पुणे: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची माहिती परिक्षेपुर्वीच टेलिग्राम या सोशल मिडिया साईटवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. तसंच उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसंच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी तसेच पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची दखल घेत ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच एमपीएससीची परिक्षा होईल असे आयोगाने म्हटलं आहे.
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. pic.twitter.com/UP9hnZgUGB
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 23, 2023