Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआत्मसमर्पित नक्षलवाद्यांना ‘नवजीवन’ देणारा सोहळा

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना ‘नवजीवन’ देणारा सोहळा

  • विशेष: मंजूषा जोशी, नागपूर
आदिवासींची स्त्रीप्रधान संस्कृती असल्याने स्त्रीच्या मतांना येथे मोठा मान असतो. इथे स्त्रीवर अत्याचार होण्याच्या घटना शोधूनही सापडत नाहीत.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या खसनूर पोस्टमधलं एक सात-आठ घरांचं गाव गडेरी. या गावातला पंधरा-सोळा वर्षांचा मुन्शी दिसायला देखणा. नाच-गाण्यातही तरबेज. एकदा नक्षलवाद्यांची नजर त्याच्यावर पडली. नक्षल्यांची वेशभूषा, बंदूक, रानावनातलं बेधुंद जगणं, या आकर्षणापोटी मुन्शी घर सोडून त्यांच्यासोबतच निघून गेला. पण चार-पाच दिवसांतच घरच्या आठवणीने कासावीस झाला. तोपर्यंत परतीचे मार्ग बंद झाले होते. नक्षलवाद्यांच्या धमक्या, पोलिसांची भीती यामुळे इच्छा नसताना तो नक्षली कारवायांमध्ये शामील झाला. देशद्रोही कारवाया करणं, पोलिसांपासून लपत-छपत फिरणं सुरू झालं. त्याच दरम्यान, त्याची नारायणपूर जिल्ह्यातील झेंडे गावातील त्याच्याच वयाच्या श्यामबत्तीशी ओळख झाली. तीदेखील नक्षलवादच होती. त्या दोघांची मनं जुळली. दोघे एकत्र राहू लागले. सतत बंदुकीच्या टोकावरचं आयुष्य जगणाऱ्या पंचविशीतील मुन्शी आणि श्यामबत्तीला आता सामान्य जीवन जगायचं होतं. संसार थाटायचा होता. या खडतर, जीवघेण्या कारवायांमधून मुक्त व्हायचं होतं. अखेर त्यांनी २०२२ साली पोलिसांसमोर आत्मसर्पण केलं. गडचिरोली येथील आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नवजीवन’ वसाहतीत त्यांना घर मिळालं, हाताला काम मिळालं. हे प्रेमी युगुल २६ मार्च २०२३ रोजी गडचिरोली इथे झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालं आणि भविष्याच्या सुखकर मार्गाने मार्गस्थ झालं.

मुन्शी आणि श्यामबत्तीशीसारख्या अशाच आणखी सात आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांची साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. निमित्त होतं, नागपुरातील मैत्री परिवार संस्था आणि गडचिरोली पोलीस दल यांनी गडचिरोलीमध्ये आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याचं. या विवाह सोहळ्यात केवळ हेच आठ आत्मसमर्पित नक्षली जोडपे विवाहबद्ध झाले नाही तर गोंड, माडिया आणि इतर आदिवासी जमातीतील ११९ जोडप्यांचाही विवाहसोहळा अत्यंत भव्यदिव्य आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. मागील चार वर्षांपासून गडचिरोली आणि आजूबाजूच्या परिसरात मैत्री परिवार संस्था दरवर्षी अशा आगळ्या-वेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करते. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या या जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील युवक-युवती नक्षलवादासारख्या विघातक चळवळीमध्ये जाऊ नये, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने तसेच, नक्षलवादामुळे भयग्रस्त झालेल्या या भागात शांतता प्रस्थापित करून हिंसामुक्त समाज निर्माण करण्याच्या हेतूने २०१८ साली पहिल्यांदा मैत्री परिवाराच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला होता. आतापर्यंत ४३३ आदिवासी आणि ३२ आत्मसमर्पित नक्षल युवक-युवतींचे विवाह करून त्यांचे आयुष्य सुखी-संपन्न करण्याचं सत्कार्य संस्थेनं केलं आहे. आपल्याकडे जातीआधारित अनेक सामूहिक विवाह सोहळे होत असतात पण आदिवासी आणि विशेषत: आत्मसमर्पित नक्षलवादी जोडप्यांसाठीचा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या भारतातील एकमेव आणि आगळा-वेगळा सामूहिक विवाह सोहळा म्हटला पाहिजे.

आलिशान घर, चकचकीत कार, विद्युत रोषणाई, चकाचक रस्ते, मोठमोठ्ठे उड्डाणपूल, शानोशौकतमध्ये रमलेल्या शहरी लोकांसाठी हा सोहळा म्हणजे एक मेजवानीच होता. ही मेजवानी होती आदिमांच्या संस्कृतीत मनसोक्त रमण्याची. आदिमांच्या परंपरांना जाणून घेण्याची. दीप, मोहाची डहाळी, रंगवलेली मडकी, सुतबंधन, डाळीचे वडे, दही-दूधभात, मुंडावळ्या आणि बडादेव (महादेव शंकर) पेरसापेन (शिवपार्वती) यांना समर्पित गोंडी भाषेतील मंत्रोच्चार (मंत्रोपचारच म्हणूयात) व हे सारे विधी पार पाडणारे वृद्ध स्त्री किंवा पुरुषाच्या रूपात असलेले किंवा दोघेही सोबतीने असलेले भूमक (पुरोहित) हे सारेच विकसित संस्कृतीतील वैदिक परंपरेप्रमाणेच होते.

आदिम संस्कृती ही पूर्णत: निसर्गाला सर्वेसर्वा मानणारी. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा उदो-उदो करण्याची, त्यांची परंपरा विशिष्ट शैलीतून म्हणजेच त्यांच्या गाण्यातून, पूजनातून व्यक्त होत असते. कशाने काय केले आणि काय झाले, तर त्याच्यावर काय करावे, हे सगळं त्यांच्या या मंत्रोपचारांमध्ये सामील आहे. अगदी वैदिक परंपरेप्रमाणेच. आदिम समाजामध्ये जंगलातील झाडांची फळे ओरबडण्याची प्रथा नाही. टेंभरं (रानचिकू), आंबे, जांभळं, मोहफूल (महुआ) ही झाडे फळांनी कितीही लगडलेली असली तरी ते त्यांना हातही लावत नाहीत. फुले-फळे परिपक्व होण्याची ते वाट पाहतात. परिपक्व झाले फळे, फुले झाडावरून गळून भूमातेवर विसावल्यानंतर ते ती गोळा करतात आणि मग त्याचा वापर करतात, विकतात. याचा अर्थ त्यांना व्यवसायाचे गणित कळत नाही, असे नाही. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, वस्तूला परिपक्व होऊ देण्याइतका संयम त्यांच्यात आहे आणि म्हणूनच ते आपल्यापेक्षा अधिक सुसंस्कृत आहेत, असे जाणवते. हा संयमाचा सुसंस्कृतपणा लग्नाच्या वेदीवर अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या मोहफुलाच्या झाडाची एक डहाळ तोडतानाही दिसून येतो. झाडाची क्षमा मागून, विधिवत पूजन करून मगच मोहफुलाची डहाळी तोडली जाते. नंतर रंगवलेल्या छोट्या आकाराच्या मडक्यातील ज्वारी किंवा वाळलेल्या मोहफुलाच्या राशीमध्ये खुपसून उभी केली जाते.

आदिमांमध्ये गोटूल ही अनोखी परंपरा आहे. गोटूल म्हणजे आदिम संस्कृती, शिक्षण आणि संस्काराचे केंद्र. गोटूल म्हणजे वयात आलेल्या मुला-मुलींना एकत्र येण्याचे केंद्र. या केंद्रातून मुला-मुलींची वयाच्या १८ वर्षांपर्यंत किंवा ते प्रगल्भ झाले ही जाण होईपर्यंत जडणघडण केली जाते. आदिमांमध्ये असलेली विवाहपूर्वीपासून एक राहण्याची ही परंपरा अतिशय विश्वासातून, सहवासाच्या उत्कटतेतून आणि निरागस, नि:स्पृह प्रेम भावनेतून चालत आलेली आहे. त्यांच्या प्रेमात स्पेसला जागा नाही, तर रिकामी असलेली पोकळी भरून काढण्याची वृत्ती आहे. त्यांच्या या परंपरेच्या नात्यात कसलीही अट नाही. त्यांच्यासाठी प्रेम हेच जीवन आहे आणि म्हणूनच कुठल्याही कराराविना, लेखी पुराव्याशिवाय ते सोबत असतात. आधुनिक काळातला शब्द वापरायचा झाल्यास ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये काही काळ राहतात. आपण आता संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम झालो आहोत, प्रगल्भ झालो आहोत, याची जेव्हा त्यांना जाणीव होते तेव्हा ते विवाह करतात. आदिवासींची स्त्रीप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीच्या मतांना येथे मोठा मान असतो. आपला जोडीदार निवडण्याचाही तिला अधिकार असतो. इथे स्त्रीवर अत्याचार होण्याच्या घटना शोधूनही सापडत नाहीत. तर या विवाह सोहळ्यात इतरांसोबतच अशी काही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेली जोडपीही विवाहबद्ध झाली. त्यापैकी काही जोडप्यांना एक किंवा दोन अपत्येही होती. एखादी वधू गर्भवतीही बघायला मिळाली. मेट्रोपोलिटन सिटीमध्ये शारीरिक आकर्षणापोटी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढते आहे. यात स्त्रीची फसवणूक, तिच्यावर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशा स्थितीत आदिमांमध्ये असलेले ही लिव्ह इन रिलेशन आदर्श अशी म्हणावी लागेल. तर अशा या आपल्या दृष्टीने अविकसित पण खऱ्या अर्थाने विकसित समाजातील हा विवाह सोहळा शहरी भागातील आपल्यासारख्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा असा होता.

या विवाह सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हा सोहळा दरवर्षी पार पडतो. या संपूर्ण सोहळ्याचा खर्च गडचिरोली पोलीस आणि मैत्री परिवार संस्थेद्वारे केला जातो. वर-वधू, त्यांचे नातेवाईक, निमंत्रित अशा सुमारे ४००० लोकांसाठी भव्य डोम उभारला जातो. वधूला साडी-चोळी, सोन्याचे डोरले, चांदीचे जोडवे, संसारोपयोगी भांडी, आई-वडिलांसाठी आहेर, वराला कुर्ता-पायजामा-टोपी, जोडे, आहेर, फराळ दिला जातो. शिवाय, वर्षभर त्यांची पालक या नात्याने काळजी घेतली जाते. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. समाजातील दानदात्यांच्या मदतीने या आदिवासींच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणण्याचा प्रयास केला जातो. आदिवासी संस्कृतीने नटलेल्या, सामाजिक भावनेतून सजलेल्या आणि मागासलेल्यांचे आयुष्य फुलविणाऱ्या अशा या गडचिरोली भागातील आदिवासींच्या रम्य अशा सामूहिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार होता आले, याचा अभिमान वाटतो. समाजाने समाजासाठी सुरू केलेला हा उपक्रम गडचिरोलीसारख्या नक्षलवादाने पोळलेल्या जिल्ह्यात मैत्रीफुलांचा सुगंध पसरवतो आहे. नक्षलवादाने पोळलेल्या या समाजाला ‘नवसंजीवन’ देण्याचा प्रयत्न करतो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -