सायंकाळची वेळ होती. चौपाटीवर बऱ्यापैकी गर्दी होती. फिरायला आलेले लोक कुणी मुलाबाळांसह तर कुणी जोडीने, तर कुणी एकटाच माझ्यासारखा! या गर्दीत आणखी भर टाकली होती असंख्य फेरीवाल्यांनी. भेळवाले, चणे-शेंगदाणे विकणारे, खेळणी विकणारे अन् फुगेवालासुद्धा! मी या गर्दीत एकटाच वाळूत बसून सारं न्याहाळत होतो. निसर्गाची रंगीन किमया पाहता पाहता ऐकत होतो, फेरीवाल्यांचा कलकलाट! मन अगदी शांत होतं, नितळ होतं.
‘काका फुगा घेता का?’ एका लहान मुलाच्या या निरागस प्रश्नानं माझी तंद्री भंग पावली. मी मागे वळून पाहिलं. ते सात-आठ वर्षांचं कोवळं पोर. हातात पंधरा-वीस रंगीबेरंगी फुगे. विस्कटलेले केस, मळके कपडे, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा चुणचुणीतपणा सहज जाणवत होता. ‘काका फुगा घ्या ना!’ तोच आर्जवी स्वरातला निरागस प्रश्न. खरं तर, माझ्यासारख्या वयस्कर माणसाला फुगा विकत घेण्याचं अन् त्यानं मला विकण्याचं काहीच कारण नव्हतं. पण रात्र जवळ येत होती तरी फुगे मात्र संपले नव्हते. म्हणून तो मुलगा बैचेन झाला होता. ज्या वयात मुलांनी आई बाबांचं बोट धरून चौपाटीवर यावं, त्यांच्याकडून हट्ट करवून पुरवून घ्यावेत, इथल्या वाळूत स्वप्नांचे इमले बांधावेत, समुद्राच्या लाटा अंगावर घ्याव्यात, त्या घेता घेता घाबरून आईच्या कुशीत शिरावं, त्या कोवळ्या वयात या मुलाला चिंता लागली होती ती फुगे कसे अन् कधी संपणार याची! आयुष्याच्या करवती प्रश्नानं त्याचं बालपण कुरतडून टाकले होतं. या अवाढव्य मुंबईनगरीत अशी असंख्य बालकं रस्त्याच्या कडेला उभं राहून काही विकताना किंवा चक्क भीक मागतानासुद्धा दिसतात. माझं मन एकविसाव्या शतकातला सधन भारत अन् वस्तुस्थिती याची तुलना करू लागले. अन् माझ्या परीने मी त्या मुलाला मदत करण्याचे ठरवले.
मी त्या मुलाला म्हटले, ‘बाळ, केवढ्याला रे फुगा?’ ‘काका पाच रुपये!’
तो चटकन उत्तरला. आपण सगळेच फुगे घेऊन त्या मुलाला मदत करावी अन् त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहावा या हेतूने त्याला पुन्हा विचारले, ‘सगळे फुगे किती आहेत रे?’ त्याने झरझर फुगे मोजले ते वीस भरले. माझ्यासाठी शंभर रुपये ही रक्कम काही जास्त नव्हती. मी त्याला चटकन म्हणालो, ‘हे घे शंभर रुपये अन् दे ते वीस फुगे’ माझ्या या आगळ्यावेगळ्या प्रतिसादाने तो आवाक् झाला अन् म्हणाला, ‘काका… सगळे फुगे देऊ? सगळे?’ मी मोठ्या रुबाबात म्हणालो, ‘हो, हो, सगळे दे, वीसच्या वीस!’ मग तो चाचरतच म्हणाला, ‘पण काका,’ यातला एक फुगा मला विकायचा नाहीये. ‘मी आश्चर्याने त्याला विचारले, ‘का? का नाही विकायचा?’ ‘तो मला हवा आहे. मलाही त्या फुग्याबरोबर खेळायचंय, त्याच्याबरोबर नाचायचंय. त्याला आकाशात जाताना बघून टाळ्या पिटायच्यात…’ तो मुलगा बोलत असताना माझ्या डोळ्यांत पाणी तराळले. मन गलबलून गेलं.
या कोवळ्या वयात आयुष्यातले रोजीरोटीचे प्रश्न सोडवतानादेखील त्यानं त्याचं बालपण अजून शाबूत ठेवलं होतं. थोडे कमी पैसे कमावून तो ‘आनंद’ घेऊ पाहात होता. खरं तर, त्याची ही कृती माझ्यासारख्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारीच होती. आपल्यासारखी माणसं पैसा कमावण्याच्या नादात आनंदाला पारखी होतात. किंबहुना ‘आनंद’ मिळवणं हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, हेच विसरून जातात. या उलट, तो मुलगा आनंदासाठी प्रसंगी घरच्यांचा मारदेखील खाणार होता.! मी भानावर आलो अन् म्हणालो, बाळ, हरकत नाही. मला वीस फुगे दे. त्यातला एक फुगा माझ्याकडून तुला भेट! असं म्हणताच त्याचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. एका हातात शंभराची नोट अन् दुसऱ्या हातात थयथय नाचणारा फुगा घेऊन तो घराकडे पळत सुटला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बराच वेळ पाहत होतो. त्याच वेळी मला एक गोष्ट जाणवली, एका हातातल्या शंभराच्या नोटेपेक्षा त्याच्या दुसऱ्या हातातला फुगा त्याला जास्त महत्त्वाचा वाटत होता. कारण त्याने ‘फुग्याचा धागा’ गच्च पकडून ठेवला होता. अगदी जीवापलीकडे!
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…