शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात सात धावांनी पराभव
बंगळुरू (वृत्तसंस्था) : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात रविवारी आरसीबीने राजस्थानवर रॉयल विजय मिळवला. आज दोन ‘रॉयल’मध्ये झालेल्या लढतीत आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस आणि हर्षल पटेल आरसीबीच्या विजयाचे सुत्रधार राहिले. मॅक्सवेल आणि फाफ यांनी वादळी अर्धशतके झळकावली. त्यानंतर गोलंदाजीत हर्षल पटेलने तीन विकेट घेतल्या.
आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवा खराब झाली. पहिल्याच षटकात सिराजने जोस बटलरला तंबूत धाडले. जोस बटलरचा खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर युवा यशस्वी जायस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी सामन्यचे चित्र बदलले. दोघांनी दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या विकेटसाठी या युवा फलंदाजांमध्ये ९८ धावांची भागिदारी झाली. देवदत्त पडिक्कल याने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. पडिक्कलने ३४ चेंडूत एक षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. पडिक्कल बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालही बाद झाला. जायस्वाल याने ३७ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली.
जायस्वाल बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र बदलले. आरसीबीने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली. संजू सॅमसन २२धावा काढून बाद झाला. शिमरोन हेटमायर तीन धावांवर धावबाद झाला. सुयेश प्रभुदेसाई याने जबरदस्त थ्रो करत हेटमायरला धाबाद केले. ध्रुव जुरेल याने अखेरपर्यंत लढा दिला. जुरेल याने १६ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. अश्विन याने १२ धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून हर्षल पटेल याने भेदक मारा केला. पटेलने चार षटकात ३२ धावांच्या मोबद्ल्यात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मोहम्मद सिराज आणि डेविड विली यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
विराटचा गोल्डन डक…
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने बंगलोरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत संजूचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्ट याने भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला एलबीड्ब्ल्यू बाद केले. बोल्ट याने डावाच्या पहिल्याच चेंडू इनस्विंग टाकला. तो चेंडू विराटच्या पॅडवर आदळला. पंचांनी विराट कोहलीला बाद दिले. आयपीएलच्या करिअरमध्ये विराट कोहली दहाव्यांदा शून्यावर बाद झाला. २०२२ आणि २०१४ मध्ये विराट कोहली तीन – तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे.