- काव्यकोडी: एकनाथ आव्हाड
शंभराची नोट
नोट घेतली शंभराची
वाट धरली बाजाराची
वांगी, बटाटे, कारली
पिशवीत किलोभर भरली
गाजर, मुळा, बीट
निवडून घेतले नीट
मेथी, पालकची जुडी
कोथिंबीर घेतली थोडी
मिरची, लिंबू, आले
घेऊन सारे झाले
पिशवीत नाही जागा
घराकडे आता लागा
आईने भाजी केली छान
अंगत-पंगत वाढले पान
जेवून भरले पोट
संपली शंभराची नोट
१) माशासारखा पोहतो
पण मासा मात्र नाही
सस्तन प्राणी म्हणूनच
हा ओळखला जाई
जलचरांतील सर्वात
हा बुद्धिमान प्राणी
खेळ दाखवतो नवेनवे
याचं नाव सांगा कोणी?
२) पटकन रंग बदलतो
पाण्याचा फवारा सोडतो
संकटाच्या वेळी चक्क
भुजा आपली तोडतो
मऊ मऊ अंग त्याचं
आठ त्याला भुजा
या समुद्री जीवाचे
नाव सांग राजा?
३) पाय नाहीत तरी
सरसर पुढे जातो
डिवचलं की लांब अंग
गोळा करून घेतो
बदला घेतो, डूक ठेवतो
तथ्य नाही यात
विषारी, बिनविषारी
कोणास बरं म्हणतात?
उत्तर –
१)साप
२)ऑक्टोपस
३)डॉल्फिन
eknathavhad23 @gmail.com