-
प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
‘निरोगी जीवन जगणे’, हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. निरोगी जीवनासाठी आहार आणि विहार याचा प्रामुख्याने विचार केला जातो. विहार म्हणजे शरीर सुदृढतेसाठी केलेला कोणताही व्यायाम. आजकाल चालणे, धावणे, पोहायला जाणे, जिममध्ये जाणे याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे व्यायाम माणसे करताना आढळतात; परंतु ऋषी-मुनींपासून या हिंदुस्थानाला ज्या व्यायाम प्रकाराची ओळख आहे तो म्हणजे ‘योग’. आजच्या काळात काही अपवाद सोडले तर सर्वच आधुनिक सुविधांचा आपण लाभ घेत असतो. पूर्वीच्या जीवनापेक्षा कष्ट आणि श्रम आज कित्येक पटीने कमी झालेले आहेत. पण, मोठ्या प्रमाणात वाढला तो म्हणजे मानसिक ताण आणि पोटाचा घेर! ‘लहानपण देगा देवा…’ अशी काही वर्षांपूर्वी देवाला मागणी करणं फार सोपे वाटत होते, पण अलीकडे बालवाडीच्या मुलांपासून चष्मा लावलेली, वजन वाढलेली, सतत काळजीत असलेली मुले बघायला मिळतात.
‘असं का?’ याला उत्तर आजची सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक परिस्थिती. सतत डोळ्यांसमोर टीव्ही, कर्कश्श संगीत, हातात स्मार्टफोन, डोळ्यांसमोर लॅपटॉप-पीसी आणि टीव्हीचा मोठा स्क्रीन, मैदानी खेळांचा अभाव! आई-वडील नोकरीच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर. संयुक्त कुटुंबाचा ऱ्हास. एखाद-दुसरं मूल आणि त्याच्याकडून भारंभार अपेक्षा. कामाची असमान विभागणी, नोकरीच्या निमित्ताने प्रवास, दगदग हेवेदावे, छोट्या छोट्या आजारांसाठी औषध घेणे, जेवणाखाण्याच्या अनियमित वेळा, असंतुलित आहार, अपुरी झोप, प्रदूषण इत्यादी. या सगळ्या समस्यांना दूर ठेवायचा एकच मार्ग म्हणजे योग- प्राणायाम-ध्यान. ‘योग’ फक्त व्यायाम नसून संपूर्ण शरीराला, आतील अवयवांना हळुवारपणे मसाज देऊन त्यांना योग्य आकार देणारा प्रकार आहे. तो बांधा बांधेसूद बनवतो, व्यक्तिमत्त्वामध्ये भर टाकतो, आत्मविश्वास वाढवतो.
अनेक प्रकारची योगासने मानवी शरीराला वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त असतात. आपल्या शरीराला आवश्यक तो योग प्रकार आपण निवडू शकता… त्याचप्रमाणे त्याचा फायदा करून घेऊ शकता. ‘कितीही दिवस योगाभ्यास केला तरी वजन तेवढेच राहते,’ हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण योगाभ्यासाच्या सवयीनंतर हळूहळू आहारावर, भुकेवर थोड्या फार प्रमाणात नियंत्रण येऊन वजन योग्य प्रमाणात कमी अथवा जास्त होऊ शकते. म्हणतात ना, ‘सास है तो आस है। प्राणायामाद्वारे आपल्या श्वासाला नियमित करू शकतो. श्वासाद्वारे आपण आपले आरोग्य सुखकर बनवू शकतो. कित्येक आजारांमध्ये आजकाल डॉक्टरसुद्धा प्राणायामाचा सल्ला देतात. जन्मल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत जो अखंडपणे आपल्या शरीराशी निगडित असतो तो श्वास. त्या श्वासासाठी, निरोगी शरीरासाठी अनेक प्रकारचे प्राणायाम आपण करू शकतो.
योग आणि प्राणायाम याविषयी आपणास थोडीफार माहिती असते पण आजकाल ‘ध्यान’ हा नवीनच शब्द बऱ्याच प्रमाणात कानावर पडू लागला आहे. याचे कारणच मुळी वाढलेला मानसिक ताण! तो ताण आपण ध्यान साधनेद्वारे कमी करू शकतो. प्रत्येक माणूस हा आज थकलेला, दमलेला, तणावग्रस्त आढळतो; मग तो देशाचा पंतप्रधान उच्चपदस्थ असो वा कुणी कारकून – घरगडी नाहीतर शाळकरी मूल. ‘ध्यान’ कोणत्याही वयात करता येते. तसे ते जरा कठीणच आहे, पण सवयीने ते कोणालाही आत्मसात करता येते. ध्यान करता येणे साध्य झाले की, आयुष्यात सर्वस्व प्राप्त झाले, असे म्हणायला हरकत नाही. पण, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हे सर्व करायला वेळ कुठे आहे? ‘मरायलाही वेळ नाही.’ असं म्हणणारा माणूस ‘आपण कधीच मरू नये’ याच प्रयत्नात सातत्याने आढळतो. प्रत्यक्षपणे मृत्यू जितका भयानक त्यापेक्षा मृत्यूच्या आधी जे जीवन आपण तडफडत जगतो ते जास्त भयानक! Precaution is better than cure!
म्हणून कुठल्याही छोट्या-मोठ्या आजारांना दूर ठेवणारा रामबाण औषध म्हणून प्रत्येकाला आपल्या दिवसातील १४४० मिनिट आतील ३० मिनिटं ही स्वतःसाठी राखून ठेवली पाहिजेत, असं म्हटले जाते.
A Busy man always finds time and Lazy man never!
‘वेळ हा मिळत नसतो, तो काढावा लागतो.’
आरोग्यदायी जगावे आणि सुखाने मरावे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
‘पी हळद आणि हो गोरी,’ या उक्तीप्रमाणे आज योगकेंद्रात जाऊ लागल्यावर उद्या सुडौल आणि निरोगी शरीर प्राप्त होणे शक्य नाही, पण योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि जीवनाला एक सुंदर वळण देऊन बघा… ज्या वळणावर मिळेल फक्त सुख आणि शांती!
आजकाल बरीच योग केंद्रे दिसतात पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे तेथील माणसांची संख्या. हॉटेल आणि चित्रपटगृहासारखी तुडुंब गर्दी तिथे कधीच नसते. कारण जरी वेगवेगळी असली तरी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आरोग्याविषयी निष्काळजी.
‘Healthy mind in Healthy body’ म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. मन निरोगी असेल तर आयुष्यातील ९०% प्रश्न हे प्रश्नच उरत नाहीत, नाही का?