राजापूर : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आजपासून माती सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे. मात्र प्रकल्पविरोधी संघटना आणि ग्रामस्थांमुळे सर्वेक्षणाच्या या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. हा अडथळा रोखण्यासाठी प्रस्तावित रिफायनरीच्या सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला आज सकाळी कशेडी गावाजवळ अपघात झाला. यात १७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रिफायनरी सर्वेक्षणाच्या या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. हा अडथळा रोखण्यासाठी राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी सर्वेक्षणाचे काम होणार्या १ किलोमीटरच्या परिसरात २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मनाई आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ म्हणजे जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
रिफायनरी सर्वेक्षणास विरोध करणार्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी केली आहे. मात्र हे विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी बारसू, सोलगाव आणि आसपासच्या परिसरात जवळपास दीड ते दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
तसेच या परिसरात आज पोलिसांचे रूट मार्च काढण्यात येणार आहे. गावागावात ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील केली आहे आणि काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत.
राजापूर तालुक्यात ‘क्रूड ऑईल’ रिफायनिंग करणार्या ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग’ या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.