भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
नागपूर : मोदी नावाचे वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी पाला-पाचोळ्यासारखे उडून जातील, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काल उद्धव ठाकरेंची सभा पाचोरा येथे पार पडली. त्यानंतर बावनकुळेंनी हा घणाघात केला आहे.
बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी आज बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही टीका केली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्यानंतर टीका टिप्पण्या सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशाने पसंती दिली आहे. मोदीजींच्या वादळात उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. संधी मिळाली पण ते त्यात अपयशी ठरले. खोटं बोल पण रेटून बोल, अशी त्यांची अवस्था झाली आहे.”
बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत तुम्ही कशाला चॅलेंज करताय, मोदी नावाचे वादळ येणार आहे. संजय राऊत सवयीप्रमाणे बोलत आहेत. आमच्या रक्तात धोका देणे नाही. पाठीत खंजीर खुपसणे त्यांच्या रक्तात आहे”, असेही बावनकुळे म्हणाले.