- विराट कोहली, क्रिकेटपटू
सचिनची पहिली भेट, त्याच्यासोबत साकारलेल्या काही अविस्मरणीय खेळी हे माझ्या आयुष्यातले काही अनमोल क्षण आहेत. सचिन माझा आदर्श आहे. त्याच्यामुळेच मी क्रिकेटकडे वळलो. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. बहुमोल सल्ले मिळाले. त्यामुळे माझे क्रिकेट बहरले. कारकिर्दीच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना सचिनने आपल्याला काय दिले याची जाणीव होते तेव्हा कृतज्ञतेने नतमस्तक व्हावेसे वाटते.
लहानपणापासून मी सचिन तेंडुलकरला पाहत आलो. त्याची फलंदाजी, मैदानावरचा वावर, चेंडू टोलावण्याची क्षमता हे सगळे पाहून मी थक्क व्हायचो. मोठेपणी सचिनसारखे व्हायचे आहे, असे मी सगळ्यांना सांगायचो. त्याच्या फलंदाजीची अनोखी शैली मला कायम आकर्षित करत आली. क्रिकेट समजायला लागल्यानंतर मी सचिनचा निस्सिम चाहता बनलो. सचिन फलंदाजीला आला की मी वेफर्स आणि खाण्याचे काही पदार्थ घेऊन टीव्हीपुढे बसायचो. त्याची फलंदाजी पाहणे हा अविस्मरणीय अनुभव होता. त्याने मलाच नाही तर प्रत्येक क्रिकेटवेड्या भारतीयाला निळख आनंद मिळवून दिला. सचिनने क्रिकेटला वलय मिळवून दिले. त्याने हा खेळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. भारतात आज क्रिकेटचे जे स्थान आहे ते फक्त सचिनमुळेच. आज सचिनशिवाय क्रिकेटचा विचारही केला जाऊ शकत नाही. प्रत्येक खेळाचा एक चेहरा असतो. बास्केटबॉल म्हटले की मायकल जॉर्डन आठवतो. तसेच सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा चेहरा आहे. त्याने क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्याने तरुणाईला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवले. सचिन आल्यानंतर क्रिकेटमध्ये अशक्यप्राय: वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झाल्या. हे असेही होऊ शकते, याची जाणीव त्याने लोकांना करून दिली. सचिनमुळे अनेकजण क्रिकेटकडे वळले. सचिन हे त्या काळात अनेकांचे दैवत होते आणि आजही आहे. मला माझ्या दैवतासोबत, लहानपणीच्या सुपरहिरोसोबत खेळण्याची संधी मिळाली हे खरं तर परमभाग्य! मी कधी याचा विचारही केला नव्हता. पण माझ्या आयुष्यात तो क्षण आला.
मला सचिनसोबतची पहिली भेट आठवते. सचिन संघातला वरिष्ठ खेळाडू होता आणि मी अर्थातच नवखा होतो. सचिनला पाहण्याची, भेटण्याची ओढ मनात होती. दोन दिवसांपासून मी त्याला भेटण्याच्या दृष्टीने मनाची तयारी करत होते. पण शेवटी थोडी धाकधूकही होती. एवढा महान खेळाडू मला भेटेल का, माझ्याशी बोलेल का असा विचार करत ड्रेसिंग रूममधल्या एका कोपऱ्यात मी उभा होतो. माझी ही मनोवस्था संघातल्या काही खेळाडूंनी ओळखली आणि मला सांगितले की, संघात येणारा प्रत्येक युवा खेळाडू सर्वात आधी सचिनसरांच्या पायांवर डोके ठेवतो आणि त्यानंतरच त्याचा इथला प्रवास सुरू होतो. तू असे केले नाहीस तर काय होईल माहीत नाही. त्यांच्या बोलण्यामुळे मी जास्तच घाबरलो. मी भीत भीत त्यांच्याकडे गेलो आणि पायांवर डोके ठेवण्यासाठी खाली वाकलो. त्याने मला थांबवले आणि अरे, हे काय करतोस असे विचारले. मी सगळा किस्सा सांगितला. त्यावर अरे, ही मंडळी तुझी गंमत करत होती, असे म्हणत सचिनने मला मिठी मारली. हा माझ्या आयुष्यातला खूप खास क्षण होता. खरे तर ड्रेसिंग रूममध्ये आल्यापासूनच मी त्याच्याकडे बघत होतो. मी त्याच्यासमोर बसलो होतो आणि हालचाली टिपत होतो. सचिन टीव्हीवर नाही तर प्रत्यक्षात समोर आहे, यावर विश्वास बसायला काही काळ जावा लागला! या पहिल्या भेटीनंतर माझी सगळी भीती पळाली आणि मी मनमोकळेपणाने बोलू लागलो. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सचिनसोबत खेळण्याची संधी मिळाली, मैदानात काही मोठ्या भागीदाऱ्याही झाल्या. आयुष्यात यापेक्षा जास्त कशाची अपेक्षा मी केली नव्हती.
सचिनकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. मी त्याच्याकडून नम्रपणा शिकलो. क्रिकेटच्या मैदानातली त्याची समर्पित वृत्ती, कटिबद्धता हे सगळे वाखाणण्याजोगे आहे. हे गुण अंगी बाणवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. पंचवीस वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतरही सचिन त्याच उत्साहाने मैदानात येत असे. एवढ्या वर्षांमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही सचिन मैदानात स्वत:ला अक्षरश: झोकून देत असे. सामन्यात १०० टक्के योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असे. त्याचे हे सगळे गुण थक्क करणारे आहेत. सचिनने युवा खेळाडूंना कायमच मोलाचे मार्गदर्शन केले. एकत्र खेळत असताना त्याने नेहमीच मला मार्गदर्शन केले. माझ्या खेळात सुधारणा व्हावी, असे त्याला नेहमीच वाटायचे. त्यानुसार त्याने मला माझ्या चुका दाखवल्या आणि त्यावरचे उपायही सुचवले. सचिनने युवा खेळाडूंना नेहमीच आत्मविश्वास दिला. फक्त खेळाबद्दलच नाही तर मानसिक स्थैर्य कसे राखावे, हेही त्याने मला सांगितले.
प्रत्येकाच्या आयुष्यात निराशेचे क्षण येत असतात. २०१४ मधल्या इंग्लंड दौऱ्यातल्या अपयशानंतर मीही निराशेच्या गर्तेत गेलो होते. काय करावे हे सुचत नव्हते. बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्यावेळी मी सचिनची मदत घेतली. मनातल्या नकारात्मक भावनांना बाहेरची वाट दाखव, असा सल्ला त्याने मला दिला. तुमच्या मनात सातत्याने असे विचार येत असतील, तुमचा या विचारांशी झगडा सुरू असेल, तर नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे नकारात्मकता दूर सार, असे त्याने मला सांगितले. मी त्याचा सल्ला मानला आणि अगदी मोकळ्या मनाने नकारात्मकतेवर बोलू लागलो. सचिनच्या सल्ल्याने माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्यानंतरच्या क्रिकेटमय आयुष्यात अनेक भावनिक क्षण आले. आज मला त्याच्या निवृत्तीचा क्षण आठवतो. त्याच्या मैदानात असण्याची प्रत्येकाला इतकी सवय झाली होती की, यापुढे सचिन खेळणार नाही, ही कल्पनाच क्लेषकारक होती. वेस्ट इंडिजविरुद्धची ती कसोटी मालिका सचिनची अखेरची कसोटी मालिका आहे, हे आम्हाला माहीत होते. पण अखेरचा कसोटी सामना आणि त्या सामन्याचा शेवटचा दिवस येईपर्यंत हा विचार आमच्या मनाला शिवलादेखील नाही. सचिनचा अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी आम्ही मुंबईत आलो…
अखेर तो दिवस उजाडला. सामन्याचा शेवटचा दिवस आणि सचिनचाही मैदानावरचा शेवटचा दिवस. त्या वेळच्या मनातल्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. पंचवीस वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग असणारा सचिन आता मैदानात खेळताना दिसणार नाही, हा विचार करून कसेसेच वाटत होते. एक रिकामपण जाणवत होते. आपण एकटे पडलोय, असे वाटत होते. तो क्षण भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी होता. त्या संघातला प्रत्येक खेळाडू सचिनला बघत मोठा झाला होता. तो अनेकांचा आदर्श होता. सचिनच्या मनाची अवस्था वेगळी नव्हती. तो मुंबईत त्याच्या लोकांसमोर क्रिकेटमधून निवृत्ती घेत होता. या क्षणी त्याच्याप्रती आदर व्यक्त करावा, असे मला वाटून गेले. आजवर ज्या व्यक्तीने भरभरून दिले त्या व्यक्तीला मी काय देणार? पण त्याच्या माझ्यावर असणाऱ्या प्रभावाप्रती आणि त्याच्याकडून मिळालेल्या प्रेरणेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणा, काही तरी करण्याची माझी इच्छा होती. आपल्याकडे हातावर धागा बांधण्याची पद्धत आहे. माझ्याकडे वडिलांनी दिलेला एक धागा होेता. हा धागा कायम माझ्याजवळ असायचा. माझ्याकडे त्यांना देण्यासारखी एकुलती एक मौल्यवान वस्तू म्हणजे माझ्या वडिलांनी दिलेला हा धागा. हा धागा मी सचिनला दिला. हा धागा दिल्यानंतर सचिन खूप भारावून गेला होता. या देशातल्या युवा क्रिकेटपटूंच्या मनात त्याचं काय स्थान आहे, याची जाणीव या कृतीने झाली असावी. तुझा माझ्या आयुष्यावर किती प्रभाव आहे हे एखाद्याने सांगणे ही किती मोठी गोष्ट असू शकते, याची जाणीव मला आहे. ही भावना खरे तर खूप अनोखी म्हटली पाहिजे. हेच सचिनला त्यावेळी जाणवले असावे.
आज कारकिर्दीच्या या टप्प्यावर माझी सचिनसोबत नेहमीच तुलना केली जाते. तुलना करणे चुकीचे नाही पण तुम्ही कोणाशी तुलना करताय, हेही पाहिले गेले पाहिजे ना! ज्याच्यामुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली अशा व्यक्तीसोबत माझी तुलना कशी काय होऊ शकते? आमच्यातल्या तुलनेला कसलाच आधार नाही. सचिन एक परिपूर्ण फलंदाज आहे. क्रिकेटची गुणवत्ता, क्षमता याबाबतीत तो खूप पुढे आहे. त्याने आमच्या पिढीला खूप काही दिले आहे. आमच्या पिढीतल्या क्रिकेटपटूंशी त्याची कधीही तुलना होऊ शकत नाही. त्याची माझ्याशी तुलना होणे हा त्याच्यावरचा अन्याय आहे, असे मला वाटते. तुलना करणाऱ्यांनी ही बाब नक्कीच लक्षात घ्यायला हवी. या वर्षी सचिन पन्नासावा वाढदिवस साजरा करतोय. यासाठी त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! सचिनच्या खेळी
नेहमीच क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहतील आणि क्रिकेटपटूंच्या प्रत्येक पिढीला कायम प्रेरणा देत राहतील यात शंका नाही.