-
नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
अतिशय अनोखी म्हणजेच आगळी कथा असलेला सिनेमा होता ‘अनोखी रात’! ऋषिकेश मुखर्जींची पटकथा असलेल्या या सिनेमाला दिग्दर्शन होते असित सेन यांचे आणि तो रिलीज झाला १९६८ला! त्याची काही आगळी वैशिष्ट्येही होती. पहिले म्हणजे त्यात संजीवकुमार चक्क एक कुख्यात डाकू होता. त्याचे नाव होते बलदेवसिंग. पुढे खास डाकूंचाच सिनेमा असलेल्या ‘शोले’मध्ये मात्र तो अत्यंत सज्जन पोलीस अधिकारी होता आणि त्याचेही नाव होते – ठाकूर बलदेवसिंग!
‘अनोखी रात’मध्ये त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दीड लाखांचे बक्षीस ठेवलेले असते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बलराज सहानी यांचे सुपुत्र असलेल्या परीक्षित सहानींचा हा पहिलाच सिनेमा! डबल रोलमध्ये असलेली त्यांची नायिका होती नर्गिसची पुतणी जाहिदा हुसैन. त्याशिवाय हा महान संगीतकार रोशन यांचा शेवटचा सिनेमा ठरला आणखी एक वैशिष्ट्य!
एरव्ही एखाद्या सिनेमाला फिल्मफेयरची चार नामांकने मिळाली, तर त्यातली एक किंवा दोन प्रत्यक्षात पदरात पडतात. पण ‘अनोखी रात’ने चारही पुरस्कार हसत-हसत खिशात टाकले! सर्वश्रेष्ठ पटकथालेखनाचा पुरस्कार ऋषिदांना तर सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनाचा पुरस्कार अजित बॅनर्जीना मिळाला. सर्वोत्तम संवादलेखक ठरले आनंदकुमार आणि सर्वश्रेष्ठ छायाचित्रणाचा पुरस्कार पटकावला कमल बोस यांनी! संपूर्ण सिनेमा एकाच रात्रीत, एकाच ठिकाणी, घडलेल्या कथेचा असल्याने कुणाही पात्राचे वेश किंवा वेशभूषा एकदाही बदललेली नव्हती. दोन पात्रांचे ‘फ्लॅश-बॅक’ सिन्स असल्याने त्यांचे कपडे तेवढ्या सिन्सपुरते बदलले गेले.
कर्ज तिला फेडता न आल्याने सावकार एका वयोवृद्ध अपंग व्यक्तीच्या हवेलीचा लिलाव करून आपले पैसे वसूल करणार असतो. त्या भव्य हवेलीची बोली लावण्यासाठी गावातले श्रीमंत आलेले असतात. व्हीलचेअरमध्ये असलेले आजोबा मनातून पार खचलेले असतात. त्यांच्याकडे हवेली लिलावात गेल्यावर उपजीविकेचे काहीच साधन नसते. पुन्हा त्यात त्यांच्यावर उपवर झालेल्या नातीची जबाबदारी असते. तिच्या भविष्याची चिंता त्या वृद्धाला सतावत असते. त्यांची नात रमा (जाहिदा) तरुण आणि सुंदर असते. सावकाराची नजर तिच्यावर पडते आणि तो आपला बेत बदलतो. तो आजोबांना ऑफर देतो की जर रमाने माझ्याशी लग्न केले तर मी कर्ज माफ करेन. झाले! रमा हे ऐकते आणि आपल्याला आजोबांचे दु:ख कमी करण्याची संधी मिळाली म्हणून तत्काळ आपल्या सुखाची आहुती देण्याचे ठरवते.
बाहेर रात्र झालेली असते, अचानक प्रचंड पाऊस आणि वादळ सुरू होते. त्यामुळे लिलाव रद्द होऊन बोली लावायला आलेले कुणी बाहेर जाऊ शकत नाही. तेवढ्यात अचानक दारावरची घंटी वाजते आणि दार उघडत असतानाच त्यावर जोरात लाथ मारून डाकू बलदेवासिंग आत येतो. तो आणि त्याचे साथीदार त्यांच्या सुरक्षेसाठी, हवेलीत त्यावेळी हजर असलेल्या सर्व लोकांना प्रमुख दालनात जमा करतात. त्यांची ओळख देता देता त्याला हुबेहूब त्याच्या मृत पत्नी गोपासारखी दिसणारी रमा दिसते. तो गोंधळतो.
बाहेरच्या प्रचंड वादळामुळे असाच तिथे एक चित्रकार आश्रयासाठी आलेला असतो. त्याच्यासमोर लिलावामागची सावकाराच्या कुटिल कारस्थानाची कथा उलगडत जाते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वकिलाला पाहून त्याच्या मनात एक विचित्र कल्पना येते. अतिशय हळव्या मनाचा तो मनस्वी माणूस डाकू बलदेवसिंगला म्हणतो, ‘मी त्या वकिलाकडून मृत्यूपत्र तयार करून घेतो. मग तू मला गोळी घालून मारून टाक. म्हणजे माझ्या विम्याचे पैसे मिळून ती अगतिक मुलगी या गिधाडाच्या हातून तरी सुटेल. मला व्यक्तिगत जीवनात काहीही महत्त्वाकांक्षा नाहीये.” अर्थात डाकू याला तयार होत नाही. तो म्हणतो, ‘बाबा, माझ्या डोक्यावर आधीच अनेक हत्यांची पापे आहेत, मी कशाला त्यात अजून एकाची भर टाकू?’
मात्र रमाचा चेहरा पाहिला की बलदेवसिंगला त्याच्या पत्नीची आठवण अस्वस्थ करत राहते. हळूहळू त्याच्या मनात एक वेगळाच विचार येतो आणि तो एक अभूतपूर्व निर्णय घेतो. तिथे कथा संपते. सिनेमात दिग्दर्शकांनी चित्रकाराच्या (परीक्षित सहानी) तोंडी एक गाणे दिले आहे. ते जणू रमाच्या अगतिकतेचे वर्णन करते. कैफी आझमी या सिद्धहस्त गीतकारांनी लिहिलेल्या त्या गाण्याने एके काळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही अनेक जण, त्यांना आपल्या जीवनात जे अप्रिय निर्णय घ्यावे लागले त्याची आठवण काढताना, नकळत मनात कुढताना, हमखास हे गाणे गुणगुणतात. कैफी आझमींच्या लेखणीतून उतरलेल्या, महंमद रफीसाहेबांच्या मुलायम गळ्यातून आलेल्या आणि रोशनसाहेबांचे भावुक संगीत लाभलेल्या त्या गाण्याचे शब्द होते –
“मिले न फूल तो, काँटोंसे दोस्ती कर ली.
इसी तरहसे बसर, हमने ज़िंदगी कर ली.”
कितीतरी पिढ्यांची कितीतरी स्वप्ने जुन्या काळी अशीच कधी संवादाच्या अभावी, कधी गरिबीतून आलेल्या न्यूनगंडांमुळे पायदळी तुडवली जात. असंख्य निरागस मने चक्क फुलांचे स्वप्न पाहून काट्यांशीच सलगी करून समाधान मानत. जीवनाने पुढे आणलेल्या पराभवालाच आपलेसे करून शांतपणे जीवन जगत. आपल्यापुरते नवे जग वसवून, त्यात आपल्याच मनाने नव्या देवाची मूर्ती कोरून तिची आराधना करताना जीवन सफल झाले असे मानून घेत.
अब आगे जो भी हो अंजाम, देखा जाएगा.
ख़ुदा तराश लिया और बंदगी कर ली.
मिले न फूल तो…
जीवनात कधी इच्छित फळ तर मिळालेच नाही, प्रिय व्यक्तीची नजरभेटही होऊ शकली नाही पण आम्ही तिला मन भरून पाहून घेतले. प्रियेशी काही संवाद होऊ शकला नाही पण आम्ही एकमेकांच्या मनातले सगळे जाणून घेतले.
नज़र मिली भी न थी, और उनको देख लिया.
जुबां खुली भी न थी और बात भी कर ली.
मिले न फूल तो…
पुढच्या कडव्यात मात्र चित्रकाराने बलदेव सिंगला जी ऑफर दिलेली असते तिचा संदर्भ येतो. आपण अजिबात ओळख नसलेल्या एका अगतिक मुलीसाठी जीवदान द्यायला तयार झालो होतो हे या डाकूने कुणाला सांगितले तर लोक आपल्याला हसतील ही खंत त्याच्या मनात येऊन जाते आणि तो म्हणतो-
‘वो जिनको प्यार है चांदीसे, इश्क़ सोनेसे,
वही कहेंगे कभी, हमने ख़ुदकशी कर ली!
मिले न फूल तो…’
एखाद्या इंग्रजी चित्रपटासारखी ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना! तिच्यावरची हृषीदांनी लिहिल्यामुळे अगदी खरी वाटणारी कथा. रोषनसाहेबांचे सुमधुर संगीत… एकदा पाहायलाच हवा असा सिनेमा
आणि वारंवार ऐकावी अशी भावुक गाणी म्हणजे अनोखी रात.