Monday, June 16, 2025

नवाजुद्दीन - भूमीची नवी ‘अफवा’

नवाजुद्दीन - भूमीची नवी ‘अफवा’


  • ऐकलंत का!: दीपक परब



बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या ‘अफवाह’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या चित्रपटात अभिनेता सुमित व्यासही दमदार भूमिकेत दिसणार आहे. एखादी ‘अफवा’ लोकांचे आयुष्य कसे बदलू शकते हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.


सुमित व्यास एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतो, त्यानंतर तीन लोकांचे सामान्य आयुष्य पूर्णपणे बदलते. याशिवाय शरीब हाश्मीच्या व्यक्तिरेखेने वेगळी छाप उमटवली असून त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. ‘अफवा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरच्या तोंडी एक डायलॉग ऐकायला मिळतोय. ती म्हणते की, ‘एक मूर्ख दुसऱ्या मुर्खाला एक गोष्ट सांगतो. तो मूर्ख माणूस त्यावर विचार न करता तीच गोष्ट इतर १० लोकांना सांगतो. अशाच पद्धतीने ‘अफवा’ पसरवल्या जातात’. इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करताना भूमी पेडणेकरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकता, पण ती तुम्हाला कधीच सोडणार नाही. एक अफवा तुमचे आयुष्य उलथापालथ करू शकते.


सुधीर मिश्रा यांनी नवाजुद्दीन सिद्दिकी, सुमीत व्यास आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अफवाह’चे दिग्दर्शन केले आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. यापूर्वी भूमी पेडणेकरने अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘क्राऊड’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले, पण बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप झाला. तर नवाजुद्दीन सिद्दिकी शेवटचा ‘हिरोपंती २’ या चित्रपटात दिसला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा