Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मालाड परिसरात ६९ वर्षीय महिलेची हत्या!

मालाड परिसरात ६९ वर्षीय महिलेची हत्या!

मोलकरणीसह तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल


मुंबई : मालाड पश्चिम येथे घरात शिरलेल्या अनोळखी चोराने पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून ६९ वर्षीय महिलेची हत्या केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी घडला. घरातील दागिने व मोबाइल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मारी सिलीन विल्फ्रेड डिकोस्टा असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या घरात काम करणारी मोलकरीण शबनम व तिचा मुलगा शहजादने आरोपी चोरासोबत कट रचून हा प्रकार केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


मारी सिलीन विल्फ्रेड डिकोस्टा मालाड पश्चिम येथील न्यू लाईफ सोसायटी या इमारतीत वास्तव्यास होत्या. महिलेचा नातू नील गोपाल रायबो कामानिमित्त डिकोस्टा यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. पण प्रतिसाद न मिळाल्याने नीलने शेजाऱ्यांना दूरध्वनी करून घरी जाण्यास सांगितले.


शेजाऱ्यांकडे असलेल्या चावीच्या साहाय्याने त्यांनी घर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी शौचालयातील पाण्याने भरलेल्या बादलीत डिकोस्टा यांचे तोंड बुडालेले आढळले. शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार नीलला सांगून डिकोस्टा यांना ताबडतोब कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून डिकोस्टा यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.


नील गेल्या अनेक वर्षांपासून आजी डिकोस्टासोबत राहत होता. त्याला सध्या बंगळुरूमध्ये नोकरी लागली होती. त्यामुळे डिकोस्टा यांची देखभाल करण्यासाठी शबनम नावाच्या मोलकरणीला कामावर ठेवण्यात आले होते. ती अपंग असल्यामुळे तिचा मुलगा शहजादा त्यांना सोडण्यासाठी गुरुवारी आला होता.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता सायंकाळी काम झाल्यावर शबनम व शहजादा यांनी घराचा दरवाजा उघडाच ठेवला. त्यांच्या समोर एका संशयीत व्यक्ती मुखपट्टी परिधान करून घरात शिरली. या व्यक्तीनेच डिकोस्टा यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी नील याच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी मोलकरीण शबनम, तिचा मलगा शहजादा व एका चोराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


संशयीत चोर शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास डिकोस्टा यांच्या घरात आला व पावणेसहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसत आहे. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. महिलेला तीन मुली असून त्यापैकी दोघी कुवेतला राहतात, तर एक मुलगी मिरा रोड परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment