Thursday, April 24, 2025

दुर्लक्ष

  • क्राइम: अ‍ॅड. रिया करंजकर

कर्जाची रक्कम जास्त असल्याने कुठल्याही भावंडाला ते घर वाचवता आले नाही. बँकेने तो रूम आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे बाकी तीन भावंड रस्त्यावर आली.

सीताबाई यांना चार मुलगे, एक मुलगी. पतीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेलं होतं. सीताबाईचे पती सरकारी सेवेतून निवृत्त झालेले होते. निवृत्त झाल्यानंतर त्यानी चार मुलं राहतील, असा भला मोठा एकच फ्लॅट विकत घेतला व थोडीफार जी रक्कम होती ती आपल्या पत्नीच्या नावे त्यांनी ठेवली. आजारपणात त्यांचं निधन झालं. सीताबाईंनी असलेल्या पैशांमध्ये आपल्या मुलांची लग्नकार्य उरकली. दोन मुलांनी जातीची, तर दोन मुलांनी जातीबाहेर लग्न केलेली होती. तीन नंबरचा मुलगा उमेश हा सगळ्यांचा आवडता असा होता. कारण तो शांत मीतभाषी. कोणाला कधी काहीच न बोलणारा अशा स्वभावाचा होता. उमेश याने परक्या जातीतल्या मुलीशी लग्न केल्यामुळे उमेश याची पत्नी एकत्र कुटुंबात नांदायला तयार नव्हती. त्याच्यामुळे उमेश आणि त्याची पत्नी तिच्या माहेरीच राहू लागले. उमेश अधून मधून आपल्या आईला भेटण्यासाठी येत होता.

उमेशने लग्नानंतर दोन वर्षांतच एक चांगला नवीन फ्लॅट विकत घेतला. तेथे तो आपल्या पत्नीस राहू लागला. बाकीच्या भावंडांना आनंद झाला. आपण काय केलं नाही. पण आपल्या भावाने फ्लॅट घेतला यामुळे सगळ्यांनाच त्याच्याबद्दल अभिमान वाटत होता. पण कुठल्याही भावंडांनी तू कशा पद्धतीने कर्ज केलेस, कशा पद्धतीने हप्ते भरतोस याबद्दल कधीही विचारणा केली नाही. तो समाधानी आहे ना हाच विचार बाकीच्या भावडांनी केला. उमेशची इतर भावंडं आपल्या कामांमध्ये अतिशय व्यस्त होती. त्याच्या वहिनीही नोकरदार असल्यामुळे त्याही आपली नोकरी व आपल्या मुलांमध्ये कायम व्यस्त असायच्या. उमेश नोकरी करत असलेल्या कंपनीने काही कामगारांना कमी केलं. त्यामध्ये उमेशचाही नंबर लागला. नोकरी नसतानाही त्याही परिस्थितीमध्ये उमेशच्या भावंडांनी त्याला आधार दिला. पण, एक दिवस अचानक बँकेची लोकं घरी आली. कर्जाचे हप्ते थकले आहेत ते कधी भरताय असे उमेशच्या भावंडांना विचारू लागले. उमेश याच्या भावंडांना नेमकं कोणत्या कर्जाचे हप्ते भरायचे राहिले आहेत ते समजेना, कारण कोणी कुठलं कर्ज काढलेलं नव्हतं. बँकेत जाऊन व्यवस्थित चौकशी केल्यानंतर उमेश याच्या भावाला बँकेवाल्याने जे सांगितले ते ऐकून त्याच्या मोठ्या भावाला धक्काच बसला. स्वतःला सावरत कसा तरी तो घरी आला. त्यावेळी उमेश सोडून सर्व भावंड घरी होती. सर्वांनी त्याला नेमकं काय झालेलं आहे. याबद्दल विचारणा केली. त्यावेळी स्वतःला सावरत रडत त्याने असं सांगितलं की, आपल्या या घरावर उमेश याने कर्ज काढलेलं आहे व घर गहाण बँकेकडे ठेवलेलं आहे. हे उमेशने कधी केलं, कसं केलं, कोणालाही काही कळेना. म्हणून फोन करून त्याला घरी बोलावलं तरी तो त्या दिवशी तिथे आला नाही. आईच्या विनवणीवरून तो घरी आला. मोठ्या भावाने हे कसं आणि का केलंस असं त्याला विचारलं, तेव्हा तो म्हणाला की, घर आईच्या नावावर होतं. त्याच्यामुळे मला कर्जाची गरज होती कारण त्याची पत्नी घर घे असं त्याला सांगत होती आणि घर घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून आईच्या अंगठा घेऊन या घरावर मी कर्ज काढलं असं तो बोलला. व त्या मिळालेल्या पैशांमध्ये त्यांनी जो नवीन फ्लॅट घेतलेला होता तो त्या पैशातला होता.

याची कोणालाही त्याने कानोकान खबर दिली नाही. नोकरी होती त्यामुळे तो व्यवस्थित हप्ते भरत होता. नोकरीच प्रॉब्लेम झाल्याने त्याचे हप्ते थकले आणि बँकवाले लोक घरी आले आणि त्याने केलेली फसवणूक घरच्या समोर उघडी झाली. कारण या घराची किंमत जेवढी होती त्याच्यापेक्षा दुप्पट त्याने बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि त्याहीपेक्षा त्याने जे हप्ते भरलेले नव्हते त्याच्यामुळे ती रक्कम डबल-टिबल झालेली होती आणि आता ती रक्कम उमेशच्या भरण्याच्या पलीकडे गेलेली होती. म्हणून भावंडाने तू घेतलेला फ्लॅट वीक आणि याचं कर्ज पूर्ण कर, असं सांगितलं असता. माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि ती विकणार नाही, असं उमेशने सांगितलं. एवढेच नाही तर उमेश याने आईच्या अंगठा घेऊन गावच्या जमिनीचे व्यवहार केलेले होते. हे खोदून खोदून विचारल्यावर उमेशने भावंडांना सांगितले.

त्याच्या मोठ्या भावाने त्याला विचारलं एवढे पैसे केलेस काय. हे उमेश सांगायला तयार नव्हता आणि या प्रकरणांमध्ये चारी भावांमध्ये भांडण होऊ लागले. उमेश कोणी घरात नसताना यायचा आणि आईशी गोड बोलून इथे अंगठा दे, असं सांगायचा. आईला वाटायचं उमेशला काहीतरी माझ्या अंगठ्याची गरज आहे. ती बिचारी आपल्या मुलावर विश्वास ठेवून अंगठा देत होती. ज्या मुलावर विश्वास ठेवला जो मुलगा तिला साधा बोलणारा वाटत होता. त्याच मुलाने आज त्यांना रस्त्यावर आणण्याची पाळी निर्माण केली होती. कर्जाची रक्कम जास्त असल्यामुळे कुठल्याही भावंडाला ते घर वाचवता आले नाही. बँकेने तो रूम आपल्या ताब्यात घेतला. त्याच्यामुळे बाकीची तीन भावंड अक्षरशः रस्त्यावर आली. वडिलांनी जे मुलांसाठी केलं होतं ते उमेशच्या अति हुशारीपणामुळे सर्व गमावून बसले होते. आपल्यामुळे आपल्या भावंडांना घराच्या बाहेर पडावं लागलं आहे, ही गोष्ट कुठेतरी सहन न झाल्यामुळे उमेश याला एक दिवस अचानक अॅटॅक आला आणि त्यात तो गेला आणि नंतर भावंडांना कळलं उमेशने बायकोच्या नावावर फ्लॅट घेतला होता. तो होता पण गावची जमीन विकून जे पैसे आले होते, त्या पैशात त्यांनी स्वतःच्या नावावर ही रूम घेऊन ठेवलेली होती आणि उमेशची पत्नी उमेशच्या भावंडांना पैसे द्यायला तयार नव्हती. उलट त्यांना धमकी देऊ लागली की, माझ्या दारात आलात तर तुमच्यामुळे माझ्या नवरा गेला, अशी कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला करेन आणि तुम्हा सगळ्यांना मी अडकवीन, अशी उलट धमकी ती उमेशच्या भावाला देऊ लागली. घरातल्या लोकांना समजलं की, हे सर्व जे केलेलं होतं ते उमेशला डोकं नव्हतं, तर त्याच्या मागे उमेशच्या पत्नीने डोकं लावलेलं होतं. त्यामुळे सगळं घर उद्ध्वस्त झालेलं होतं. भावंडाने एकमेकांवर प्रमाणापेक्षा ठेवलेला विश्वास आणि आईने आपल्या मुलांवर असलेले प्रेम आणि उमेशसारख्या मुलाने आईच्या अशिक्षितपणाचा उचललेला फायदा आणि आई सांगत होती की, उमेश अंगठा घेऊन गेला. पण भावंडांना कामामुळे व्यस्त असल्यामुळे याकडे तिन्ही भावंडांनी केलेलं दुर्लक्ष. आज त्यांना रस्त्यावर घेऊन आलेले होते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -