत आलेल्या या मोठ्या मंदीनंतर देखील २००८ मध्ये बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बिल गेट्सला त्यावेळी त्यांनी मागे टाकले. अलीकडे क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत, सामान्यत: बफेट म्हणाले की मी जवळजवळ निश्चितपणे सांगू शकतो की क्रिप्टोकरन्सीचा अंत होईल. सध्या त्यांची अॅपल, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फार्गो, कोका कोला, क्राफ्ट हेन्झ यासह अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना त्यांना देखील अनेक कंपन्यामध्ये नुकसान देखील सोसावे लागलेले आहे. २००६ मध्ये त्यांनी सर्वात मोठी देणगी पाच मोठ्या संस्थाना दिलेली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने मिलींडा गेट्स फाऊंडेशनला खूप मोठी संपत्ती दान केलेली आहे.

आपली इच्छा शक्ती प्रबळ असेल तर एक माणूस शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून किती यशस्वी होऊ शकतो हे बफेंकडे पाहून कळते. आज बफेट यांनी प्रचंड पैसा, प्रसिद्धी मिळविली आहे. त्याचप्रमाणे मिळविलेली संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात दान देखील केलेली
आहे. आज वयाच्या ९२ व्या वर्षी देखील त्यांच्यातील ऊर्जा सर्व गुंतवणूकदारांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या प्रवासाकडे पाहून आणि त्यांनी आपल्या हयातीत विविध संस्थाना केलेल्या मोठ मोठ्या देणग्याकडे पाहता मला या माणसाबद्दल एकच वाक्य मनापासून बोलावेसे वाटते ते म्हणजे प्रचंड पैसा मिळवून देखील पैशाची आसक्ती न बाळगलेला जगावेगळा माणूस अर्थात सर वॉरेन बफेट.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -