दिंडोरी : तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टो कार, पिकअप गाडी व मोटरसायकलच्या तिहेरी अपघातात प्राध्यापक रामदास माधव शिंदे रा. रवळस, ता. निफाड यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राध्यापक रामदास शिंदे हे वणी येथील ज्युनियर कॉलेज मध्ये आपल्या एमएच १५ सीएम ४४७४ या अल्टो गाडीने जात असताना वणीहून दिंडोरीकडे जाणा-या सागर भास्कर पेलमहाले यांच्या एमएच १५ ईजी ५८३० क्रमांकाच्या पिकअप गाडीने अल्टो गाडीला जोरदार धडक धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून स्प्लेंडर प्रो- एमएच १५ डीएच ४९३१ ही विठ्ठल पंढरीनाथ पागे आंबेवणी यांची दुचाकी येऊन धडकली. या तिहेरी अपघातात प्राध्यापक रामदास शिंदे हे जागीच ठार झाले.
वलखेड फाटा येथे सोमवार दि. २४ रोजी सकाळी ८.३० वाजता ही दर्घटना घडली. वणी येथे मंगळवार दि. २५ रोजी त्यांचा निवृत्तीचा समारंभ होणार होता. त्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने सर्व शिक्षक, पालक विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोटरसायकलवरील विठ्ठल पागे हे अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार टी. बी. जाधव, पोलीस नाईक एस. के. कडाळे हे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, वलखेड फाट्यावर टाकलेले फायबर स्पीड ब्रेकर निकृष्ट असल्यामुळे लवकर खराब होऊन उखडले गेले. याठिकाणी असलेली वर्दळ लक्षात घेऊन उच्च प्रतीचे स्पीड बेकर टाकण्यात यावेत. तसेच या स्पीड ब्रेकरची जागा काही अंतरावरून दिसतील अशा प्रकारे दिंडोरीच्या दिशेने पुढे घ्यावी, अशी मागणी वलखेड येथील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.