तामिळनाडू पहिल्या तर महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
नवी दिल्ली : रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तामिळनाडू, महाराष्ट्र आघाडीवर आहेत. देशात २०२१ मध्ये ४१ हजार ६७२ आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी तामिळनाडूत ७ हजार ६७३ व महाराष्ट्रात ५ हजार २७० आत्महत्या झाल्या. यातील अधिक चिंताजनक बाब म्हणजे तामिळनाडू व महाराष्ट्रात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत या आत्महत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७ मध्ये तामिळनाडूत ५ हजार ६२४ व महाराष्ट्रात ३ हजार ६६९ आत्महत्या झाल्या असून ही आत्महत्या करणा-यांची संख्या वाढत राहिली आहे.
२०१७ मध्ये मध्य प्रदेशात ३,०३९ व गुजरातमध्ये २,१३१ आत्महत्या झाल्या. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात ४,६५७ व गुजरातमध्ये ३,२०६ आत्महत्या झाल्या. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांमध्येही चित्र फारसे चांगले नव्हते. रोजंदारी कामगारांच्या २०२१ मध्ये आंध्रात ३०१४ तर तेलंगणात ४२२३ आत्महत्या झाल्या. प. बंगालमध्ये पाच वर्षांत रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली. राज्यात २०१७ मध्ये १४३८ तर २०२१ मध्ये ९२५ आत्महत्या झाल्या.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमध्ये २०२१ मध्ये २९ आत्महत्या झाल्या. माकपाशासित केरळमध्ये २०१७ मध्ये २,६४३ आत्महत्या झाल्या होत्या. २०२१ मध्ये हीच संख्या २,३१३ एवढी होती.