-
कोकणी बाणा: सतीश पाटणकर
नवदुर्गेचे भक्त महाराष्ट्रात वेंगुर्ला, रेडी, मुंबई, पुणे येथे तसंच गोवा व कर्नाटकात आहेत. नवदुर्गा हे महिषासुरमर्दिनीचे रूप आहे.
रेडी हे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. मूळ रेवती म्हणून ओळखले जाणारे, रेडी अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्याच्या दक्षिणेस रेडी हे निसर्गरम्य गाव गोव्यापासून अगदी जवळ आहे. हा परिसर सुंदर समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, काजू व इतर झाडांनी संपन्न आहे.
पूर्वीच्या काळी रेडीला अतिशय महत्त्व होते. रेडीला पूर्वी रेडी पटणं हे नाव होते व ते एक महत्त्वाचे बंदर होते. हे गाव कोकण विभागातील वेंगुर्ला तालुक्यात आहे. पूर्वीच्या काळात हे एक महत्त्वाचे सागरी बंदर होते. यशवंतगड किल्ल्यासारख्या पुरातन ऐतिहासिक स्मारकाबरोबरच लांब आणि स्वच्छ किनारे असल्यामुळे रेडी आता पर्यटनाचे केंद्र बनले आहे. रेडी मुंबईपासून फक्त ५६६ किमी दूर आहे. नवदुर्गा ही देवी मूळची गोव्यातील गावशी येथील. नंतर ती कोकणात सावंतवाडीजवळ कनयाळे रेडी इथे स्थापन झाली. रेडी हे सावंतवाडीच्या नैर्ॠत्येला असलेले गाव. श्रीदेवी नवदुर्गा देवस्थान हे रेडी गावाच्या कनयाळे वाडीत आहे. तेरेखोल किल्ला इथून जवळच आहे. देवी नवदुर्गा हे पार्वतीचे रूप मानले जाते. ती बऱ्याच गौडसारस्वत ब्राह्मणांची तसंच इतर अनेकांची कुलदेवता आहे. देवी नवदुर्गेचे भक्त महाराष्ट्रात वेंगुर्ला, रेडी, मुंबई, पुणे येथे तसंच गोवा व कर्नाटकात आहेत. नवदुर्गा हे महिषासुरमर्दिनीचे रूप आहे. सोळाव्या शतकात गोव्यातील पोर्तुगीजांच्या छळामुळे त्या वेळच्या महाजन व भक्त मंडळींनी देवीला वेंगुर्ले रेडी येथे नेऊन तिची स्थापना केली. तेव्हापासून गेली साडेचारशे वर्षे ही देवी रेडी गावात आहे. नवदुर्गेची आणखी काही मंदिरे गोव्यात मडकई, कुंडई, बोरी, पैंगीण, पाळी, अद्कोलाना, सुरला येथे आहेत.
गोव्यात नवदुर्गेचे नवव्या शतकापासून अस्तित्व होते, असे सांगितले जाते. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भयभीत होऊन त्यावेळच्या गावस्कर तसंच कामत मंडळींनी ती मूर्ती रातोरात वेंगुर्ले येथे नेऊन स्थापन करायचे ठरवले. त्यासाठी मूर्ती घेऊन मार्गक्रमण करत असताना विश्रांतीसाठी मंडळी रेडी गावी थांबलेली असताना मूर्ती खाली जमिनीवर ठेवली. अशी आख्यायिका सांगितली जाते की, विश्रांतीनंतर मूर्ती उचलायला गेलेल्यांच्या लक्षात आले की, मूर्ती जागेवरून हलेना आणि उचलणेही अशक्य झाले. हा काय प्रकार आहे म्हणून भाविकांनी रेडी ग्रामदेवीला कौल लावला. तेव्हा समजले की देवी पुढे जाण्यास तयार नाही. याच गावी स्थापना व्हावी अशी तिची इच्छा आहे. नंतर कनयाळेवाडीत भक्तांनी जागा खरेदी करून तिचे भव्य मंदिर उभारले आणि मूर्तीची विधिवत स्थापना केली. आजतागायत देवी या कनयाळे रेडी गावात आहे. श्रीनवदुर्गा देवीचे स्वरूप अष्टभुजा महिषासुरमर्दिनीचे आहे. तिच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, भाला ही आयुधे असून चौथ्या हातात महिषासुराचे शिर आहे. खालील बाजूस रेडा आहे. मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. गाभाऱ्यात देवीच्या बाजूस कशी कल्याणी ब्राह्मण, जैन ब्राह्मण वगैरेंसह देवता आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूस बाराचा पूर्वस हा देव आहे. देवीकडे सांगणे केल्यानंतर या पूर्वसकडे सांगणे करावे लागते. या दोन्ही देवतांना रोज महानैवेद्य असतो. देवीचे सेवेकरी कनयाळे गावात राहतात. वर्षातून चार वेळा देवीचा पालखी सोहळा उत्सव असतो. त्यावेळी देवीस तसंच पूर्वसास अलंकारांनी सजवले जाते. देवीची मूर्ती छोटीशी पण देखणी आहे. वर्षभर या देवळात विविध उत्सव होतात. त्यातील सर्वात प्रमुख उत्सव म्हणजे माघ महिन्यातील नवमीला भरणारी जत्रा. तसेच दसरा नवरात्रातही उत्सव असतो. त्यावेळी पालखी काढतात.
सर्व ठिकाणचे भक्त जत्रेच्या वेळी जमतात. या देवीचे प्रमुख महाजन म्हणजे कामत व गावस्कर ही मंडळी. गोव्यातील गावशी गाव मूळचे असल्यामुळे हेच कामत पुढे गावस्कर या नावाने ओळखले जाऊ लागले. पर्यटन जिल्हा घोषित केल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे व पर्यटकांचा ओघही वाढला आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक यशवंतगड किल्ला, गणपती, माऊली मंदिर व नवदुर्गा देवस्थान हे पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारीआहेत)