-
ऐकलंत का!: दीपक परब
बॉलिवूडचा भाईजान पुन्हा एकदा सिनेमागृहात धमाका करण्यास उतरला. दबंग खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रूपेरी पडद्यावर कमबॅक केला आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. देशात हा सिनेमा ४५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. एका दिवसात या सिनेमाचे तब्बल १६०० शोज दाखवले जात आहेत. देशासह विदेशातदेखील या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सुमारे १०० देशांमध्ये हा सिनेमा १२०० स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. अशाप्रकारे, जगभरात हा सिनेमा ५७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सलमान खानची मोठी क्रेझ असली तरी गेल्या काही दिवसांत त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. त्यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाकडून सलमान व त्याच्या चाहत्यांकडून खूप अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे सलमान त्याचे सिनेमे ईदच्या मुहूर्तावरच प्रदर्शित करत असतो. आता हा सिनेमादेखील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, थ्रीलर, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. परहाज सामजीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा किमान २५ कोटींहून अधिक कमाई करू शकतो असा अंदाज आहे. ईदच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे तसेच लगेचच वीकेंड आल्यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या मसालापटात सलमान आणि पूजासह शहनाज गिल, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गील, पलक तिवारी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबरोबरच सलमानचा ‘टायगर-३’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘किक-२’ तसेच ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असेही वृत्त आहे.