Friday, May 9, 2025

तात्पर्य

मोठी लोकसंख्या : संकट की आव्हान!

मोठी लोकसंख्या : संकट की आव्हान!

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे


अभिनंदन! आपण लोकसंख्येच्या बाबतीत महासत्ता बनलो आहोत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या लोकसंख्या निघी (यूएनएफपीआय)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने चीनला २१ लाखांनी मागे टाकत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख झाली आहे. म्हणजे कोणत्या तरी क्षेत्रात आपण महासत्ता झालो आहोत, पण आता आपली जबाबदारीही वाढली आहे. या लोकसंख्येचा वापर कशा रितीने करून आता आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याचे धोरण आतापासूनच आपण आखले पाहिजे. या लोकसंख्येत ० ते १४ वयोगटातील २५ टक्के, १० ते १९ वयोगटातील १८ टक्के, २० ते २४ वयोगटातील २६ टक्के, २५ ते ६४ वयोगटातील ६८ टक्के व ६५ वर्षे वयोगटातील ७ टक्के लोकांचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता कमावत्या वयोगटातील लोकांचा सहभाग ६८ टक्के असल्याचे दिसते. म्हणजेच आपल्यावर किती जबाबदारी आली आहे हे कळून चुकते.


लोकसंख्या जास्त असण्याचे फायदे असतात, तसे तोटेही असतात. लोकसंख्या वाढीचे काही लाभ निश्चित आहेतच. फायदा एक असतो तो म्हणजेच एखादी मोठी बाजारपेठ घरातच उपलब्ध होणार आहे. जनतेची क्रयशक्ती अर्थकारणाला ऊर्जितावस्थेत ठेवत असते आणि या चक्राभोवती फिरणारी इतर चक्रे म्हणजे रोजगार निर्मिती. घरे, बांधकाम व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि या सर्वांवर होणारी गुंतवणूक. या वाढत्या लोकसंख्येला आज घर, पाणी, वीज, अन्नधान्य, आरोग्य आदी मूलभूत सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. जर यातील उत्पन्न किंवा अन्य बाबींमध्ये तफावत निर्माण झाली तर गरीब- श्रीमंतांमधील दरी अधिकच वाढत जाणार आहे. अधिक लोकसंख्या म्हणजे देश उभारण्यासाठी जेवढे हात अधिक तेवढेच खाणारी तोंडे व त्यांच्यासाठी केलेल्या परिपूर्णतेचे प्रयत्न हेही मोठ्या संकटाला आव्हान देणारे असेल.



भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि तो लोकसंख्येचा परिपाक असल्याने लोकसंख्या वाढ ही देशासाठी लाभदायक असल्याची मांडणी होत आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी २५ वर्षांवरील वय असलेल्या तरुणांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याआधारे जगात कोणत्याच देशाकडे नाही, एवढे मोठे कार्यक्षम मनुष्यबळ भारताकडे आहे. त्याआधारेच आपली आर्थिक भरभराट होईल, असा युक्तिवाद करण्यात येतो. भारताकडे युवा मनुष्यबळ आहे हे नक्की. विकसनशील देशांमध्ये युवकांची संख्या जास्त असेल तर तेथील अर्थव्यवस्थेसाठी ती चांगली बाब असते. त्यासाठी आपल्याला शिक्षण व आरोग्य या बाबींमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर लोकसंख्या ही समस्या न राहता वरदान ठरेल, हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे.



पण मर्यादित स्वरूपात व दीर्घकालीन विचार करता वाढती लोकसंख्या ही धोकादायकच आहे. लोकसंख्येचा हा स्फोट पाहता देशातील मोठ्या वर्गापर्यंत आजच संसाधनांची कमतरता भासू लागली आहे. त्यांना अजूनही मूलभूत सुविधा मिळू शकत नाही. देशाच्या अनेक भागांत आतापासूनच जलसंकट भेडसावू लागले आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येचा ताण हा तापमानवाढ व पर्यावरणातील होणारे बदल भविष्यात खूप मोठी उलथापालथ घडवून आणणार आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येचा परिणाम हा आतापासूनच आरोग्यसेवेवरही होऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या ही गौरवण्याची गोष्ट निश्चितच नाही. आज संपूर्ण जगासाठीच लोकसंख्या वाढ ही चिंतेची बाब आहे. कारण पृथ्वीवर साधने व साधनसंपत्ती मर्यादित आहे. मात्र तिचा उपभोग घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा ताण हा अन्नधान्यापासून नैसर्गिक साधनसंपत्तीवर येत असल्याने भविष्यात लोकसंख्या वाढीचा तोटाच जगाला सहन करावा लागणार आहे. भारतालाही त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. लोकांना अन्न पुरवण्याचे सगळ्यात मोठे आव्हान जगासमोर असणार आहे. भारतासारख्या देशाला लोकसंख्या वाढीबाबत अनेक सामाजिक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच आता ग्रामीण भागातील रोजगार कशा पद्धतीने निर्माण होतील, हेही पाहिले पाहिजे. नाहीतर लोंढेच्या लोंढे शहरांकडे येऊन शहरे बकाल होतील व गावे ओसाड पडतील. गावाकडे राहून शेतीवाडी करून त्या शेतातून दुप्पट उत्पन्न कसे घेता येईल, यावर जास्त संशोधन झाले पाहिजे, तरच ही एक मोठी समस्या आपण सोडवू शकू. तसेच सामाजिक समतोलही निर्माण होईल.



आपल्या देशात ८० च्या दशकात ‘हम दो हमारे दो’ असा नारा दिला गेला. कुटुंब नियोजनाची आवश्यकताही जनतेवर बिंबवली गेली आणि नसबंदीची मोहीमच राबवली गेली. तेव्हा वाढत्या लोकसंख्येकडे संकट म्हणून बघितले जात होते. नव्वदच्या दशकात कुटुंब नियोजनाचा वेग मंदावत गेला आणि १९९१ मध्ये आपल्या देशाने आर्थिक सुधारणांचे निमित्त करून जगाला देशाचे दरवाजे सताड उघडे करून दिले. त्या काळात लोकसंख्येकडे केवळ ओझे म्हणून न पाहता संपत्ती म्हणूनही पाहिले पाहिजे, हा विचार पुढे आला. आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर नव्याने उदयास येत असलेल्या तरुणांचा विचार केला जावा लागला तो योग्य आहे; परंतु ते साधण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.



भारताला वाढत्या लोकसंख्येचा देश बांधणीसाठी कसा उपयोग करायचा, याचा विचार होण्याची गरज आहे. भारताकडे युवा मनुष्यबळ आहे हे वादातीत, पण ते कितपत प्रशिक्षित आहे? हा एक वादाचा मुद्दा आहे. आगामी काळात जगाची वाटचाल ज्या मार्गाने होणार आहे, त्या मार्गावर टिकण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये आपल्या देशातील तरुणांना आत्मसात करावी लागतील. त्यासाठी आतापासूनच नियोजन केले पाहिजे. आपण आपल्याकडील तरुणांच्या क्षमतेला वळण देण्यात यशस्वी ठरलो त्यावरच आपले भविष्य अवलंबून असेल. तरुण लोकसंख्येला योग्य ते वळण दिले व त्यांचे नीट नियोजन करून विकासाला गती देण्याची संधी भारतापुढे आहे. याचे नीट नियोजन केले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाईल.
आता जाता जाता एक, लोकसंख्येची ही आकडेवारी कितपत विश्वासार्ह आहे, आपल्या शासनाने अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्याना म्हणजेच घुसखोरांना देशाबाहेर जर हाकलून लावले, तर आपली लोकसंख्या चीनपेक्षाही कमी दाखवेल, कारण सरकारी आकड्यानुसार भारतात अवैधरीत्या राहणारे दोन कोटी बांगलादेशी व रोहिंगे आहेत. वास्तविक पाहता हाच आकडा दोन कोटी पेक्षाही जास्त असू शकतो.

Comments
Add Comment