Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

एमपीएससी परीक्षा वेळेवरच होणार!

एमपीएससी परीक्षा वेळेवरच होणार!

प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही - महाराष्ट्र लोकसेवा आयोग


मुंबई : उमेदवारांचा वैयक्तिक विदा, प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा दावा एमपीएससीने परिपत्रक काढून फेटाळून लावला असून केवळ बाह्यदुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशपत्रे फुटल्याचे सांगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ३० एप्रिलला वेळेवरच होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेश प्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेश प्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणतीही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा (डेटा) आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून, अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचा आयोगाने खुलासा केला आहे.


आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उमेदवारांना कळविले असल्याचे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिवांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Comments
Add Comment