लैंगिक छळ प्रकरणी पुन्हा आंदोलन!
नवी दिल्ली : भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेली विनेश फोगाट यांनी पुन्हा एकदा भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याविरूद्ध जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याच कुस्तीपटूंनी ब्रिजभुषण यांच्याविरूद्ध महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मध्यस्थी करत एक चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर हे आंदोलन स्थगित केले होते.
याच कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यात उपसत ब्रिजभुषण सिंह यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. विनेश फोगाटने सांगितले की जी चौकशी समिती स्थापन केली होती. त्यातील लोकांची राजनैतिक स्वरूपात एकमेकांशी मिलीभगत आहे. आता आम्ही जगणार आणि मरणार देखील जंतर मंतरवरच, देशालाही कळलं पाहिजे की आमच्यासोबत काय झालं आहे.
फोगाट पुढे म्हणाली की भारताचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेली आणि कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले खेळाडू जर देशात सुरक्षित नसतील तर इतर महिलांची काय स्थिती असेल यावर आपण काय सांगू शकतो. आता जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत जंतर मंतरवरून हलणार नाही असेही सांगितले.
दुसरीकडे ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने सांगितले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणी अजून एफआयआर दाखल झालेली नाही. 7 मुलींनी ही तक्रार दाखल केली होती. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. पोलीस एफआयआर दाखल करून घेत नाहीये आम्हाला सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र असं काही झालं नाही.
बजरंग पुनियाने सांगितले की फेडरेशन तर जसं आधी सुरू होतं तसं आताही सुरू आहे. नॅशनल स्पर्धा देखली होत आहे. याचा अर्थ आम्ही जे आंदोलनाला बसलो होतो ते सगळं खोटं होतं. आता आम्ही स्पष्ट सांगितले आहे की यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही कुस्तीपटू आंदोलन करणार आहोत.